कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्ष
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

पावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. कोंबड्यांना देण्यात येणारे खाद्य आणि पाण्याची गुणवत्ता चांगली असावी. याचा वाढीवर सरळ परिणाम होत असतो. पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांवर ताण निर्माण होतो. तसेच या काळात योग्य ती काळजी न घेतल्यास त्यांच्या मरतुकीमध्ये वाढ होऊ शकते. या काळात हवामान दमट असते, त्यामुळे या काळात कोंबड्यांची तसेच पोल्ट्रीशेडची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या काळात रोग प्रादुर्भावाची शक्‍यता अधिक असते. १) कोंबड्यांना होणाऱ्या निरनिराळ्या रोगांचा उगम हा दूषित पाण्याद्वारे होतो. पावसाळ्यात वहात असलेल्या पाण्यामध्ये जंतूंचे प्रमाण अधिक असते. आपण खाद्याची रिकामी पोती पडदे म्हणून वापरतो, जेणेकरून कोंबड्यांचा थंडीपासून बचाव होईल. परंतु पावसाळ्यात विशेष काळजी न घेतल्यास आणि धान्याची पोती पडदे म्हणून लावल्यास पावसाच्या पाण्यामुळे पोत्यातील धान्याचे कण भिजतात, त्यामुळे आणि पावसाचे पाणी खाद्यात मिसळल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. २) पावसाळ्यात जास्त वेळ पडदे खाली ठेवल्यास शेडमध्ये योग्य वायुविजन होत नाही. त्यामुळे हवेचा खेळतेपणा योग्य प्रमाणात न राहिल्यामुळे अनेक समस्या उद्‌भवतात. शेडमध्ये अमोनिया व मिथेनसारखे विषारी वायू तयार होतात. हवेचे योग्य नियमन होत नसल्यामुळे ते बाहेर जात नाहीत. यामुळे कोंबड्यांना स्वच्छ, शुद्ध हवेचा पुरवठा होत नाही. ३) पावसाळ्यामध्ये शेडमधील लिटर (गादी) कोरडी राहत नसल्यामुळे त्यामध्ये जंतूचे प्रमाण वाढते. हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे गादीमध्ये ओलसरपणा जास्त तयार होतो. त्यामध्ये कोंबड्यांची विष्ठा, खाद्य आणि पाणी यांचा समावेश झाल्यामुळे रोगाचा प्रसार होतो. ओल्या गादीमुळे कॉक्‍सिडिओसिस म्हणजेच रक्ती हगवण यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढते. शेडमधील अमोनियाचे प्रमाण वाढून कोंबड्यांना श्‍वसन संस्थेचे आजार होऊ शकतात. ४) कोंबड्यांना ई. कोलाय जंतूचा प्रादुर्भाव हा मुख्यतः दूषित पाण्यातून होत असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी. शेडचे व्यवस्थापन ः

  • पोल्ट्री शेड नेहमी पूर्व-पश्‍चिम दिशेने असावी.
  • पावसाचे पाणी शेडमध्ये जाऊ नये याकरिता सज्जा (ओव्हरहॅंग) ३ ते ३.५ फूटपेक्षा कमी नसावा.
  • पावसाळ्यापूर्वी शेडवरील पत्रे मजबूत करावेत, जेणेकरून जोरात हवा किंवा वावटळ आल्यास ते हलणार नाही किंवा उडून जाणार नाही.
  • शेडच्या जवळ असलेले सर्व खड्डे बुजून टाकावे. जेणेकरून त्यात पावसाचे पाणी साचणार नाही. रोग पसरण्यास वाव मिळणार नाही.
  • पावसाचे पाणी सहजरीत्या वाहून जावे याकरिता शेडच्या बाजूने चर खोदावे म्हणजेच उतार करावा, ज्यामुळे पावसाचे पाणी एका जागी साचून न राहता वाहून जाईल.
  • पावसाळ्यात प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. त्यांची योग्य वेळेनुसार उघडझाप करावी.
  • प्लास्टिक पडद्यांचा दुहेरी उपयोग होतो. एकतर त्यामुळे हवा सरळ शेडमध्ये न जाता बाहेर अडवली जाते. कोंबड्यांचे थंड हवेपासून रक्षण होते. पावसाचे पाणीही सरळ शेडमध्ये जात नाही.
  • पडद्याची बांधणी करताना ती वरील बाजूस एक-दीड फूट खाली बांधावी, ज्यामुळे हवेचे योग्य नियमन होऊन हवा खेळती राहण्यास मदत होईल.
  • शेडच्या भिंतींना आतून व बाहेरून चुना लावावा.
  • लिटरचे व्यवस्थापन ः

  • पावसाळ्यामध्ये लिटर व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे. कारण या काळात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ६० ते ९० टक्यांपर्यंत जाऊ शकते. शेडमधील आर्द्रतेचे प्रमाण किमान ४० ते ६० टक्के एवढेच असावे.शेडमधील वायुविजन योग्य असावे, जेणेकरून हवा खेळती राहील. लिटर ओले होणार नाही.
  • पावसाळ्यात हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे लिटरमध्ये पाणी शोषून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, त्याच लिटरचा वापर करावा.
  • या काळात तांदूळ सालीचा लिटर म्हणून उपयोग करू नये. कारण यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी असते.
  • लिटरची घनता जास्त जाड किंवा जास्त लहान नसावी.
  • शेडमधील लिटर एका दिवसातून किमान एकदा तरी खालीवर करावे. त्यामुळे लिटर ओले न राहता कोरडे राहण्यास मदत होते.
  • पावसाळ्यात खबरदारी म्हणून पावसाळ्याच्या सुरवातीलाच लिटर बदलून घ्यावे.
  • जर लिटरकडे विशेष लक्ष दिले गेले नाही तर ते ओले होऊन कॉक्‍सिडिया रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.
  • लिटर चुकून जास्त ओले झाले तर ओला झालेला भाग काढून त्या जागेवर नवीन लिटरचा वापर करावा.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लिटरमध्ये चुना मिसळावा.
  • खाद्य व्यवस्थापन ः

  • पावसाळ्यामध्ये धान्यामधील ओलाव्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्‍यता असते.
  • धान्यातील ओलावा हा गुणवत्ता बघण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे.
  • पावसाळ्यात धान्यामधील ओलावा बहुतांश १६ टक्क्यांच्या वर जातो. परंतु त्याचे प्रमाण किमान १० ते १२ टक्क्यांपर्यंत असावे.
  • धान्यामध्ये जास्त ओलावा असल्यास बुरशी वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे धान्यामध्ये विषारी मेटाबोलाईटस तयार होतात, जसे की अफलाटॉक्‍सीन, ऑकराटॉक्‍सीन. असे खराब खाद्य कोंबड्यांना दिले तर त्यांना मायकोटॉक्‍सीकोसीस होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी मृत्युदरात वाढ होते.
  • खाद्य ठेवण्याची जागा कोरडी असावी. शक्यतो पावसाळ्यात खाद्याची वाहतूक करू नयेत.
  • खाद्यामध्ये अतिओलाव्यामुळे गोळा तयार झाला असेल तर हे खाद्य कोंबड्यांना देऊ नये.
  • पूर्ण परीक्षण केल्यावरच खाद्याची खरेदी करावे.
  • खाद्यामध्ये तज्ज्ञांच्या सल्याने कॅक्‍सिडिओस्टॅट औषधांचा उपयोग करावा. शिफारशीत बुरशीनाशक औषधांचा वापर करावा. खाद्यामध्ये अँटिऑक्‍सिडंट मिसळावे.
  • पाणी व्यवस्थापन ः

  • कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता चांगली असावी. याचा वाढीवर सरळ परिणाम होतो. कारण पाण्यामुळे रोगांचा प्रसार होत असतो.
  • नेहमी स्वच्छ व ताजे पाणी पिण्यास द्यावे.
  • पाण्यामध्ये ॲसिडीफायर व सॅनिटाइझरचा वापर करावा.
  • लसीकरणाच्या वेळी क्‍लोरीनयुक्त पाणी देणे टाळावे.
  • पाण्याच्या टाकीला व्यवस्थित झाकण असावे. जेणेकरून पावसाचे पाणी यात जाऊन रोगांचा प्रसार होणार नाही.
  • पाण्याची लोखंडी टाकी गंजू नये याकरिता रेड ऑक्‍साईड लावावे.
  • डॉ. सतीश मनवर, ९७३०२८३२१२ डॉ. अंकितकुमार राठोड, ७२१८८४२८३३ (कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com