मोसंबीतील किडींमुळे होणारी फळगळ रोखा

मोसंबीतील किडींमुळे होणारी फळगळ रोखा
मोसंबीतील किडींमुळे होणारी फळगळ रोखा

मोसंबी पिकात विविध कारणाने फळगळ होत असते. सद्यःस्थितीत किडीमुळे होणारी फळगळ ही मोठी समस्या आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीने उपाययोजना कराव्यात. रसशोषण करणारे पतंग ः इंग्लिश नाव : फ्रुट सकिंग मॉथ शास्त्रीय नाव : Eudosoma fullocnica लिंबूवर्गीय फळपिकांवर २० प्रकारचे फळावरील रस शोषण करणारे पतंग आढळतात. त्याव्यतिरिक्त एरंडीवरील पाने खाणाऱ्या अळीचा पतंगसुद्धा पक्व फळातील रस शोषण करतो.

नुकसानीचे स्वरुप ः पक्व फळावरील रस शोषण करणारी ही एक प्रमुख कीड आहे. प्रौढ पतंग सायंकाळी फळाला छिद्र करुन फळातील रस शोषण करतात. अशा छिद्रांमधून बुरशीचा शिरकाव होऊन फळे सडून खाली पडतात. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. विशेषत: अंबिया बहरातील फळगळीचे हे प्रमुख कारण आहे. विदर्भ-मराठवाड्यातील मोसंबीची २५ ते ४० टक्के फळगळ होते.

व्यवस्थापन ः

  • किडीचा प्रसार थांबविण्यासाठी बाग स्वच्छ ठेवावी. बागेतील गळालेली सर्व फळे एकत्र करुन जमिनीत दाबून नष्ट करावीत.
  • पतंगाना पकडण्यासाठी प्रकाश सापळे लावावेत.
  • सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान बागेत धूर करून पतंगांना पिटाळून लावावे.
  • बागेत अथवा सभोवताली असणाऱ्या पर्यायी गुळवेल, वासणवेलीचा उपटून नाश करावा. कारण त्यांच्यावर या किडीच्या अंडी, अळी आणि कोषावस्था पूर्ण होतात.
  • पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी २० मि.लि. मॅलॅथिऑन अधिक २०० ग्रॅम गूळ अधिक फळांचा रस २० मि.लि. प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणात मिश्रण करून विषारी अमिष तयार करावे. हे अमिष रुंद तोंडाच्या बाटलीत भरून दोन बाटल्या प्रति पंचवीस ते तीस झाडांसाठी ठेवाव्यात.
  •  फळमाशी : इंग्रजी नाव : फ्रूट फ्लाय शास्त्रीय नाव : Bactrocera dorsalis नुकसानीचे स्वरूप ः प्रौढ माशी मजबूत, रंगाने भुरकट असते. पारदर्शक पंख, पिवळे पाय आणि गळ्यावर काळे पट्टे असतात. ती फळाच्या सालीला छिद्र करून आत अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या फळातील गर खातात. माशीने केलेल्या छिद्राद्वारे बुरशीचा शिरकाव होऊन फळ सडण्यास सुरवात होते. परिणामी सडलेली फळे गळून पडतात. अपरिपक्व फळे माशीच्या अळीला प्रतिकारक असतात. ही प्रतिकारक शक्ती हिरव्या फळाच्या सालीतील तेलामुळे येते. ज्यामध्ये मोनोटरपेनॉइल तसेच इतर टरपेनॉईल यांचे प्रमाण असते. जसजशी हिरवी फळे पिवळी होतात तस तसे प्रतिकार शक्ती कमी होते. प्रतिकार शक्ती कायम ठेवण्यासाठी जिबरेलिक आम्लाचा २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी (२० पीपीएम) याप्रमाणात वापर केल्यास फळांचा रंग हिरवा होऊन फळातील साखरेचे प्रमाणही वाढते.

    व्यवस्थापन :

  • गळालेली फळे गोळा करून जमिनीत पुरावीत.
  • झाडाखाली हिरवी फळे छिद्र करून ठेवावीत. म्हणजे अशा फळांमध्ये अंडी घालण्यासाठी माशा आकर्षित होतात. अंडीग्रस्त फळे बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.
  • फळे पिकण्याच्या दोन महिन्यांपूर्वी माशीला आकर्षित करण्यासाठी फवारणी करावी. त्यासाठी मॅलॅथिऑन अधिक १ टक्का गुळ (१० ग्रॅम प्रतिलिटर) याप्रमाणात १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  •  नर माशांना आकर्षित करण्यासाठी ०.१ टक्का (१ मि.लि प्रतिलिटर) मिथाईल युजेनॉल अधिक ०.५ टक्के मॅलॅथिऑनचे (५ मि.लि प्रतिलिटर) मिश्रण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवावे. नर माशा या अमिषाकडे आकर्षित होऊन बळी पडतात. फळ तोडणीआधी ६० दिवसांपासून या मिश्रणाच्या २५ बाटल्या प्रति हेक्‍टरी या प्रमाणात बागेत ठेवाव्यात. त्यांच्यातील कीटकनाशक दर सात दिवसांनी बदलावे.
  • संपर्क ः डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२ (मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com