सेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त

सेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त
सेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त

सध्या प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता कमी झाली आहे. दर वर्षी पिके घेत असलेल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये हिरवळीची पिके उपयुक्त ठरू शकतात. त्याचे नियोजन करण्याविषयीची माहिती या लेखातून घेऊ. शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेली पिकांना हिरवळीची खते असे म्हणतात. ही पिके फुलोरा अवस्थेत आल्यानंतर शेतात पलटी नांगराच्या अथवा साध्या नांगराच्या साह्याने जमिनीत गाडली जातात. त्यातून सेंद्रिय पदार्थ आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता मुख्य पिकांना होऊ शकते. पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरावे. तयार झालेले पीक लुसलुशीत असताना अथवा फुलोरा अवस्थेत असताना जमिनीत गाडले जाते. परिसरातील करंज, अंजन व ग्लिरीसिडीया (गिरीपुष्प) या वनस्पतीची पानेही हिरवळीचे खत म्हणून जमिनीत गाडता येतात. हिरवळीची पिके व त्यातील नत्राचे प्रमाण : अ. क्र. हिरवळीची पिके /वनस्पती .... नत्राचे प्रमाण (%) १ ताग (बोरू) .................................०.४३ २ चवळी........................................०.४९ ३ गवार..........................................०.३९, ४ उडीद.........................................०.४५ ५ मटकी.........................................०.३५ ६ लसूण घास.........................................०.७३ ७ करंज.........................................१.२६ ८ अंजन.........................................१.४२ ९ ऐन.........................................२.०४ १० गिरिपुष्प.........................................३.०० ११ सोयाबीन.........................................०.७१ हिरवळीची पिके लावताना हे पाहा...

  • पीक कोणत्याही जमिनीत वेगाने, भरपूर वाढणारे असावे. पीक लवकर कुजणारे रसरशीत व तंतूचे असावे. शक्यतो शेंगवर्गीय कुळातील असावे. पीक शेंगवर्गीय (द्विदल) व मुळांवर जास्त गाठी असणारे असावे.
  • पिकामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ नये.
  • पीक कमी पाण्यावर येणारे असावे. अर्थात, सिंचनाची सुविधा असल्यास पीक चांगले साधते.
  • पिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत, ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये शोषली जातात.
  • वनस्पतीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असावे, त्यामुळे त्यांचे विघटन लवकर होईल.
  • हिरवळीच्या खतांचे प्रकार १) शेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीची खते : जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग, मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात. ते पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्याच शेतात नांगरून मिसळले जाते, त्यास शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात. उदा. ताग, गवार ,चवळी, धैंचा, मूग, मटकी, मेथी, लाख, मसूर, वाटाणा, उडीद, कुळीथ, सेंजी, शेवरी, लसूण घास, बरसीम या पिकांचा समावेश असतो. २) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत : पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडता येतात. अशा कोवळ्या फांद्या व पाने नांगरणी अथवा चिखलणी वेळी मातीत मिसळल्यास फायदे मिळतात. उदा. गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, टाकळा, कर्णिया, किंजळ यांची झाडे व झुडपे. हिरवळीच्या खतांची पिके :- १) ताग / बोरू /सनहेंप (क्रोटालारिया जुंसी) :

  • ताग हे हिरवळीचे उत्तम पीक असून, पुरेसा पाऊस अथवा सिंचनाची सोय असलेल्या विभागात घ्यावे. हे सर्व प्रकारच्या जमिनीत चांगले वाढत असले, तरी आम्लधर्मीय जमिनीत या पिकांची वाढ जोमाने होत नाही. तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.
  • पावसाळ्याच्या सुुरवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे.
  • पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० सेें.मी. उंच होते. या वेळी नांगराच्या साह्याने जमिनीत गाडून टाकावे.
  • तागामध्ये नत्र ०.४३ टक्के, स्फुरद ०.१२ टक्के व पालाश ०.५१ टक्के, असे अन्नद्रव्याचे प्रमाण असते. या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.
  • २) धैंचा (सिसबेना अक्युलटा) -

  • धैंचा हे तागापेक्षा काटक हिरवळीचे पीक असून, कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीतसुद्धा तग धरू शकते.
  • या वनस्पतीच्या मुळांवर, तसेच खोडावरही गाठी दिसून येतात. या गाठीमध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.
  • या पिकांच्या लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पावसाळ्याच्या सुरवातीस शेतात पेरावे.
  • बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी गंधकाची प्रक्रिया करून परत थंड पाण्याने धुवावे. त्यानंतर रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्यावर करावी.
  • पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केल्यास पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० सें.मी.उंचीपर्यंत वाढते. या वेळी जमिनीत नांगराने गाडून टाकावे.
  • धैंच्यापासून ८ ते १० टनापर्यंत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४२ टक्के इतके आहे. भाताची लागवड करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.
  • ३) घेवडा (फ्यासिओलस व्हल्गरीस) :

  • हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते. पाणथळ जमिनीस हे पीक योग्य नाही.
  • पावसाळ्याच्या सुरवातीला प्रतिहेक्टरी ५० किलो बियाणे पेरावे. नंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ते जमिनीत गाडावे.
  • ४) द्विदल कडधान्याची पिके :

  • पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग, चवळी, उडीद, कुळीथ, गवार यांचे बियाणे शेतात पेरावे.
  • पूर्व मशागतीनंतर मूग, उडीद, कुळीथ यासाठी २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी बियाणे पेरावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जिवाणूसंवर्धन चोळावे.
  • आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता, यापासून प्रतिहेक्टरी ५० ते ६० किलो नत्र पिकास उपलब्ध होते.
  • ५) गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया) -

  • झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत, तसेच निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगले येते. या झाडाची लागवड दोन प्रकारे करतात.
  • पहिली पद्धत- छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० सें.मी. लांब व ३ सें.मी. व्यासाची दोन छाट कलमे निवडावीत. बांधावर अथवा पडीक जमिनीत पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सें.मी. आकाराचा खड्डा करून लगवड करावी.
  • दुसरी पद्धत - गादी वाफे तयार करून अथवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावीत. ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत.
  • पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक आहे. दुसऱ्या वर्षांपासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो. या झाडाच्या फांद्याची वरचे वर छाटणी केल्यानंतर नवीन फूट येते. त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते.
  • गिरिपुष्पाची पाने ही धैंचा किंवा वनझाडाच्या पालापाचोळ्यापेक्षा जलद कुजतात.
  • गिरिपुष्पाच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण- सेंद्रिय कर्ब ३६ टक्के, नत्र ३ टक्के, स्फूरद ०.५ टक्के व पालाश १.१५ टक्के. थोडक्यात, या हिरवळीच्या खताचा वापर केल्यास नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करता येते.
  • हिरवळीचे खत तयार करताना...

  • कापणी - नुकतेच फुलोऱ्यात आलेले हिरवळीचे पीक जमिनीलगत कापावे.
  • हे पीक गाडण्याची वेळ - हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आलेले असावे. सामान्यतः ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलोऱ्यावर येतात. बाहेरून हिरवळीच्या पिकांची पाने आणून ते नांगरट किंवा चिखलणीपूर्वी टाकून गाडावीत. या वेळी ट्रायकोडर्माचा उपयोग केल्यास खताची प्रत वाढवता येते. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी किंवा मैद फिरवावा. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे झाकले अन दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरू होते.
  • हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करून आॅगस्टमध्ये गाडणी करावी. हे पीक गाडण्याच्या वेळी पाऊस पडला नसेल, किंवा जमिनीलगत ओलावा कमी असल्यास पाणी द्यावे. कुजण्याची प्रक्रिया जलद होते.
  • शेतात उपलब्ध काडी-कचरा व गवत ह्यांचे ढीग शेतात जागोजागी करून कुजू द्यावेत. योग्यवेळी जमिनीत गाडावेत. कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी खड्डयात गवत व काडी-कचरा कुजवता येईल.
  • कपाशीच्या रांगामध्ये तृणधान्य, शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन कापणीनंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे.
  • हिरवळीच्या खताचे फायदे:-

  • प्रतिहेक्टरी सुमारे ५० -१७५ किलो नत्र उपलब्ध करतात.
  • जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवतात.
  • मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • मातीचा भौतिक, रासायनिक व जैविक पोत सुधारण्यास मदत होते.
  • मातीत सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढते.
  • सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ टन शेणखताच्या बरोबर असते.
  • या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
  • शेंगवर्गीय पीक घेतल्यास वातावरणातील जास्तीचे नत्र जमिनीत स्थिर होते. पुढील पिकास नत्राची मात्रा कमी प्रमाणात लागते.
  • हिरवळीची पिके जलद वाढतात, अल्प कालावधीत जमिनीत गाडली जात असल्याने तणांच्या वाढीस मज्जाव निर्माण करतात.
  • खारवट व चोपण जमिनीच्या सुधारणेस मदत होते.
  • हिरवळीचे खत नत्रासोबतच स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोहाची उपलब्धता वाढते.
  • हिरवळीच्या खताच्या मर्यादा :

  • जिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीचे खत व्यवस्थित कुजत नाहीत. परिणामी, मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर परिणाम होऊ शकतो.
  • हिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्‍यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब:नत्र गुणोत्तर वाढते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढते, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते.
  • नुसतेच हिरवळीचे पीक घेतल्यास पिकाचा एक हंगाम वाया जाऊ शकतो. शक्यतो हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे.
  • कमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो.
  • हिरवळीच्या पिकांच्या सतत लागवडीमुळे पिकावर रोग, किडी व सूत्र कृमींची वाढ होऊ शकतात.
  • संपर्क - अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ (कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com