तयारी खरिपाची : सोयाबीनची सुधारित लागवड व्यवस्थापन तंत्रज्ञान

सोयाबीनमध्ये कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावावेत.
सोयाबीनमध्ये कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावावेत.

महाराष्ट्र राज्यात अलीकडील काळात सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. योग्य लागवड तंत्राचा वापर, कृषी विद्यापीठांच्या शिफारशी यांचा अवलंब केल्यास या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवण्यास चांगला वाव आहे. त्यादृष्टीने एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा.

सोयाबीन लागवड मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.अत्यंत हलक्या जमिनीत उत्पादन कमी येते. पूर्व मशागत - उन्हाळ्यात एक नांगरणी आणि वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन सम पातळीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी २० गाड्या शेणखत जमिनीवर पसरून द्यावे.

वाणांची निवड सोयाबीनचे अनेक सुधारित व अधिक उत्पादन देणारे वाणे उपलब्ध आहेत. यात एमयूएस ४७ (परभणी सोना), एमएयूएस ६१ (प्रतिकार), एमएयूएस ६१-२ (प्रतिष्ठा), एमएयूएस ७१ (समृद्धी), एमएयूएस ८१ (शक्ती), एमएयूएस १५८, एमएयूएस १६२, जेएस ३३५ ( जवाहर), जेएस ९३-०५, जेएस ९५-६०, एनआरसी ३७ (अहिल्या), डीएस २२८ (फुले कल्याणी), एमएसीएस ४५०, एमएसीएस ११८८, केडीएस ३४४ (फुले अग्रणी) हे वाण महाराष्ट्रासाठी शिफारस केले आहेत.

पेरणीची वेळ पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान करावी. साधारणपणे ७५ ते १०० मिमी. पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.

बीजप्रक्रिया

  •   पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम किंवा थायरम ४.५ ग्रॅम किंवा थायरम अधिक कार्बोक्झीन (संयुक्त बुरशनाशक) ३ ग्रॅम बियाणे यानुसार प्रक्रिया करावी.
  •   त्यानंतर रायझोबीयम २५ ग्रॅम व स्फुरद विरघळणारे जीवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे यामाणे प्रक्रिया करावी.
  •   खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (३० टक्के एफएस) १० मिली प्रति किलो बियाणे अशी प्रक्रिया करावी.
  • लागवडीचे अंतर दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी. आणि दोन रोपांतील अंतर ५ सेंमी. ठेवून पाभर किंवा ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे पेरणी २.५ ते ३.५ सेंमी. खोलीपर्यंत करावी. जास्त खोलवर पेरणी केल्यास उगवणीवर परिणाम होतो.

    बियाणे प्रमाण ६५ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरून झाडाची संख्या ४.४ ते ४.५ लाख प्रति हेक्टर ठेवावी. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्यानुसार बियाण्याचे प्रमाण ५ ते १० किलो प्रति हेक्टर जास्तीचे वापरावे.

    रासायनिक खते ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टर पेरणीच्या वेळेस दयावे. सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे स्फुरद न दिल्यास गंधक २० किलो प्रति हेक्टरी दयावे. ज्या ठिकाणी खोडमाशी व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव जास्त होतो तेथे पेरते वेळेस रासायनिक खतांसोबत शिफारशीत दाणेदार कीटकनाशक वापरावे.

    आंतरमशागत पेरणीनंतर २० ते २५ आणि ३० ते ४५ दिवसांचे पीक असताना दोन कोळपण्या करून शेत तणविरहित  ठेवावे.

    आंतरपिके / दुबार पीक पद्धत

  •      कापूस अधिक सोयाबीनचे १:१ किंवा २:१ आणि सोयाबीन अधिक तूर ४:२ या प्रमाणात घ्यावे.
  •      सोयाबीन आधारित दुबार पीक पद्धतीत रब्बी ज्वारी किंवा करडई ही पीक पद्धती ओलिताखाली फायदेशीर राहील.
  • पाणी व्यवस्थापन सोयाबीन पिकाची फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत १५ ते २० दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास संरक्षित पाणी देणे आवश्‍यक आहे.

    एकात्मिक कीडनियंत्रण कीडनियंत्रणाच्या मशागतीय पद्धती

  •   लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी.
  •   मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकांची एक ओळ लावावी. त्यावरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावित पाने अळंयासहित नष्ट करावीत.
  •   पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
  •   सरी वरंबा किंवा पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणे सोयीचे होईल.
  •   सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडींसाठाच्या पूरक वनस्पतीचे नियंत्रण करावे. पीक फेरपालट करावी. सोयाबीननंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.
  • यांत्रिक पद्धती

  • कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडींसह नायनाट करावा.
  • तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी यांची अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडींसह नष्ट करावीत.
  •   हिरवी घाटे अळी व तंबाखूची पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी  हेक्टरी पाच कामगंध सापळे शेतात लावावेत.
  •   शेतात इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे पक्षिथांबे लावावेत.
  • जैविक पद्धती

  •   पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीनची शिफारसीनुसार फवारणी करावी
  •   तंबाखूवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा लिट्युरा) अळीच्या नियंत्रणासाठी एसएलएनपीव्ही (५०० एलई) विषाणूजन्य कीटकनाशक २ मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीजन्य कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव आढळून येताच फवारणी करावी.
  • - बी. व्ही. भेदे,  ७५८८०८२०२८,

    (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com