योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळा

चांगल्या आरोग्यासाठी योग्य वेळी पशुतज्ज्ञांकडून लसीकरण करावे.
चांगल्या आरोग्यासाठी योग्य वेळी पशुतज्ज्ञांकडून लसीकरण करावे.

जनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. लस घेताना त्यावरील तारीख, लसीचा बॅच क्रमांक नोंद करून ठेवावा. लसीकरण शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी करावे.

पशुपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे असते. जनावरे तसेच  कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने जीवाणूजन्य व विषाणुजन्य आजार हे खूप महत्त्वाचे आहेत. या आजाराची साथ जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते. यामध्ये आजारी जनावरांची मरतुक होते, बाधित जनावरांची उत्पादकता कमी होते. बाधित जनावरे ही निरोगी जनावरांमध्ये आजाराच्या संक्रमणास कारणीभूत ठरतात.  याव्यतिरिक्त आजारी जनावरांच्या औषधोपचारावरही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.

 गाई-म्हशीमध्ये प्रामुख्याने लाळ्या खुरकत, रेबीज (विषाणूजन्य), घटसर्प, फऱ्या, संसर्गजन्य गर्भपात, काळपुळी (जीवाणूजन्य) हे महत्त्वाचे संसर्गजन्य आजार आहेत. शेळी-मेंढीमध्ये पी.पी.आर., निलजीव्हा व देवी हे विषाणूजन्य आणि आंत्रविषार, घटसर्प, फऱ्या व काळपुळी हे महत्त्वाचे जीवाणूजन्य आजार आहेत. आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

लसीकरण दिल्यावरही आजार होण्याची कारणे

  • लसीची मात्रा योग्य प्रमाणात न देणे.
  • लसीची साठवणूक योग्य पद्धतीने (थंड जागेत) केली नसणे.
  • लसीकरणात अनियमितता तसेच लसीची मुदत संपल्यानंतर किंवा उरलेली लस वापरणे.
  • जनावरात आंतर व बाह्य परोपजीवींचा प्रादर्भाव.
  • लस देते वेळी जनावर अशक्त किंवा आजारी असणे.
  • लसीकरणाची पूर्वतयारी

  • लसीकरणापूर्वी एक आठवडा सर्व जनावरांना जंतनाशके द्यावीत. जेणेकरून जनावरे निरोगी व सशक्त राहतील.
  • जनावरांच्या शरीरावरील बाह्य परोपजीवींचा (गोचिड, गोमाशा, उवा, पिसवा) नायनाट करण्यासाठी  शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करावी.
  • लसीकरण करतानाची काळजी  

  • लस नामांकित कंपनीची असावी.
  • लस घेताना त्यावरील तारीख, लसीचा बॅच क्रमांक नोंद करून ठेवावा.
  • लसीकरण शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी करावे. यामुळे लस टिकून ठेवण्यासाठी लागणारी थंड वातावरणाची शृंखला अबाधित ठेवता येते. त्यासाठी थर्मास किंवा बर्फ वापरावा.
  • लसीची साठवण कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावे. शक्यतो सर्व प्रकाच्या लसींची साठवणूक  ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करावी.
  • लसीकरण करताना वापरलेली सुई प्रत्येक वेळी उकळत्या पाण्यात निर्जंतुक करून घ्यावी.
  • एकदा फोडलेली लसीची बॉटल त्याचदिवशी संपवावी. ती पुन्हा वापरू नये.
  • लसीकरण करताना कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लस योग्य जागेवर व योग्य मार्गाचा वापर करून द्यावी.
  • गावातील संपूर्ण जनावरांचे लसीकरण शक्यतो एकाच दिवसात पूर्ण  करावे.
  • लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी

  • बैलवर्गीय जनावरांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे. जेणेकरून शरीरावर ताण पडणार नाही.
  • लसीकरणातून चांगली प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी जनावरांना चांगला सकस आहार द्यावा.
  • लसीकरणानंतर जनावरांचे अतिउष्ण व अतिथंड वातावरणापासून संरक्षण करावे. लांब पल्ल्याची वाहतूक करू नये, त्यामुळे जनावरांवर ताण येणार नाही. लसीकरणातून उपयुक्त अशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
  • लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिसादात काही अपाय घडू शकतात, मात्र ते तात्कालिक व सौम्य स्वरूपाचेच असतात.
  • लसीकरणाबाबतचे गैरसमज आणि त्यांचे निरसन  लसीकरण केल्यास गाठी का येतात?

  • घटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांना गाठी येतात हे खरे, परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे हे जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
  • गाठीमुळे जनावरांच्या जिवास धोका निर्माण होत नाही. त्यामुळे लसीकरण करण्यास काहीही हरकत नसावी.
  • लस दिल्यानंतर त्या जागेवर हलके चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीस कोमट पाण्याने शेकल्यास गाठ जिरून जाते.
  •   लसीकरणामुळे जनावरे गाभडतात का ?

  • लसीकरणामुळे जनावरे गाभडत नाहीत, मात्र अशक्त जनावरांमध्ये अगदी क्वचित एखाद्या वेळेस असा प्रकार घडू शकतो. तो ती लस दिल्यानेच होतो असे नाही.
  • गाभण जनावरांना शेवटच्या तीन महिन्यात लसीकरण केल्यास आलेल्या ताणामुळे क्वचितवेळी गर्भपात होऊ शकतो. आंत्रविषार व धनुर्वाताची लस गाभण शेळ्या, मेंढ्यांना दिल्यास विण्याच्या सुमारास त्यांना व पिलांना हे आजार होत नाहीत.  
  •  लसीकरणानंतर दूध कमी होते का? लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होऊ शकते, परंतु ते तात्कालिक असते.

    आजाराची साथ आल्यानंतर लसीकरण केले तर फायदा होतो का?

  • जनावरांना आजार होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे. कारण लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती येण्यास दोन ते तीन आठवडे लागतात. त्यामुळे साथ येण्याआधीच जनावरे आजारास प्रतिकारक बनतात.
  • आजाराची साथ आल्यानंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.
  • लसीकरण कुठल्या वयाच्या जनावरात करावे?

  • घटसर्प व फऱ्या रोगांचे लसीकरण सहा महिन्याच्या वासरात आणि त्यापेक्षा मोठ्या वयाच्या जनावरात करावे.
  • लाळया खुरकुताची लस जर वासराच्या आईला दिली नसेल तर सहा ते आठ आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना द्यावी.
  • आंत्रविषार लस पिलाच्या आईला दिली नसेल तर ती पिलांना पहिल्या आठवड्यात द्यावी. लस दिली असेल तर चार ते सहा आठवडे वय झाल्यानंतर द्यावी.
  • लसीकरण करूनही आजार होऊ शकतो का?

  • नियमित लसीकरण केल्यानंतर घटसर्प, फऱ्या इत्यादी आजार सहसा होत नाहीत. परंतू लाळ्या खुरकूत हा आजार लसीकरणानंतरही एखाद्या वेळी होऊ शकतो. कारण याच्या विषाणूंच्या मुख्य ७  आणि  ६० हून अधिक उपजाती आहेत.
  • आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या ३ उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. याशिवाय इतर उपजातीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव जनावरांना झाल्यास लाळ्या खुरकूत आजार होतो.
  • - डॉ. अनिल भिकाने,९४२०२१४४५३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com