मखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले यांत्रिकीकरण

मखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले यांत्रिकीकरण
मखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले यांत्रिकीकरण

बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये मखनाची लागवड करून, त्याच्या बियांपासून लाह्या बनविण्याचा उद्योग पसरलेला आहे. या लाह्या बनवण्याच्या पारंपरिक उद्योगामध्ये २ ते ३ दिवस आणि कुशल मजुरांची आवश्यकता असे. लुधियाना येथील काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने मखना काढणीनंतर मळणी, प्रतवारी आणि लाह्या बनविणे या प्रक्रियेसाठी यंत्रे निर्माण केली आहेत. त्यामुळे वेळ वाचण्यासोबतच मखना लाह्यांचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. गोर्गोन नट किंवा मखना हे पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतीचे बी आहे. तळ्यामध्ये त्याची लागवड बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि ओडिशा या राज्यामध्ये होते. एकट्या बिहारमध्ये १५ हजार हेक्टर तलावांमध्ये त्याचे उत्पादन घेतले जाते. या मखना उत्पादन, काढणी, लाह्या करणे आणि विक्री अशा व्यवसायामध्ये सुमारे ५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. ७५०० ते १० हजार टन मखना लाह्या बिहारमध्ये दरवर्षी विकल्या जातात. मखना बिया भाजून, त्यापासून लाह्या तयार केल्या जातात. या लाह्या अत्यंत पोषक असून, भारतासह जगभरामध्ये गोर्गोन नट ड्रायफ्रूट म्हणून लोकप्रिय आहेत. या व्यावसायिकरीत्या मखना या नावाने ओखळल्या जातात. मखना बियांचा वापर विविध धार्मिक प्रथांमध्ये किंवा भाज्या, गोड पदार्थ, विविध खिरींमध्ये केला जातो. वेळखाऊ पारंपरिक प्रक्रिया ः मखनाच्या लाह्या तयार करण्याची प्रक्रिया ही अधिक मजूर लागणारी, वेळखाऊ आणि त्रासदायक आहे. या तीनस्तरीय प्रक्रियेमध्ये बिया मातीच्या किंवा बिडाच्या कढईमध्ये भाजल्या जातात. त्याचे तापमान २५० ते ३२० अंश सेल्सिअस इतके उच्च ठेवावे लागते. दोन ते तीन दिवस सामान्य तापमानाला ठेवून पुन्हा एकदा भाजल्या जातात. आणि मॅलेटच्या साह्याने उष्णतेमध्ये दाबल्याने त्याच्या लाह्या तयार होतात. ही मॅलेटिंगच्या प्रक्रियेसाठी अधिक कौशल्याची गरज असते. कमी किंवा जास्त दाबले गेल्यास मखनाचा दर्जा खराब होतो. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या लुधियाना येथील केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेतील (सिफेट) संशोधकांनी मळणी, स्वच्छता, बियांची प्रतवारी, वाळवणे, भाजणे, लाह्या तयार करणे या सर्व कामांसाठी खास यंत्रे विकसित केली आहेत. या यंत्रामुळे मखना काढणी आणि त्यांनंतरच्या प्रक्रिया सोप्या आणि सुलभ होण्यास मदत होत आहे. यातून मखना स्थानिक बाजारपेठेसह निर्यातीसाठीचा उच्च दर्जा राखणे शक्य होते. यंत्र आणि त्याची वैशिष्ट्ये ः

  • या यंत्रामध्ये भाजण्याची प्रक्रिया ही बंदिस्त बॅरलमध्ये विद्युत पद्धतीने गरम केलेल्या विशिष्ट तेलांद्वारे (थर्मिट ऑइल) पार पाडली जाते. उष्णता देण्यासाठी गरज आणि उपलब्धतेनुसार कोणत्याही स्रोतांचा वापरही करता येतो. हा बॅरल पूर्ण उष्णतारोधक बनवलेला असल्याने तिथे काम करणाऱ्या माणसांचे उच्च उष्णतेपासून संरक्षण होते.
  • या यंत्रामध्ये मॅलेटिंग करण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया बंदिस्त केसिनमध्ये काही सेकंदांमध्ये आपोआप होऊन भाजलेल्या बियांच्या लाह्या तयार होतात. भाजण्यापासून लाह्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याने माणसांचे उच्च उष्णतेपासून संरक्षण होते.
  • या देशी पिकांच्या लाह्या करण्याच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण केले आहे.
  • या यांत्रिकीकरणामुळे मखनाच्या लाह्या करण्याच्या प्रक्रियेसाठीचा कालावधी २ ते ३ दिवसापासून कमी करत केवळ २० तासांवर आणण्यात यश आले आहे.
  • यंत्राद्वारे तयार केलेल्या लाह्यांचा दर्जा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या लाह्यांचा तुलनेमध्ये चांगला राहतो. परिणामी बाजारात पारंपरिक मखना लाह्यांच्या तुलनेमध्ये प्रति किलो ५० रुपयांपर्यंत अधिक दर मिळतो.
  • यंत्रनिर्मितीसाठी व्यावसायिक करार ः

  • या यंत्राची व्यावसायिक निर्मिती ही दोन उद्योगाकडून देशातील पाच ते सहा ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी करार करण्यात आला आहे.
  • मखना हे पाण्यात वाढणारे पीक असून, त्याची लागवड भारतामध्ये प्रामुख्याने बिहारसह पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये केली जाते. काढणीनंतरच्या प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरण झाल्यामुळे देशातील मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, तेलंगाना, हरियाना, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांमध्ये मखना लागवड, व्यापार, मूल्यवर्धन आणि विक्री यामध्ये अनेक उद्योजक उतरू शकतातत. अलीकडे विकसित देशांतून मखनाच्या लाह्यांना मागणी वाढत आहे.
  • राष्ट्रीय संशोधन आणि विकास कार्पोरेशन (एनआरडीसी) यांनी या संशोधनाला २०१४ चा सामाजिक नाविन्यता पुरस्काराने गौरविले आहे.
  • बिहार राज्य शासनाकडून या यंत्रासाठी अनुदान देणे सुरू झाले आहे.
  • उद्योजकता आणि रोजगाराला चालना ः

  • यंत्राच्या निर्मितीसाठी सुमारे १५ लाख रुपये भांडवलासह सुमारे ५ लाख खेळते भांडवल प्रति महिना आवश्यक असून, या उद्योगाचा ब्रेकइव्हन पॉइंट सहा महिन्यांपर्यंत गाठता येतो. यातून ग्रामीण उद्योजकतेसोबतच रोजगाराला चालना मिळू शकते.
  • यांत्रिकीकरणामुळे विविध राज्यांमध्ये तलावामध्ये मखना लागवड आणि लाह्या बनविण्याचा उद्योगही बहरू शकतो. सध्या मासेमारी करणाऱ्या लोकांना मखना लागवड आणि काढणीपश्चात व्यवसायामध्ये चांगल्या संधी आहेत.
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या मखनापासून शिजवण्यासाठी तयार मखना खिर विकसित केली आहे. या मूल्यवर्धित उत्पादनामध्ये पहिल्या प्रतीच्या मखनाबरोबरच उर्वरित मखनालाही चांगला दर मिळू शकतो. सध्या या खिरीच्या उत्पादनाचा परवाना तीन नवउद्योजकांनी घेतला असून, आपला व्यवसाय दरभंगा, बिहार, बुद्दी, हिमाचल प्रदेश आणि राजेंद्रनगर, हैदराबाद, तेलंगाना येथे उभा करत आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com