लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

लिंबूवरील खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव
लिंबूवरील खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव

पाऊस नसल्यास जमिनीची मशागत व निंदणी करून बाग स्वच्छ ठेवावी.सिंचनासाठी दुहेरी आळे पद्धतीचे आळे तयार करावे. यामुळे झाडाच्या मुळांना खेळती हवा मिळते. ठिंबक सिंचन संच असल्यास त्याच्या लॅटरल पसरून, आवश्यकतेनुसार ओलित सुरू करावे.

सिंचन व्यवस्थापन ः संत्रा व मोसंबीच्या १ वर्षे वयाच्या झाडाला ८ लिटर, ५ वर्षांच्या झाडाला ४५ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ८७ लिटर व १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना १०८ लिटर प्रतिदिन प्रतिझाड पाणी द्यावे. लिंबू झाडांसाठी पाण्याची मात्रा वरील प्रमाणाच्या अर्धी द्यावी.

लिंबू झाडांचे व्यवस्थापन लिंबूवरील खैऱ्या रोगाचा प्रसार पावसाळ्यात फार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी लिंबू झाडावरील रोगग्रस्त फांद्या, पाने कापून, जाळून नष्ट कराव्यात. नियंत्रणासाठी फवारणी प्रति ६० लिटर पाणी, काॅपर आॅक्सि क्लोराइड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.१ ग्रॅम. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार ३० दिवसांनी करावी.

मृग बहर व्यवस्थापन फळांच्या वाढविण्यासाठी, फवारणी प्रति १०० लिटर पाणी मोनो पोटॅशियम फॉस्फेट किंवा युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट किंवा डाय अमोनिअम फॉस्फेट या पैकी एक खत १.५ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड (जीए ३) १.५ ग्रॅम.

कीड व्यवस्थापन कोळी ः प्रादुर्भाव दिसताक्षणी फवारणी प्रतिलिटर पाणी डायकोफाॅल (१८.५ ईसी) २ मि.ली. किंवा प्रोपरगाईट (२० ईसी) १ मि.ली किंवा इथिआॅन (२० ईसी) २ मि.ली. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने.

फळमाशी ः पिकलेल्या फळांवर फळमाशींचा प्रादुर्भाव असतो. प्रौढमाशी पिकलेल्या फळांत अंडी घालते. अंडी उबवल्यानंतर अळी फळांच्या आतील भाग खाते. छिद्रातून बुरशी आणि जिवाणूंचा फळात शिरकाव झाल्याने फळे सडू लागतात. परिणामी फळगळ सुरू होते. नर फळमाशीला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी सापळा तयार करावा. त्यासाठी अर्धा मिली मिथाईल युजेनॉल अधिक २ मि.ली मॅलॅथिआॅन किंवा २ मि.ली क्विनालफाॅस प्रतिलिटर पाण्यांत द्रावण बनवावे. हे द्रावण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून, अशा हेक्टरी २५ बाटल्या झाडावर अडकून ठेवाव्यात. दर ७ दिवसांनी बाटलीतील द्रावण बदलावे.

फळगळ थांबविण्याकरिता उपाय ः अनेक बागांमधील जमिनी पाण्याअभावी भेगाळलेल्या दिसतात. अनेक ठिकाणी पुरेशी ओल नसल्याने जुलै महिन्यातील खतांचा पुरवठा केलेला नाही. या परिस्थितीत झाडांवर अधिक प्रमाणात फळे असल्याने, झाडांना ताण बसून ती अशक्त झाल्याचे आढळले. अशा अशक्त झाडांवर ‘‘कोलेटोट्रिकम’’ या बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. लक्षणे ः फळांचे देठ व देठाकडील फांदी वाळते. फळे पिवळी पडून सडतात व त्यांची गळ होते. जुन्या बागांमध्ये फळगळींचे प्रमाण २० ते २५ टक्के एवढे असल्याचे आढळले.

उपाययोजना ः

  • बागेमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यात यावा. याद्वारे झाडे सशक्त होऊन रोगास प्रतिकारक्षम बनतील.
  • फळे पिवळी पडणे, देठ सुकणे व मोठया प्रमाणात फळगळ होत असल्यास, गळलेली फळे वेचून नष्ट करावीत. वाळलेल्या फांद्या कात्रीच्या साह्याने कापून खालील फवारणी करावी. फवारणी प्रति १०० लिटर पाणी, कार्बेनन्डाझीम १०० ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल १०० ग्रॅम अधिक २,४ डी १.५ ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट १.५ किलो. आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी घ्यावी.
  • टीप ः

  • झाड ओलेचिंब होईल इतक्या मात्रेत फवारणी करावी.
  • २,४ डी ची भुकटी २०-२५ मिली अल्कोहोल किंवा अॅसिटोनमध्ये स्वतंत्र विरघळवून घ्यावी. त्यानंतर मुख्य मिश्रणात मिसळावी.
  • संपर्क ः डाॅ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००३२५ (केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com