दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधार

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधार
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधार

उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या पाणीटंचाईत राज्यातील लिंबू पट्ट्यात उत्पादन कमी झाल्याने आवक कमी झाली आहे. पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीत सध्या प्रतिगोणी ५०० ते ९०० रुपये दर लिंबाला सुरू आहेत. ‘ए‘ ग्रेडच्या लिंबाला ४५ ते ५० रुपये दर मिळतो आहे. जेथे बऱ्यापैकी पाण्याची सोय आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना दुष्काळात या पिकाचा चांगलाच आर्थिक आधार ठरला आहे. 

स ध्या राज्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाई आहे. अनेक शेतमालांचे उत्पादन व आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक आणि वर्षभर तशीही मागणी असलेले फळ म्हणजे लिंबू. पण, दुष्काळामुळे पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीत लिंबाची आवक घटली आहे. थोड्याफार प्रमाणात पाण्याची सुविधा असलेल्या शेतकरी लिंबाचे उत्पादन घेऊन प्रतिकूलतेत आर्थिक आधार शोधताना दिसत आहेत.  यंदा जून ते ऑक्टोबर काळात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे नगर, पुणे, सोलापूर या भागांतील काही शेतकऱ्यांनी लिंबाची लागवड केली. परंतु, सध्याच्या पाणीटंचाईमुळे या लागवडी चांगल्याच धोक्यात आल्या आहेत. पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या मते लिंबाची सर्वाधिक आवक पावसाळा व हिवाळ्यात होते. पावसाळ्यात ही आवक दररोज पाच हजार ते सहा हजार गोण्यांची (प्रतिगोणी वीस किलो) असते. त्या काळात लिंबाचे दर प्रतिकिलो ८ ते १५ रुपयांपर्यंत असतात. शेतकऱ्यांना दरांमुळे आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. पण, बदलत्या हवामानात आणि पाणीटंचाईच्या काळात ठिबक सिंचनाचा वापर करून शेतकरी उत्पादन घेण्याचा प्रयत्न सोडत नाहीत.    लिंबाचे मार्केट

  •   लिंबू पिवळसर झाल्यानंतर काढणी केल्यानंतर मार्केटमध्ये नेतेवेळी ग्रेडिंग व पॅकेजिंग केल्यास अधिक दर मिळण्यास मदत होते.
  •   बाजारात शक्यतो पिवळसर रंगाच्या आणि मोठ्या आकाराच्या लिंबाला चांगली मागणी   
  •   पुणे शहरातील ग्राहकांकडून पसंती
  •   पुणे बाजार समितीत नगर, पुणे मात्र प्रामुख्याने सोलापूर भागातून पुरवठा
  •   आंध्र प्रदेशातून बालाजी जातीच्या लिंबांचीही आवक काही प्रमाणात  
  •   सरबत, रसवंती, गुऱ्हाळ, हॉटेलचालकांकडून मागणी
  •   दर कमी झाल्यानंतर लोणचे तयार करणाऱ्या व्यावसायिकांकडून मागणी
  • लिंबाची वैशिष्ट्ये

  •     अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाणी,
  •    कमी खर्चात येणारे पीक
  •     रोग, किडींच्या नियंत्रणासाठी फवारणीवर खर्च कमी
  •     वर्षभर मागणी
  •     आरोग्याला लाभदायक
  •     वर्षभरात दोन बहार घेणे शक्य  
  •     उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यास चांगले दर मिळविण्याची संधी
  •     एक एकर लागवडीसाठी वेगवेगळ्या अंतरानुसार सुमारे ११० ते ३०० झाडे लागतात
  •     लागवडीनंतर तीन ते चार वर्षांपासून व्यावसायिक उत्पादन सुरू होते
  •     एकरी सुमारे पावणेदोन ते पावणेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते  
  •     लिंबाची विक्री करणारे दहा ते बारा व्यापारी आहेत.
  • महिना  आवक (क्विंटल) किमान कमाल  सरासरी  उलाढाल (रुपये)
    वर्ष २०१८          
    एप्रिल १०३५१  ७००  ८०००  ५०००   १,२५,०००
    जुलै   ९८९२ ३००   १३००   ८००   २०,०००
    नोव्हेंबर  ६८२९   ४०० ५००० २७००  ६७,५००
    डिसेंबर     ९४२६   ३००   ४०००    २२००  ५५,०००
    वर्ष २०१९          
    जानेवारी  ८७२९ ४००    ३३००   २०००  ५०,०००
    फेब्रुवारी  १०,४८६ ४०० २६००  १२००  ३०,०००

    माझी २० ते २२ एकर शेती आहे. यापैकी पाच एकरांत लिंबू आहे. नुकतीच लिंबाची बाग काढून द्राक्षबाग जगविण्यासाठी शेततलाव तयार केला आहे. रोजचा ‘पॉकेटमनी’ मिळवण्याच्या दृष्टीने लिंबाकडे पाहतो. आमच्या गाव परिसरात सुमारे ४०० ते ५०० एकरांवर लिंबू असून, तालुक्यात सात ते आठ हजार हेक्टरवर लिंबू बाग असावी, असा अंदाज आहे.  - रमेश हिरवे, ९४२२७३७७१० पारगावसुद्रिक, ता. श्रीगोंदा, जि. नगर

    माझी पावणेदोन एकर लिंबाची बाग होती. पाण्याअभावी ती काढावी लागली. नवी दीड एकर लागवड केली आहे. सध्या पाणीटंचाईमुळे तीही जगविण्याचे संकट उभे ठाकले आहे. सध्या पुणे येथे बाजार समितीत जाऊन लिंबे खरेदी करून त्यांची आमच्या परिसरात विक्री करण्याचे काम करतो आहे. पाऊसमान चांगले असल्यास उन्हाळ्यात चांगला दर मिळविण्यासाठी बहाराचे योग्य नियोजन करून वर्षाकाठी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची धडपड असते.    - युवराज भगवान गाडे, ९४२१०१८९१४ कर्जत, जि. नगर

    अकरा वर्षांपासून लिंबू विक्रीच्या व्यवसायात आहे. मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून खरेदी करून ग्राहकांना विक्री करतो. दररोज पाच ते सहा गोण्यांचा खप होतो. गोणीमागे ५० ते ६० रुपये मिळतात.   - वेनिला पवार, किरकोळ विक्री व्यावसायिक,   ‘ए‘ ग्रेडला चांगला दर गेल्या ३५ वर्षांपासून लिंबू विक्री व्यवसाय करतो. मार्केटमध्ये सोलापूर भागातून मुख्यत्वे लिंबू येतो. पावसाळ्यात दररोज पाच हजार ते सहा हजार गोण्यांची आवक होते. काही परिस्थितीत हीच आवक दहा हजार पोत्यांपर्यंतही जाते. फेब्रुवारीनंतर आवक कमी होते. सध्या मार्केटमध्ये दररोज जवळपास दीड ते दोन हजार गोण्यांची, तर माझ्याकडे १०० ते १५० गोणी आवक होते. वीस किलो गोणीचा दर ५०० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत आहे. ‘ए‘ ग्रेडच्या मालाला किलोला ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. अन्य ग्रेडला हाच दर किलोला १० ते ३० रुपये मिळतो. यंदा पाणीटंचाईमुळे स्थानिक माल कमी पडल्यास दर वर्षीप्रमाणे हैदराबाद येथून आवक होण्याची शक्यता आहे. गुलटेकडी येथे मोठे व लहान मिळून लिंबाचे सुमारे आठ व्यापारी आहेत. माझी वर्षभराची विक्री चार कोटी रुपयांच्या घरातील आहे. - सुधीर नारायण जाधव, व्यापारी

    गावरान लिंबांना अधिक मागणी असते. माझ्याकडे दररोज ७०० -८०० गोणी आवक होते. आवक जास्त असल्यास सूरत, अहमदाबाद, बडोदा, गुजरात या ठिकाणी लिंबू पाठवतो.  - रोहन विलास जाधव, ९८५०३५९०९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com