डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रण

जमिनीची सौर निर्जंतुकीकरण पद्धत
जमिनीची सौर निर्जंतुकीकरण पद्धत

डाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे मुळांना हवेचा पुरवठा व्यवस्थितरीत्या होतो. मर रोग नियंत्रणासाठी बागेचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.

प्रसार रोखण्यासाठी व्यवस्थापन

  •  लागवडीकरिता वापरण्यात येणारे माती व इतर मिश्रण हे सौर निर्जंतूक करून घ्यावे, त्यामुळे त्यावरील बुरशी, कीटक आणि सूत्रकृमी यांचा नायनाट होईल.
  • लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे मुळांना हवेचा पुरवठा व्यवस्थितरीत्या होईल.
  •  सौर निर्जंतुकीकरण करण्याकरिता ५०-७५ मायक्रॉन जाडीचा एलएलडिपीई प्रकारचा प्लॅस्टिक पेपर वापरावा. जमीन व्यवस्थित ओली करून त्यावर कडक उन्हाच्या दिवसांमध्ये (मार्च-एप्रिल) पुर्णपणे अंथरून चोहोबाजूंनी हवा बंद करून ६ आठवड्यांकरिता तसाच ठेवावा, त्यानंतर लागवड करावी.
  •  मर रोगास प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उत्कृष्ट प्रकारच्या जैविक मिश्रणांचा (अँस्परजीलस नायजर ए.एन. २७, (१किलो प्रति एकर) आणि मायकोरायझा रायझोकेगस इरेग्युलस ग्लोमस इरेग्युलँरिस (१ ते ५ किलो प्रति एकर), ट्रायकोडर्मा हरजियानम, सुडोमोनस स्पे. इत्यादीचा वापर रोपांची लागवड केल्यापासूनच दर ६ महिन्यांच्या अंतराने करत राहावा.
  •  पावसाळ्यामध्ये हिरवळीच्या खतांची म्हणजेच धैंचा (सेसबानिया अँक्युलाटा) आणि ताग (क्रोटालारिआ जुनेका) यांची पेरणी करून, फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडावीत.
  •  माती परीक्षण अहवालानुसार झाडांना बोरॉन खताची मात्रा द्यावी.
  • अन्यत्र प्रसार रोखण्यासाठी

  •  रोगग्रस्त बागेची पाहणी केल्यानंतर रोगग्रस्त झाड व सदृढ झाड याच्यामध्ये ३ ते ४ फूट लांबीचा चर खोदावा. त्याचबरोबर काही प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त झाडांना लेखात नमूद केल्याप्रमाणे रासायनिक उपचार पद्धतीचा अवलंब करावा.
  •  जर झाड २५% हून अधिक किंवा पुर्णपणे सुकून/वाळून गेले असल्यास ते झाड काळजीपूर्वक मुळासकट उपसून काढून बागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट करावे. अशी झाडे बागेजवळील परिसरात साठवून अथवा ढीग लावून ठेऊ नयेत.
  •  प्रादुर्भावग्रस्त झाड काढत असताना त्याच्या मुळाजवळील माती तसेच मुळांचे अवशेष बागेत इतरत्र पसरू नयेत, यासाठी व्यवस्थित प्लँस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून बागेबाहेर काढावेत. त्यामुळे मर रोगाचा प्रसार अन्य झाडांना होणार नाही.
  •  मर रोगग्रस्त झाड काढल्यानंतर अशा खड्ड्यांना सौर निर्जंतुकीकरण प्रक्रिया करावी. अथवा फॉर्मेलीन (५%) द्रावण पाण्यामध्ये मिसळून त्या खड्ड्यांच्या आतील चौहोबाजूला व्यवस्थित ओतावे. त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकून १ आठवड्याकरिता हवाबंद झाकून ठेवावे. त्यानंतर  प्लॅस्टिक आच्छादन काढून पुढील १० ते १५ दिवस खड्ड्यातील माती हलवून घ्यावी. विषारी वायू पूर्णपणे निघून जाईल. अशा खड्ड्यांमध्ये नवीन झाडाची लागवड करण्यापर्वी त्यातील फॉर्मेलीन द्रावणाचा वास पूर्णपणे गेल्याची खात्री करावी.
  • टिप ः फॉर्मेलीन अत्यंत विषारी असून, हाताळणी करताना डोळे, नाक, तोंड त्याच बरोबर शरीराचा भाग पूर्णपणे झाकलेला असावा.
  •  मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्षणीच मुख्य खोडाच्या चोहोबाजूंनी मुळे असणाऱ्या भागांमध्ये तातडीने ड्रेंचिंग करावे. त्याचबरोबर रोगग्रस्त झाडाच्या चोहोबाजूंची ४ ते ५ झाडांनासुद्धा रसायनांचे प्रतिबंधात्मक ड्रेंचिंग करावे.
  • पावसाळी वातावरणात शक्यतो झाडांची छाटणी झाल्यानंतर छाटलेल्या भागांवर १०% बोर्डो पेस्टचा लेप द्यावा. पावसाळी वातावरणात बोर्डोपेस्टमध्ये नीम तेल ५० मिलि. प्रति लिटर या प्रमाणे वापरावे.
  •  प्रादुर्भावग्रस्त झाडांना योग्य त्या आंतप्रवाही बुरशीनाशकांचा उपचार करावा. प्रादुर्भाव ग्रस्त झाड २५% हून अधिक वाळून गेले असल्यास अशा झाडांना मुळासकट उपटून नष्ट करणे संयुक्तिक ठरते.
  • नियंत्रण उपाययोजना झाडांवर मर रोगाची प्राथमिक रोगाची लक्षणे आढळल्यास त्याच्या कारणांचा शोध घ्यावा.   अ) सिराटोसीस्टीस, फ्युजारीअम यांसारख्या बुरशींचा प्रादुर्भाव आढळल्यास  उपाययोजना पहिले ड्रेंचिग ः प्रॉपीकोनाझोल (२५ ईसी) २ मिलि. अधिक क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिलि. प्रति लिटर पाणी.  त्यानंतर ३० दिवसांनी दुसरे ड्रेंचिंग ः  अँस्परजिलस नायजर (ए.एन. २७) ५ ग्रॅम अधिक  शेणखत २ किलो प्रति झाड या प्रमाणे करावी.  त्यानंतर ३० दिवसांनी तिसरे ड्रेंचिंग ः मायकोराइझा (रायझोफँगस इरेग्युलँरीस एस. वाय. ग्लोमस इरेग्युलँरीस) २५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड किंवा प्रॉपीकोनाझोल (२५ ईसी) २ मिलि अधिक क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मिलि प्रति लिटर  या प्रमाणे मिसळून ५ ते १० लिटर द्रावण २० दिवसांच्या अंतराने ३ वेळा रोगग्रस्त झाडांना ओतावे किंवा पहिले व तिसरे ड्रेंचिंग फोसेटिल ए.एल.( ८०% डब्लु.पी.) ६ ग्रॅम प्रति झाड आणि दुसरी व चौथी ड्रेंचिंग टेब्युकोनॅझोल (२५.९% ईसी) ३ मिलि प्रति झाड याप्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून करावे.

    ब) फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास

  •  मेटालॅक्झील (८%) अधिक  मँन्कोझेब (६४%) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे ड्रेंचिंग करावे.
  •  अवशेष मुक्त (रेसीड्यू फ्री) डाळिंब फळांच्या उत्पादनाकरिता रसायनांचे ड्रेंचिंग हे फळ तोडणीनंतर त्वरीत करावे. ड्रेंचिंग करण्यापूर्वी बागेला एक दिवस आधी व्यवस्थित पाणी द्यावे. ड्रेंचिंग केल्यानंतर बागेला किमान दोन दिवस पाणी सोडू नये.
  • क) खोड भुंगेऱ्यांच्या (शॉट होल बोरर) नियंत्रणाकरिता

  •  गेरू/लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० इसी) २० मिलि अधिक  कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मलम तयार करून दोन वर्षांहून अधिक वयाच्या झाडाच्या खोडावर जमिनीपासून २ फूट अंतरापर्यंत व्यवस्थितरीत्या लेप द्यावा.
  •  बहार धरतेवेळी पानगळ केल्यानंतर आणि फळतोडणी झाल्यानंतर त्वरीत वरील मिश्रणाचा लेप अवश्य द्यावा.
  •  खोड भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भाव हा कमजोर झाडावर होतो. झाडे सशक्त करण्यासाठी झाडांना अन्नद्रव्ये व पाणीपुरवठा नियमित करावा.
  • खोड भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या छाटून काढाव्यात. त्या
  • बागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट कराव्यात.
  • ड) सूत्रकृमींमुळे होणाऱ्या मर रोगाच्या नियंत्रणाकरिता

  •  शेणखतासोबत पॅसिलोमायसीस प्ललासीनस ४ ते ५ किलो प्रति एकर, अॅस्परजिलस नाइजर (ए.एन.२७) १ किलो प्रति एकर, मायकोरायझा १ ते ५ किलो प्रति एकर अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करावा. या जिवाणूंचा वापर कुजलेले शेणखत किंवा गांडूळखतामध्ये मिसळून लागवडीपासून दर ६ महिन्यांच्या अंतराने केल्यास सूत्रकृमींवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
  •  त्याचबरोबर अॅझाडिरेक्टीन (१%) ३ मिलि प्रति लिटर या प्रमाणातील द्रावणाची वर्षातून किमान दोन वेळा ड्रेंचिंग करावी.
  •  बागेतील दोन झाडांमधील
  • अंतरामध्ये आफ्रिकन झेंडू
  • (टँजेटस इरेक्टा) उदा. पुसा नारंगी आणि पुसा बसंती अशा जातींची लागवड करावी. उत्तम परिणामाकरिता झेंडूंची वाढ ५ ते ६ महिन्यांपर्यंत होऊ द्यावी.
  •  सूत्रकृमीनाशक प्ल्युन्झल्फान (४८० ईसी) ४० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात सुरवातीच्या अवस्थेमध्ये केल्यास सूत्रकृमीवर प्रभावी नियत्रंण मिळवता येऊ शकते.
  •  हिरवळीची खत पिके उदा. ताग, धैंचा ही सापळा पीक म्हणून फायदेशीर ठरतात.
  • - ०२१७-२३५०२६२,  (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, केगाव, सोलापूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com