आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापन

आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापन
आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापन

आंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी त्यातील तुडतुडे, पिठ्या ढेकण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा अशा १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. आंब्यावरील महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. जगभरात फळमाशीच्या ४०० हून अधिक जाती असून, ही कीड वर्षभर विविध फळपिकांवर आढळते. फळमाशीच्या बॅक्ट्रोसेरा डॉरसेलिस, बॅक्ट्रोसेरा झोन्याटा आणि बॅक्ट्रोसेरा करेक्टा या प्रमुख तीन जाती आंबा पिकावर आढळतात. निर्यातीवेळी आंबा फळामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कटाक्षाने तपासला जातो. तो आढळल्यास मोठे नुकसान होऊ शकते. फळमाशीची ओळख व जीवनचक्र

  • प्रौढ : आंबा पिकातील फळमाशी पिवळसर सोनेरी रंगाची असून, आकाराने घरमाशीपेक्षा थोडी मोठी असते. 
  • अंडी : सामान्यतः काढणीस तयार झालेल्या फळांमध्ये मादी फळमाशी अंड नलिकेच्या साह्याने फळाच्या  सालीखाली पुंजक्यात अंडी घालते. एक मादी  फळमाशी सुमारे  १०० - ३००  अंडी एका पुंजक्यात घालते. 
  • अळी : अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची व डोक्याकडे निमुळती असते. अळी गरावर उपजीविका करते, त्यामुळे फळे कुजतात. खाली गळून पडतात. परिणामी अशी फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. अळी अवस्था १० ते  १५ दिवसांची असते. 
  • कोष : पूर्ण वाढलेल्या अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोष अवस्था ८ ते १२ दिवसांची असते. कोषामधून फळमाशीचे प्रौढ किटक बाहेर येऊन पुन्हा अंडी देतात. अशा प्रकारे फळमाशीच्या एका वर्षात ७ ते ८ पिढ्या पूर्ण होतात.
  • नुकसान :- आंबा पिकामध्ये २५ ते ४० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव आढळून येतो.  फळांची गुणवत्ता कमी होते. ती खाण्यायोग्य राहत नाहीत. व्यवस्थापन :-

  • फळांची काढणी योग्य वेळी करावी. झाडावर फळे पक्व होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • फळमाशीग्रस्त, बागेत खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. यातून फळमाशीची उत्पत्ती वाढते.
  • बॅक्ट्रोसेरा डॉरसेलिस या जातीच्या फळमाशीची कोषावस्था जमिनीत २ ते ३ सेंटिमीटर खोलीपर्यंत असते. झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी. या मातीमध्ये शिफारशीत दाणेदार कीटकनाशक मिसळावे.
  • प्रदुर्भावाच्या काळामध्ये झाडाखालची माती खुरप्याने २ ते ३ सेंटिमीटर उकरून त्यावर क्लोरोपायरीफॉस २ मिली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे तयार केलेले द्रावण माती पूर्णपणे ओली होईपर्यंत फवारावे.
  • या किडीची अळी अवस्था ही फळाच्या आत असल्याने त्यांच्यापर्यंत रासायनिक कीटकनाशक पोहचत नाही. नियंत्रणासाठी फवारणीऐवजी सापळ्यांचा व विषारी आमिषाचा वापर करावा.
  • रक्षक सापळे :- या सापळ्यामध्ये एक कुपी असून, त्यात मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा ठेवतात. मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्या सापळ्यामध्ये आकर्षित होतात. आतमध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात. प्रमाण :- हेक्टरी २० ते २५ सापळे. पिकाच्या उंचीप्रमाणे ४ ते ५ फूट अथवा झाडावर टांगून ठेवावेत. काळजी : १८ ते २० दिवसांनी मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा बदलावा. सापळ्यातील मेलेल्या माश्या काढून सापळे स्वच्छ ठेवावेत. विषारी आमिष :- फळमाशीच्या तोंडाचे अवयव केवळ द्रवरूप स्वरुपात पदार्थ खाण्यायोग्य असतात. त्यांच्यासाठी विषारी आमिष तयार करताना खराब फळे, गुळ 200 ग्रॅम अधिक  मॅलॅथिऑन (५० टक्के ई.सी.) २० मि.लि. प्रति २० लिटर पाणी या द्रावणाकडे फळमाश्या आकर्षित होतात. अशा अमिषांचा उपयोग बागेमध्ये ठिकठिकाणी करावा. डॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक) , ९४२१६२१९१० विलास खराडे ( पीएच.डी. स्कॉलर), ९४२१५९६१७९ (कृषि कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com