जमीन सुपीकतेसाठी परीक्षण आवश्यक

मातीचा नमुना घेण्याची पद्धत
मातीचा नमुना घेण्याची पद्धत

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी, आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमिनीतून होत असते. त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवालाचा फायदा होतो. माती परीक्षणातून प्रामुख्याने उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश, सूक्ष्मअन्नद्रव्ये- लोह, जस्त, मंगल, तांबे इ. व सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण इ.माहिती आपणास  मिळते.  

मातीचा नमुना घेण्याची शास्त्रशुद्ध पद्धत

  •  पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तसेच खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा.
  •  जमिनीची एकरूपता, रंग, सुपिकता, जमिनीचा खडकाळपणा, उंच सखलपणा लक्षात घेऊन शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत.
  •  मोठ्यात मोठा भाग हा पाच एकर पेक्षा मोठा नसावा.
  •   एक प्रातिनिधीक नमुण्यासाठी किमान सात ते जास्तीत जास्त अठरा मातीचे नमुने गोळा करावे.
  •   नमुना घेताना रस्त्यालगतचा, झाडाखालचा, गोठ्याजवळचा, बांधाजवळचा किंवा घराजवळच्या जागेतून घेऊ नये.
  •    नमुना घेण्यासाठी इंग्रजी ‘व्ही’ आकाराचा २० सें.मी. खोल खड्डा करावा. त्या खड्ड्यातील माती बाहेर काढून टाकावी. माती परीक्षणासाठी खड्ड्याच्या कडेची माती काढून प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये घ्यावी. सर्व खड्ड्यातून जमा केलेल्या मातीतून खडे, पालापाचोळा, कचरा बाजूला काढावा. ती माती एखाद्या ताडपत्रीवर मिसळून घ्यावी. त्यानंतर त्याचे चार भाग करावे. समोरासमोरील भागाची माती काढून टाकावी. पुन्हा राहिलेल्या मातीचे चार भाग करावेत. परत समोरासमोरील भाग काढून टाकावेत. ही कृती अर्धा किलो माती शिल्लक असेपर्यंत करावी.
  •   हा नमुना सावलीत वाळवून कापडी पिशवीत भरुन माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. या नमुन्यासोबत शेतकऱ्यांनी त्यांची सर्व माहिती त्यासोबत देणे आवश्यक ठरते. यामध्ये नमुना क्र., शेतकऱ्याचे नाव, पत्ता, नमुना घेतल्याचा दिनांक, घेतलेल्या पिकाची माहिती इ. गोष्टींचा उल्लेख असावा.
  •  माती परिक्षण अहवालातून आपणास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती मिळेल. त्यानुसार ‍पिकांची निवड करावी. शिफारशीनुसार खतांचे व्यवस्थापन करता येते.
  • खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पद्धती

  •  तृणधान्य पिकांसाठी खतांचा ४:२:२:१ (नत्र:स्फुरद:पालाश:गंधक) या प्रमाणात तर कडधान्यासाठी १:२:१:१ प्रमाणात खताचा वापर करावा.
  •  माती परीक्षणावर आधारीत शिफारशीनुसार खतांचा वापर करून अन्नद्रव्यांचे संतुलन साधावे.
  •   सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे करावा.
  •  पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
  •  रासायनिक खतांचा वापर सेंद्रीय पदार्थासोबतच (कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत) करावा.
  •  सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा.
  •  विविध जिवाणू खतांचा वापर करावा. (रायझोबीयम, पीएसबी, ॲझोटोबॅक्टर इ.)
  •  समस्यायुक्त क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी इ.) वापर करावा.
  •  चुनखडी विरहीत जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा.
  •  मृद व जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
  •  ः डॉ. गौतम हनवते, ९४२१८४८९७४  ः श्रीमती सारिका नारळे, ९४०४१९४२८९ (अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com