उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...

उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...

अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून कोणीही केली तरी चालेल अशा पद्धतीने काम होत असल्याने बहुतेक वेळा अपयशी गोष्ट झाली आहे. उपायांचा पूर्ण अभ्यास न करता, भौगोलिक परिस्थती, पाऊस, माती, इत्यादी घटकांचा विचार न करता उपचार केल्याने आपल्याला अपेक्षित परिणाम आणि फायदा मिळत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे. आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिले, की आपण आतापर्यंत केलेल्या आणि आजही करत असलेल्या जलसंधारण कामांमुळे पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडवू तर शकलो नाहीच, तसेच हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करतो आहे. अनेक ठिकाणी आपण करत असलेल्या चुकीच्या किंवा अपुऱ्या कामांमुळे कोरडा दुष्काळ निर्माण करत आहोत, तर त्याच्या जवळच्या भागात ओला दुष्काळ निर्माण करत आहोत. याचे एक उदाहरण आपल्याला सांगली जिल्ह्यात बघायला मिळते. सांगली जिल्ह्यातील तीळगंगा नदीच्या एकूण प्रवासात आपल्याला कोरडा आणि ओला असे दोन्ही दुष्काळ बघायला मिळतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही टोकाचे प्रकार मानवनिर्मित आहेत. ही नदी सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या उतारावरील रांगांमध्ये उगम पावते आणि शेवटी कृष्णेमध्ये सामावून जाते. आपण जेव्हा नदीच्या उगमाजवळ असलेल्या गावांमध्ये फिरतो, तेव्हा लक्षात येते, की इथले बहुतेक सगळे डोंगर बोडके झाले आहेत, नदीमध्ये मिसळणारे अनेक ओढे गायब झाले आहेत, जे आहेत ते गाळाने भरून गेले आहेत. एकूणच असे दिसते की सर्व जलस्रोतांकडे बहुसंख्य लोकांचं पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आपण जेव्हा प्रवाहाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये पोचतो, आपल्याला असे दिसून येते, की काही गावांमध्ये शेतांमधून पाणी वर येते, उपळी फुटते, आणि पाणी साचून राहिल्याने ती सर्व जमीन नापीक होते आणि लोकांना ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागते. अर्थात, हे सर्व होते, यामागे अनेक कारणे आहेत. समस्या आणि उपाय यांचे अतिसुलभीकरण, एकाच उपायाची योजना अनेक प्रकारच्या समस्यांसाठी करणे, मूळ समस्येचा अभ्यास न करता, वरवर काम करून तात्पुरता मलमपट्टी करणारा उपाय शोधणे, पर्यावरण संतुलन पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आवश्यक आहे याचा विचार न करता काम करणे, काम करताना योग्य, अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला न घेता, स्वत:ला आवडेल, रुचेल, कळेल अशी कामे करणे इत्यादी. अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून कोणीही केली तरी चालेल अशी वाटणारी, पण बहुतेक वेळा अपयशी होणारी गोष्ट झाली आहे. असे उपाय पूर्ण अभ्यास न करता, भौगोलिक परिस्थती, पाऊस, माती, इत्यादी घटकांचा विचार न करता केल्याने आपल्याला अपेक्षित परिणाम आणि फायदा देत नाहीत हा सार्वत्रिक अनुभव आहे. जल, मृद्संधारण यशस्वी होण्यासाठी ः

  • सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जलसंधारण कामांमध्ये लोकसहभाग जास्तीत जास्त कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. जोपर्यंत या कामात स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष सहभाग दिसणार नाही, तोपर्यंत दीर्घकाळ टिकणारे यश मिळणे अवघड आहे. तेव्हा सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्यक्ष कामात लोकांचा सहभाग. अर्थात, लोकसहभाग हा प्रत्यक्ष कामात हवा, काय काम करायचे ते योग्य तज्ज्ञ सांगतील आणि ते फक्त योग्य पद्धतीने अंमलात आणण्याचे काम लोकसहभागातून करावे.
  • जलसंधारण करताना लक्षात घेतले पाहिजे, की आपण जे काम करणार आहोत, जो उपाय योजत आहोत, तो पुरेसा आणि योग्य आहे. आपण जिथे काम करू इच्छित आहोत, तिथे पाऊस किती आणि कसा आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, जमिनीचे उतार कसे आहेत, भूगर्भ कसे आहे इत्यादी गोष्टींचा विचार आणि अभ्यास करून त्यानंतरच योग्य पर्याय शोधून काम केले पाहिजे.
  • केवळ कोणी सुचवले आणि आपल्याला आवडले म्हणून काही काम करण्यापेक्षा योग्य आणि पुरेसे काम काय याचा अभ्यास करून ते काम केले पाहिजे, तर त्याचा उपयोग होऊ शकतो. हे काम करताना आपण करत असलेल्या कामाची गरज, गरज पूर्ण करण्याची क्षमता, जागेची उपलब्धता, इत्यादी बाबींवर काम करणे आवश्यक आहे. पुढच्या लेखांत आपण असे स्थलानुरूप उपयोगी पडणारे उपाय कोणते आणि त्यांचा फायदा कसा होऊ शकतो, आमचे यातील प्रयोग आणि त्यांचा फायदा इत्यादी गोष्टींबद्दल विस्ताराने माहिती घेणार आहोत.
  • पाण्याचे ऑडिट महत्त्वाचे ः १) जलसंधारण करताना एक मूलभूत गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, ते म्हणजे पाण्याचे ऑडिट. यात, गावाची पाण्याची गरज किती, गावातील विविध स्रोतांची ताकद आणि क्षमता किती, पाण्याची कमतरता नक्की किती इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मग काम नक्की करणे हे यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे. आज बहुसंख्य ठिकाणी याच कार्यपद्धतीची कमतरता जाणवते आहे, जे सध्याच्या उपाययोजना विफल ठरण्यामागील एक मुख्य कारण आहे. २) आपल्याकडे असलेल्या गावांच्या, जमिनीच्या नोंदी खूप जुन्या आहेत. बऱ्याच ठिकाणी काळाबरोबर अनेक बदल घडत गेले आहेत. अनेक ठिकाणी ओढे, नाले बुजले आहेत किंवा लोकांनी वळवले आहेत. नाले भरून तेथे आता शेती केली जाते. उतार बदलले आहेत. या सर्व गोष्टींची नोंद मात्र सरकार दरबारी केली गेली आहे, असे नाही. त्यामुळे चुकीच्या गृहीतकांवर अवलंबून, प्रत्यक्ष जागेवर न जाता सुचवलेल्या उपायांनी, अपेक्षित फायदा होत नाही. किंबहुना, नुकसान जास्त होते असे निरीक्षण आहे. ३) जास्त काम म्हणजे चांगले काम असा एक गैरसमज प्रचंड प्रमाणात पसरल्याने हा प्रश्न आणखी गंभीर होत आहे. जल संधारण हे स्पर्धा करण्याचं क्षेत्र नाही आणि जास्त कामापेक्षा योग्य काम करणे हे यश मिळण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. हे लक्षात घेण्याची आणि सर्वसामान्य लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ४) आपण उत्सवप्रिय लोक आहोत. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा समारंभ करणे आपल्याला आवडते. आपण जल संधारण कामाचाही एक समारंभ करून टाकला आहे. यामुळे लोक एका दिवसासाठी उत्साहाने एकत्र येतात आणि काहीतरी केल्याचा तात्पुरता आनंद मिळवतात. पण हे अज्ञानामुळे केले असेल तर तो आनंद क्षणभंगुर ठरतो आणि ज्या गोष्टीसाठी हे केलं जातं, ती गोष्ट मात्र अपयशी ठरते. जलसंधारण हे केवळ पाणी अडवणे आणि जमिनीत मुरवणे यापुरतेच मर्यादित नसून, माती वाहून जाऊ नये म्हणून उपाययोजना करणे, आणि त्या भागात जंगलाचे पट्टे तयार करणे इत्यादी उपाय करणे गरजेचे आहे. ५) जलसंधारण करताना केवळ पिण्याच्या पाण्याची सोय करणे पुरेसे नसते. अनेकदा चांगल्या हेतूने काम करताना, केवळ अज्ञान आणि जाणिवेच्या अभावांमुळे, अनेक संस्था फक्त पिण्याचं पाणी उपलब्ध करून देतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ पिण्याचे पाणी मिळून गावातील स्थलांतर थांबत नाही. आजही गावांमध्ये बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. जोपर्यंत हे लोक दुसरे पीक घेऊ शकत नाहीत, तोपर्यंत गावातील लोकांचे चालू असलेले स्थलांतर थांबवणे शक्य होत नाही. त्यामुळे जलसंधारण करताना पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि दुसऱ्या पिकासाठी शेतीसाठी पाणी, या सगळ्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत तुम्ही करत असलेल्या उपाययोजना पुरेशा होत नाहीत, त्यांचा पूर्ण फायदा गावाला होत नाही. -डॉ. उमेश मुंडल्ये ः ९९६७०५४४६० (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com