रानडुकरांना रोखण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धती

रानडुकरांना रोखण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धती
रानडुकरांना रोखण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धती

वनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या प्रदेशामध्ये शेतीसाठी कीड-रोगाबरोबरच रानडुक्कर, माकड, नीलगाय/ रोही, पक्षी, कृंतक, उंदीर व घुस अशा पृष्ठवंशीय प्राण्यांमुळे होणाऱ्या विध्वंसाचा सामना करावा लागतो. त्यांना अडविण्यासाठी भौतिक उपाययोजनांची माहिती मागील भागामध्ये घेतली. या भागामध्ये उर्वरित पद्धतींची माहिती घेऊ. जैविक अडथळे/ जैविक कुंपणे जैविक कुंपणामुळे वन्य प्राण्यांकरिता भौतिक अडथळे निर्माण होण्यासोबत अतिरिक्त उत्पन्नही मिळू शकते. पिकाभोवती करडईच्या चार ते पाच ओळी ः करडई पीक काटेरी असून, त्याच्या चार ते पाच ओळी मुख्य पिकाच्या चारही बाजूने लावल्यास वन्य पशूंना रोखणे शक्य होते. भुईमूग पिकामध्ये करडईच्या चार ते पाच ओळी कमी अंतरावर जवळ जवळ लावाव्यात. करडईचे झाड एक विशिष्ट प्रकारचे रसायन सोडत असल्यामुळे रानडुकरांना पिकाचे क्षेत्र ओळखण्यात अडचण निर्माण होते. या सीमा पिकामुळे अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळते. पिकाभोवती एरंडी पिकाच्या चार ते पाच ओळी ः मका पिकामध्ये एरंडी पिकाच्या चार ते पाच ओळी चारही बाजूने लावाव्यात. एरंडीच्या वासामुळे रानडुक्करे पिकाकडे येत नाही. आले तरी मुख्य पिकाचे नुकसान टाळता येते. या बॉर्डर पिकामुळे अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळते. एरंडी पीक खरीप व रब्‍बी हंगामात लावता येते. पिकासभोवती काटेरी झाडांची लागवड ः मुख्य पिकांभोवती करवंद, कोरफड, घायपात, बोर, काटेरी निवडुंग (नागफणा) यांसारख्या काटेरी झुडपांची लागवड करावी. ही झुडपे काटेरी असल्यामुळे रानडुकरांपासून व इतर वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान दीर्घ कालावधीकरिता टाळता येते. करवंदासारख्या लागवडीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळते. पर्यावरण स्नेही ध्वनीयंत्रे वन्य प्राण्यांना मानवी वसाहती व पिकांपासून दूर ठेवण्यासाठी विविध आवाजांचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. मात्र, त्यासाठी खास माणूस शेतावर राखणीसाठी ठेवणे सध्या महागडे ठरत आहे. अशा वेळी बाजारात उपलब्ध असलेली आधुनिक ध्वनी यंत्रे उपयुक्त ठरू शकतात. या आवाजांमध्ये निरनिराळ्या परभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक आवाज, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज, विशिष्ठ प्राण्यांचे यातना सूचक आवाजाची रेकॉर्डिंग यांचा समावेश असतो. त्यांचा वापर रानडुक्कर, पक्षी, माकडे, नीलगाय व अन्य वन्य पशूंना शेतापासून दूर ठेवण्यासाठी होत आहे. हानी न पोचविणाऱ्या रासायनिक पद्धती ः वन्य पशूंना मारणे, बंदिस्त करणे ही शिक्षापात्र गुन्हा आहे. त्यांना रोखण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चीक नैसर्गिक रसायने, परवडणारी, कायदेशीर पीक संरक्षण पद्धती व विशेष रणनीती वापरणे गरजेचे आहे. रानडुक्करांची हुंगण्याची सवय लक्षात घेऊन विविध मिश्रणांसाठी वापर करता येईल. अंड्याच्या मिश्रणाची फवारणी अंड्याच्या मिश्रणाची फवारणी बॉर्डर पिकांवर किंवा पिकांभोवती ओल्या मोकळ्या जमिनीवर करावी. त्यासाठी २० मिलि अंड्याचा गर प्रतिलिटर पाणी या प्रमाणात पिकाच्या सभोवती उघड्या ओल्या जमिनीवर फवारावा. या फवारणीकरिता प्रतिएकर २५० ते ३०० रु. खर्च येतो. ही फवारणी १० ते १२ दिवसांच्या अंतराने केल्यास रानडुकरांपासून बऱ्याच अंशी पिकाचे संरक्षण होऊ शकते. केरोसिनमध्ये भिजविलेली निवार पट्टी निवार पट्ट्या २ ते ३ तास रॉकेल (केरोसिन) मध्ये भिजवून ठेवाव्यात. अतिरिक्त रॉकेल निथळून घेतल्यानंतर या निवार पट्टीच्या दोन ते तीन रांगा एकमेकांपासून व जमिनीपासून एक फूट उंचीवर लाकडी पट्ट्या, सळ्या किंवा कांब यांच्या साह्याने लावाव्यात. रॉकेलच्या उग्र वासामुळे रानडुकरांना पिकाचा वास येत नाही व पिकाचे सुमारे १० ते १५ दिवसापर्यंत रक्षण होऊ शकते. सल्फर (गंधक) + पाळीव डुकराच्या तेलाचे मिश्रण नारळाच्या दोरीवर लावणे नारळाच्या दोरीच्या तीन रांगा एकमेकांपासून तसेच जमिनीपासून एक फूट अंतराने लाकडी खांबांचा वापर करून पिकासभोवती बांधाव्यात. त्यानंतर गंधकाची भुकटी पाळीव डुकराच्या चरबीत किंवा तेलात टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. पिकाच्या सभोवती बांधलेल्या नारळाच्या दोरीवर सगळीकडे लावून घ्यावे. नारळाच्या दोरीवर लावलेल्या मिश्रणामुळे एक विशिष्ट वास शेताच्या आजू बाजूने दरवळतो. रानडुकरे अशा शेतापासून दूर राहतात. १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा हे मिश्रण नारळाच्या दोरीवर लावावे. गोनॅडोट्रोपिन आमिष सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांप्रमाणे रानडुकरांमध्ये सुद्धा पियुषिका ग्रंथी गोनॅडोट्रोपिन नावाचे रसायन व संप्रेरक (ग्रंथीरस) स्रवत असते. या संप्रेरकामुळे जननग्रंथी उत्तेजित होऊन, रानडुकरांची सामान्य वाढ, लैंगिक कार्याचे नियमन करतात. अशा गोनॅडोट्रोपिन सोडणाऱ्या संप्रेरक गर्भनिरोधक लसीचा वापर करून रानडुकरांची संख्या कमी राखता येते. गोनॅडोट्रोपिन आमिषांचा वापरापूर्वी पूर्व आमिष म्हणून १०० ग्रॅम गव्हाचे पीठ आणि कांदा-लसणाची खळ (पेस्ट) यांच्या मिश्रणाचे गोळे तयार करावेत. ते शेतात ३ ते ४ दिवस पूर्व आमिष म्हणून ठेवावेत. पाचव्या दिवशी या मिश्रणाच्या गोळ्यात गोनॅडोट्रोपिन सोडणाऱ्या संप्रेरकाची गर्भनिरोधक लस योग्य मात्रेत वापरली जाते. पारंपरिक ग्रामीण पद्धती स्थानिक पाळीव डुकरांच्या शेणाची फवारणी रानडुकरांमध्ये विशिष्ठ प्रादेशिकता अति जास्त असते. ते अन्य प्राण्यांच्या निवासी भागात जात नाहीत. स्थानिक पाळीव डुकरांच्या विष्ठेची फवारणी पिकासभोवती करावी. त्याच्या वासामुळे जंगली रानडुकरे येणे टाळतात. मानवी केसांचा वापर रानडुकरांच्या कायम हुंगत राहण्याच्या सवयीचा वापर त्यांना रोखण्यासाठी करता येतो. कर्तनालयातून मानवी केस मिळवून ते पिकाच्या सभोवती चारही बाजूने पसरून टाकावेत. हे केस हुंगणाऱ्या रानडुकरांच्या नाकात अडकून टोचतात. यामुळे नाइलाजाने ते तिथून पळ काढतात. या वेळी यातनादायक संकेत इतर रानडुकरांनाही देतात. परिणामी, अन्य कळपातील रानडुकरेही घाबरून ते स्थान सोडतात. पिकाभोवती रंगीत साड्यांचा वापर पिकाभोवती चारही बाजूंनी निरनिराळ्या रंगांच्या साड्या बांधून ठेवल्यास कमकुवत नजरेच्या रानडुकरांना त्यात मानवी हालचालींचा भास होतो. परिणामी, ते येत नसल्याचा समज ग्रामीण भागात आहे. मात्र, रानडुकरांना रोखण्यासाठी ही पद्धती तितकी प्रभावी नसल्याचे दिसून येते. स्थानिक डुकरांच्या विष्ठा मिसळून तयार केलेल्या शेणाच्या गवऱ्या जाळणे ः स्थानिक डुकरांच्या वाळलेल्या विष्ठा व शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या शेताभोवती मातीच्या भांड्यात धूर करत जाळाव्यात. या वासामुळे रानडुकरे येणे टाळतात. फटाक्यांचा आवाज किंवा वेगवेगळे कर्कश आवाज करणे ः रानडुकरांना पळवून लावण्यासाठी फटाक्यांचा आवाज करणे, रिकामे टिनाचे डब्बे वाजवणे आणि वेगवेगळे आवाजात ओरडणे असे पारंपरिक उपाय ग्रामीण भागांमध्ये वापरले जातात. मात्र, ते तात्पुरते ठरतात. पाळीव कुत्र्यांच्या मदतीने रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण करणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com