वाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्ब

वाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्ब
वाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्ब

सेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

मे महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक स्तरावर मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आपली शेती  म्हणजे भूमाता. त्यामुळे सुपीक जमीन ही कृषी आणि कृषी संलग्न व्यवसायासाठी अनमोल नैसर्गिक भांडवल आहे. मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी ३०० ते ५०० वर्षांचा कालावधी लागतो. याच मातीवर शेती आणि सजीवसृष्टी अवलंबून आहे. मातीमध्ये प्रामुख्याने खनिज पदार्थ (४५ टक्के), सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजीव (५ टक्के), हवा (२५ टक्के) आणि पाणी (२५ टक्के) हे मुख्य घटक असतात. परंतु या चारही घटकांचे प्रमाण असंतुलित झाले. कारण मातीतील सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजीव या घटकाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असते. कडधान्य पिकांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीमध्ये नत्रस्थिरीकरण करणारे जिवाणू असतात. पिकांच्या वाढीसाठी वातावरणातील नत्र उपलब्ध स्वरूपात पिकांना देण्यासाठी या जिवाणूंची मदत होते. त्यामुळे हे जिवाणू जमिनीत जिवंत स्वरूपात राहावेत यासाठी त्यांचे अन्न म्हणून कडधान्य पिकांचा वाढीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जमिनीवर प्रतिहेक्‍टर ३ ते ५ टन पालापाचोळा पडतो. याचेच रुपांतर सेंद्रिय कर्बामध्ये होऊन जिवांणूकरिता अन्नपदार्थाची सोय होते. परंतु इतर पिकांबाबत असे होत नाही. त्यामुळे इतर पिके घेतल्यानंतर उत्पादित भागापैकी एक तृतीयांश (३३ टक्के) भाग पिकांच्या अवशेषांच्या रुपामध्ये जमिनीमध्ये पुनर्चक्रीकरण केला पाहिजे. त्याद्वारे जमिनीचे पोषण होण्यास मदत होते.

जमिनीच्या पोषणासाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व

  • जमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहण्याकरिता विशिष्ट पीक पद्धतींचा अवलंब करावा लागतो. सेंद्रिय कर्ब टिकण्यासाठी जमीन मशागतीचा प्रकार, पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, सेंद्रिय पदार्थांचा वापर व पुनर्चक्रीकरण या सर्व घटकांचा समावेश होतो.
  • जमिनीतून उत्पादित १/३ भागाचे पुनर्चक्रीकरण झालेच पाहिजे. सतत एकाच पीक पद्धतीचा वापरदेखील सेंद्रिय कर्ब कमी होण्यास कारणीभूत ठरतो.
  • असंतुलित व अयोग्य रासायनिक खतांचा वापर व सेंद्रिय पदार्थांचा किंवा खतांचा कमी किंवा नगण्य वापर यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे.
  • विविध प्रकारच्या जमीन वापराच्या पीक पद्धतीमुळे सेंद्रिय कर्ब टिकून राहण्यास मदत होते.
  • ज्या प्रमाणात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे ज्वलन होत आहे ते प्रमाण वातावरणातील तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरते. तापमान वाढीमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत आहे, त्यामुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढते. याचा वापर झाडांमार्फत झाल्यासच कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण कमी होऊ शकते आणि वातावरणातील तापमान कमी करण्यासाठी हाच एक पर्याय आपल्याकडे आहे.
  • वृक्षलागवड, विविध शेती पद्धती, क्षेत्रीय पिकांसोबत फळझाडांची लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य वापर यांचा वापर करावा.
  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन   एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक म्हणून हिरवळीच्या खतांचा वापर, जिवाणू खतांचा वापर, कृषी व कृषी उद्योगापासून निर्मित उपपदार्थ किंवा टाकावू सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष जमिनीत गाडणे, पीक फेरपालटीत द्विदल पिके, सेंद्रिय खते,गांडूळ खताचा वापर, रासायनिक खतांचा वापर आणि शेतातील काडीकचरा व सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.

  • सर्व अन्नद्रव्यांचा एकत्रित पुरवठा होतो. हळूवार व पिकानुरूप दीर्घकाळ अन्न पुरवठा होत राहतो.
  • जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते. भौतिक व रासायनिक गुणधर्माची सुधारणा होते.
  • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची जोपासना होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकविली जाते.
  • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाय

  •  कमी मशागत व सपाटीकरण करावे.
  •   मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी.
  •  आंतरपीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.
  • जमिनीवर आच्छादनाचा (ऊस पाचट, गव्हाचा भुसा) वापर करावा.
  •  पिकांचे अवशेष (पिकांचे १/३ भाग) न जाळता जमिनीत गाडावेत.
  •  भर खते (शेणखत/कंपोस्ट/गांडूळ खत), हिरवळीचे खते (बोरू, धैंचा, गिरीपुष्प) यांचा नियमित वापर करावा.
  •  शेतीच्या बांधावर वारा गतिरोधक तसेच गिरीपुष्प व हिरवळीची पिके लावावीत.
  • शेतीची पशुसंगोपनाशी सांगड घालावी.
  • - डॉ. हरिहर कौसडीकर, ९४२३१४२२१० (संचालक (शिक्षण), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com