कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग नियंत्रण

कृषी सल्ला
कृषी सल्ला

सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व रोगांच्या नियंत्रणाची माहिती घेऊ. कापूस ः

  • सिंचनाची उपलब्धता असल्यास एक आड एक सरी पद्धतीने पाणी द्यावे.
  • सेंद्रिय आच्छादनाचा अवलंब करावा. (उदा. ग्लिरीसिडीया किंवा सुबाभूळ पाला २.५ ते ३ टन प्रतिहेक्‍टरी किंवा सोयाबीन/भात/गव्हाचे काड २.५ ते ३ टन प्रतिहेक्‍टरी.)
  • जमिनीच्या भेगा बुजवून घ्याव्यात. मातीचे आच्छादन करावे.
  • रोगनियंत्रण :

  • मूळ कुजव्या : आळवणी प्रतिलिटर कॉपर ऑक्सिक्‍लोराईड ४ ग्रॅम
  • करपा/कवडी : फवारणी प्रतिलिटर कॉपर ऑक्सिक्‍लोराईड २.५ ग्रॅम
  • दहिया : फवारणी प्रतिलिटर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक (३०० पोत) ३ ग्रॅम
  • आकस्मिक मर : आळवणी प्रतिलिटर युरिया १५ ग्रॅम अधिक म्युरेट ऑफ पोटॅश १५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २.५ ग्रॅम
  • सूचना : प्रतिझाड १५०-२०० मि.लि. द्रावणाची आळवणी करावी.
  • लाल्या विकृतीचे व्यवस्थापन

  • शिफारशीनुसार व विभागून खतमात्रा द्यावी.
  • बोंडे भरण्याच्या अवस्थेत मॅग्नेशियम सल्फेट २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी व डी.ए.पी. २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
  • रसशोषक किडींच्या (तुडतुडे, फुलकिडे, कोळी) व्यवस्थापनासाठी ऍसिटामिप्रीड (२० टक्के) ०.४ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  • लागवडीनंतर ७५ व ९० दिवसांनी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  • तूर ः

  • पिकास संरक्षित पाणी द्यावे. शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास चर काढून त्याचा निचरा करावा.
  • फायटोप्थोरा ब्लाईट रोग नियंत्रण फवारणी प्रतिलिटर मेटॅलॅक्‍झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
  • मोहरी ः

  • पुसा बोल्ड, जयकिसान, सीता या वाणांची निवड करावी.
  • पेरणीसाठी पुसा बोल्ड, सीता या वाणांचे प्रति हेक्‍टरी ३ किलो तर इतर वाणांचे ५ किलो बियाणे वापरावे.
  • बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे
  • थायरम ३ ग्रॅम किंवा
  • कार्बेन्डाझिम २ ग्रॅम
  • पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. उशिरात उशिरा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपवावी.
  • तिफणीने दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. एवढे ठेवून पेरणी करावी. मोहरी बियाणे अधिक भाजलेली बाजरी १ः१ या प्रमाणात मिसळून पेरल्यास दाट उगवण होत नाही. दोन रोपातील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे.
  • पेरणीवेळी प्रति हेक्‍टरी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद पेरून द्यावे. पेरणीनंतर महिन्याने २५ किलो नत्र द्यावे.
  • पेरणीनंतर पाणी देण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडावे.
  • सूर्यफूल ः

  • पेरणीसाठी एस-५६, एलएस-११, एलएसएफ-८, एसएस-२०६८ हे सरळ वाण तसेच महिको १,८,१७ एलएसएफएच-३५, केबीएसएच-४४, केएसएफएच-४३७, फुले रविराज या संकरित वाणांचा वापर करावा.
  • प्रति हेक्‍टरी संकरित वाणाचे ५ ते ६ किलो तर सरळ वाणाचे ८ ते १० किलो बियाणे पेरावे.
  • बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम
  • पेरणी ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा उशिरात उशिरा ऑक्‍टोबरअखेरपर्यंत संपवावी.
  • संकरित वाणांची ६०x३० सें.मी. तर सरळ वाणांची ४५x१५ सें.मी. अंतरावर टोकण पद्धतीने पेरणी करावी. सरळ वाणांची पेरणी तिफणीने करावयाची असल्यास ४५ सें.मी. अंतरावर करावी.
  • टोकन पद्धतीने पेरणी करताना रिजरने सरी वरंबे पाडून सरीच्या बगलेत एका ठिकाणी २ बिया टोकाव्यात.
  • रासायनिक तणनियंत्रणासाठी ऑक्‍सिफ्लोरफेन या तणनाशकाची ४२५ मि.लि. किंवा पेंडिमिथॅलीन या तणनाशकाची २.५ लिटर प्रति हेक्‍टरी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी करावी.
  • पेरणीवेळी प्रति हेक्‍टरी ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश सरीमध्ये पेरून द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ३० किलो नत्र द्यावे.
  • पेरणीवेळी जमिनीत भरपूर ओलावा नसल्यास प्रथम रान ओलावून घ्यावे. चांगला वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. खतेसुद्धा पेरून द्यावीत.
  • पेरणीवेळी सरी वरंबे पाडले नसतील तर उगवण झाल्याबरोबर पाडावेत.
  • केवडा रोगनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर मेटॅलॅक्‍सिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
  • रब्बी ज्वारी ः

  • सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरलेल्या बागायत पिकास महिनाअखेरीस प्रतिहेक्‍टरी ४० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे. खते देतांना जमिनीत ओल असावी.
  • कोरडवाहू ज्वारी पेरणीपूर्वी ८ ते १० दिवस आधी बळीराम नांगराने ४५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सऱ्यांमध्ये पेरणी करुन रासणी करू नये. आगामी काळात पडणाऱ्या पावसाचे मृद्स्थानी जलसंधारण करण्यासाठी त्याचा फायदा होतो. परिणामी ज्वारीच्या उत्पादनात वाढ होते.
  • कोरडवाहू ज्वारीची पेरणी १५ ऑक्‍टोबरपर्यंत संपवावी.
  • बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे १) काणी रोग - गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम २) खोड कीड - इमिडाक्‍लोप्रीड (४८ टक्के) १२ मि.लि.
  • मजुरांची कमतरता असल्यास तणनाशकांच्या सहाय्याने तण नियंत्रण करावे. त्यासाठी पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी ऍट्राझिन १ किलो प्रति हेक्‍टरी याप्रमाणात जमिनीवर फवारणी करावी. फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझलच्या साह्याने सर्वत्र सारखी फवारणी होईल, अशा पद्धतीने फवारणी करावी. तणनाशक फवारणी करताना जमिनीत ओल असावी.
  • बागायती पेरणीसाठी जीएसएच-१५, सीएसएच-१९ आर या संकरित वाणांची निवड करावी.
  • बागायती पेरणी केल्यानंतर पाणी देण्यासाठी सारा यंत्राच्या साह्याने सारे पाडावे.
  • कोरडवाहू लागवडीसाठी मालदांडी, परभणी मोती, परभणी ज्योती, अकोला क्रांती, सीएसव्ही-८ आर, फुले यशोदा वाणांची लागवड करावी.
  • पीक ५५ ते ६५ दिवसांचे असताना म्युरेट ऑफ पोटॅश २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
  • खोडमाशीचा नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर मिथाईल डिमेटाॅन (२५ टक्के) १ मि.लि. किंवा क्विनाॅलफॉस (२५ टक्के) २ मि.लि.
  • करडई :

  • शारदा, परभणी-कुसुम, अे-१, भीमा, फुले किंवा परभणी-पूर्णा या सुधारित वाणांची पेरणीसाठी निवड करावी. परभणी-४० हा बिनकाटेरी वाण कोरडवाहू व बागायतीसाठी योग्य आहे.
  • कोरडवाहू पेरणी ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुर्ण करावी.
  • बागायती पेरणी उशिरात उशिरा ३१ ऑक्‍टोबरपर्यंत संपवावी.
  • बागायती पेरणीनंतर पाणी देण्यासाठी लगेच सारा यंत्राच्या साह्याने सारे पाडावे.
  • सप्टेंबर महिन्यात पेरणी केलेल्या पिकास प्रतिहेक्‍टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.
  • पाण्याच्या व्यवस्थापनासाठी बागायती करडईची सोड ओळ पद्धतीने पेरणी करावी. सुटलेल्या ओळीच्या ठिकाणी पाणी देण्यासाठी नांगराने सऱ्या पाडाव्यात. पाणी साचू देऊ नये तसेच फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
  • आंतरमशागतीसाठी एक कोळपणी व एक खुरपणी करावी. तसेच पेरणीनंतर २०-२२ दिवसांनी विरळणी करावी.
  • मावा कीड नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर डायमेथोएट १.३ मि.लि.
  • मर रोग व मॅक्रोफोमनी चारकोल रॉटरोगनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम
  • अल्टरनेरिया पानावरील ठिपके : फवारणी प्रतिलिटर मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
  • तणनाशकांच्या साह्याने तणनियंत्रण करावयाचे असल्यास पेंडीमिथॅलिन (३० ई.सी.) २.५ लिटर प्रतिहेक्‍टरी या प्रमाणात पेरणीनंतर; परंतु पीक उगवणीपूर्वी फवारणी करावी. फवारणी करत असताना जमिनीत ओल असावी.
  • संपर्क ः डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४० (कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com