कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच यशाचे सूत्र

कडवंची : लोकसहभाग, पाणी  व्यवस्थापन हेच यशाचे सूत्र
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच यशाचे सूत्र

कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर त्यामागे गावकऱ्यांनी जल, मृद संधारणासाठी केलेले श्रमदान, शेतशिवाराची बांधबंदिस्ती, पाण्याचा काटेकोर वापर आणि एकमेकांना केलेली मदत कारणीभूत आहे. शेती विकासाबाबत गावचे माजी सरपंच प्रभाकर क्षीरसागर यांनी मांडलेले मत...

गावात पाणलोटाचे काम होण्यापूर्वी शेतीतून उत्पन्न कमी होतेच, शिवाय प्यायला पाणीही नव्हतं. या दरम्यान खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून १९९५पासून तंत्रज्ञान प्रसाराचे काम सुरू झाले. याच दरम्यान मी गावचा सरपंच (१९९२ ते १९९७) होतो. जेमतेम भुसार पिके, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांची लागवड गाव शिवारात असायची. कृषी विज्ञान केंद्राने कडवंची गावाची पाणलोट कामासाठी निवड केली. गावकऱ्यांनीही प्रतिकूल परिस्थिती बदलासाठी चांगले सहकार्य केले. पीक बदलामध्ये कृषी विज्ञान केंद्राने रेशीम शेतीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला. काही शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली. पण पुढे पाण्याचा प्रश्न उभा राहिला. इंडो-जर्मन प्रकल्प राबविताना गावकऱ्यांनी अपेक्षेपेक्षाही जास्त श्रमदान केले. पाणलोट कामात अडीअडचणी आल्या, पण सर्वांच्या संमतीने त्या दूर केल्या. समजा आठ महिने निसर्गातून पाणी मिळाले तरी चार महिने काढायचे कसे? हा प्रश्न होता. पाण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे पाणलोटाचे चांगले काम झाले.

शेतशिवारात पाणी जिरविले. कमी पाण्यावर कोणते पीक येईल याचा अभ्यास झाला. डाळिंब, ऊस, मोसंबी आदी पिकांचा अभ्यास केल्यानंतर काटेकोर पाण्यात चांगला आर्थिक नफा देणाऱ्या द्राक्षाची निवड आम्ही केली.  द्राक्ष शेतीकडे वळलो त्या वेळी माझ्याकडे १९ एकर २० गुंठे शेती होती. द्राक्ष दीड एकरावर होते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने द्राक्ष लागवड वाढवत गेलो. सध्या ३८ एकरापैकी २५ एकरावर द्राक्ष बाग आहे. संरक्षित पाण्यासाठी तीन शेततळी आहेत. संरक्षित पाणी असेल तरच उत्तम शेती शक्य होते. त्यामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांनी हमखास पावसाच्या भरवशावर न राहता जल, मृद संधारण करत पडलेला पाऊस शेतशिवारात जिरवला. उन्हाळ्याच्या काळात संरक्षित पाण्यासाठी शेततळी तयार केली. शेतीमध्ये ठिबक सिंचन, यांत्रिकीकरणावर भर दिला. यामुळे पिकामध्ये शाश्वता आली, विकासाची दिशा दिसली. आता आम्ही द्राक्षाच्या बरोबरीने पेरू, पपई आणि सीताफळाकडे वळलो आहोत. -  प्रभाकर क्षीरसागर, ९७६५३४५४८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com