कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...

कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...

मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट करण्यासाठी कडवंचीसारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणात आणि विकेंद्रित स्वरूपात राबविण्याची गरज आहे. यासाठी संबंधित घटकांचे प्रबोधन, प्रशिक्षण आणि सक्रिय सहभागातून हे सहज शक्य आहे. काळाची गरज ओळखून कडवंची गावाने कोरडवाहू शेतीला योग्य दिशा दाखवली आहे.

गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण मराठवाडा सातत्याने दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात अपुऱ्या पावसाबरोबरीने स्थळ आणि कालनिहाय पावसाच्या वितरणामध्ये अतिशय विषमता दिसते. कित्येकदा पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत १५ ते २५ दिवसांचा खंड दिसतोच. यामुळे कोरडवाहू शेतीसाठी विकसित केलेले तंत्रज्ञान उत्पादन स्थैर्याची हमी देऊ शकत नाही अशीच सर्वसाधारण शेतकऱ्यांची धारणा बनू लागली आहे. पर्यायाने शेतकऱ्यांची शेतीमध्ये भावनिक आणि आर्थिक गुंतवणूक कमी होताना दिसते. परंतू कडवंची गाव त्याला अपवाद म्हणावे लागेल. जालना जिल्ह्यातील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून साकारलेले कडवंची पाणलोट क्षेत्र विकासाचे काम मार्गदर्शक आहे. या गावामध्ये मागील दोन दशकाच्या काळात जे काम उभे राहिले, ते निश्चितपणे मराठवाड्यातील कोरडवाहू शेती विकासासाठी दिशादर्शक आहे. साधारणपणे १९९५-९६ ते २००१ च्या दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कडवंची तसेच नांदपूर आणि वाघरुळ गावांच्या शिवारात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून झालेले सामाजिक आणि आर्थिक बदल प्रेरणादायी आहेत. पाणलोटाने दिली दिशा कडवंची गावातील एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासकामाचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब. कृषी विज्ञान केंद्रातर्फे लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पाणलोट कामामध्ये लोकसहभागही महत्त्वाचा ठरला. प्रामुख्याने माथा ते पायथा हे विकासकामांचे तत्त्व ठरवून जल, मृद संवर्धनाची कामे झाली. यामध्ये सलग समतल बांध घालणे, सिमेंट नाले बंधारे, दगडाचे तसेच गॅबियन जाळीचे बांध या कामाचा प्रामुख्याने समावेश होता. याबरोबरच नैसर्गिक साधनसामग्री बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने वनीकरणासारखे पूरक उपक्रम राबविले गेले. जल, मृद संधारणामुळे उपलब्ध पाण्याचा संपूर्ण ताळेबंद मांडून त्यानुसार पीक पद्धतीचा अवलंब झाला. यामध्ये प्रामुख्याने कापूस, मका, हरभरा, उडीद, सोयाबीन या पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला, आले, हळद या नगदी पिकांचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात द्राक्ष, डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. सूक्ष्म सिंचनावर भर  उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केल्यामुळे उपलब्ध जलस्रोतापासून जास्तीत जास्त क्षेत्राला लाभ मिळतो. याबरोबरच उच्चतंत्रज्ञानाचा अवलंब येथील शेतकरी करतात. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी चांगला फायदा झाला. शेडनेट, पॉलिहाउसच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन तसेच भाजीपाला रोपवाटिकांची संख्या वाढत आहे.   सिंचनाच्या सोयीच्या बळकटीकरणामुळे लागवड योग्य पडीक जमिनीचे क्षेत्र घटले. बारमाही पाण्याची उपलब्धता, विहिरी आणि शेततळ्यांमध्ये लक्षणीय वाढ, फळपिके, चारापिकांची लागवड वाढली. पशुपालन व दुग्धव्यवसायामुळे आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाले. शेतकऱ्यांची शेतीमधील गुंतवणूक करण्याच्या क्षमतेमध्ये चांगली वाढ झाली. पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचे निष्कर्ष हैदराबादस्थित कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कडवंची पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांचा सुमारे दोन दशकानंतरच्या परिणामकारकतेचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित केले. या निष्कर्षामध्ये असे म्हटले आहे की, सदर प्रकल्पामुळे पिकांचे वैविध्य, जनावरे व दुग्धविकासामध्ये तसेच रोजगार निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ होऊन लाभार्थी शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीमध्ये भर पडली. विशेष करून सातत्याने या गावशिवारातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असूनही शेततळ्याच्या माध्यमातून उपलब्ध पाण्यामध्ये सतत वाढ झाली आहे.

आर्थिक विकासाला चालना

  • एकंदरीतच पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून कडवंची परिसरातील रोजगार निर्मिती, शेतामधील होणारी गुंतवणूक, त्यापासून दरवर्षी मिळणारे वाढीव उत्पन्न, प्रकिया उद्योगांना चालना यामुळे उत्पादन व शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीमध्ये स्थैर्य आले. यामुळे एकूण सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे.
  •     मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीचे एकूणच चित्र पाहिले तर विशेषत: मागील पाच वर्षात सातत्याने अपुरा पाऊस पडत असून कापूस, ज्वारी, बाजरी, मका व सोयाबीन या प्रमुख पिकांमधील घट ही सरासरी उत्पादनाच्या २५ टक्क्यांपासून ते ४० टक्क्यांपर्यंत आढळून आली आहे. अशी परिस्थिती सर्वच जिल्ह्यांत व्यापक प्रमाणात आहे.
  •     जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचे वितरण तपासून पाहिल्यास मागील पाच वर्षात १० ते १५ दिवसांचे दोन ते तीन खंड विशेषत: पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे पीक उत्पादनातील घट फार मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. मागील काही वर्षापासून पावसाचे तुटीचे प्रमाण आणि पीकवाढीच्या काळातील पावसाचे विषम वितरण याची वारंवारता वाढताना दिसून येते आहे.
  •     शेततळ्याच्या माध्यमातून साठवलेले पाणी जर पावसाच्या खंड काळात पिकांना सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून दिले तर खरीप पिकांच्या उत्पादनातील घट फार मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते. त्याशिवाय अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास तुरीसारख्या पिकाला फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत दिल्यास तसेच रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई पिकांना एक किंवा दोन सिंचन दिल्यास २५ टक्क्यांपासून ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढ सहज मिळू शकते, असे संशोधनाचे निष्कर्ष आहेत. याच बरोबरीने शेततळ्यामुळे फळबागांनाही चालना मिळाली. त्यातून आर्थिक विकास झाला. या तंत्राचा अवलंब कडवंचीमधील शेतकऱ्यांनी केल्याने शेती शाश्वत झाली, पीक उत्पादन आणि आर्थिक उत्पन्नातही चांगली वाढ झाली. जल, मृद संधारण, काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब यातूनच येत्या काळात शेती आणि ग्रामविकास होणार आहे.
  • डॉ. अशोक ढवण कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संपर्क - 02452 223002

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com