बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम सायनामाइड`

बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम सायनामाइड`
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम सायनामाइड`

सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम सायनामाइड या खताची कार्यक्षमता वाढते. ते पिकास दीर्घकाळ उपलब्ध होते. त्यातील नत्राचे प्रमाण १९.५ टक्के असून, त्यातील त्वरीत उपलब्ध नायट्रेट स्वरूपामध्ये १.५ टक्के नत्र असते.

जमिनीची सुपीकता, जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यावरून ठरवली जाते, तर पिकांची वाढ ही जमिनीमधील व पिकांना उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्यामुळे होते. पिकांच्या वाढीसाठी नायट्रोजन(N), फॅास्फरस(P), पोटॅशियम (K) ही तीन मुख्य अन्नद्रव्ये आवश्यक असतात. त्यातील नत्राचे प्रमाण सर्वात अधिक असते. नत्र हे झाडाच्या पेशी विभाजन व पेशींच्या वृद्धीसाठी उपयुक्त असते.  नत्राच्या कमतरतेमुळे दिसणारे परिणाम

  • पिकांची वाढ खुंटते. पिकांची वरील पाने फिकट पिवळी, तर खालील पाने पिवळी होतात. पानांची वाढ खुंटते. जुन्या पानांची टोके जळतात. फुलांची वाढ होत नाही. खोड मऊ पडते. मुळांची वाढ खुंटते. याचा पुरावठा भरखते तसेच वरखतांमधून केला जातो. नत्राची पिकांच्या वाढीसाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील गरज ही मुख्यत्वे करून रासायनिक खतांद्वारे भगविली जाते. नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेट, कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट, अमोनिअम सल्फेट नायट्रेट, युरिया यांचा प्रामुख्याने वापर होतो. त्यातही युरियाचा वापर सर्वाधिक आहे. वापरलेल्या युरिया खताची उपयोगिता ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आढळते. उर्वरित मात्रा पाण्यासोबत निचरा होऊन जाते किंवा हवेमध्ये उडून जाते. यामुळे जमीन, पाणी व हवेमध्ये प्रदूषण वाढते. याला उत्तम पर्याय ठरू शकेल असे खत कॅल्शियम सायनामाईड (CaCN) हे ठरू शकते. हे नैसर्गिकरीत्या संथगतीने पिकांना उपलब्ध होणारे नत्रयुक्त रासायनिक खत आहे. याची उपयोगिता ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
  •      कॅल्शियम सायनामाईड या खतात कॅल्शियम व नायट्रोजन हे सायनामाईड स्वरूपात असून, नत्राचे प्रमाण १९.५ टक्के असते. त्याव्यतिरिक्त १.५ टक्का नत्र सहज उपलब्ध होणाऱ्या नायट्रेट स्वरूपात असते. पीक उत्पादनामधील हे एक अत्यंत कार्यक्षम नत्रयुक्त खत आहे. हे खत सायनामाइड (NCN) या बायडिंग स्वरूपात आहे. हे खत जमिनीत टाकल्यानंतर जमिनीतील ओलाव्याशी संपर्क येताच त्याचे नायट्रोसोमन्स व् नायट्रोबॅक्टर या जीवाणूद्वारे विघटन होते. अमोनियाच्या स्वरूपातील नत्रामध्ये रुपांतर होऊन जमिनीत मिसळते. हे अमोनियम नायट्रेटचे धनभारीत आयन मातीच्या कणांना चिकटून बसतात. परिणामी यातील नत्र निचरा होऊन जात नाही. सावकाश उपलब्ध होत राहते. ते पिकांच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत आवश्यकतेनुसार उपलब्ध होते.
  •  कॅल्शिअम सायनामाइड या खताची जमिनीमध्ये मात्रा दिल्यानंतर ७ ते १० दिवसात हे खत युरियामध्ये रुपांतरीत होते. नायट्रीफिकेशन प्रक्रियेद्वारे नायट्रेटमध्ये रुपांतर होते. त्यात डाय सायनामाईड हा घटक तयार होतो आणि नायट्रीफिकेशनची क्रिया मंदावते. परिणामी हे खत पाण्याद्वारे वाहून जात नाही. संथ गतीने पिकांना उपलब्ध होते.
  • भौतिक गुणधर्म

  • शुद्ध स्वरूपात याचे स्फटिक षटकोनी आकाराचे, चमकदार व पांढऱ्या रंगाचे असतात.
  • व्यापारीदृष्ट्या खत निर्मितीमध्ये त्याला गडद करडा ते काळा रंग प्राप्त होतो. हे दाणेदार स्वरूपात असते. हे खत ११५० अंश सेल्सिअस तापमानाला उकळते, तर १३०० अंश सेल्सिअस तापमानाला वितळते. सामान्य स्थितीत साठवणुकीसाठी उत्तम खत आहे.
  • घनता २.२९ ग्रँम /घन सेमी एवढी आहे.
  • कॅल्शियम सायनामाईड हे खत पाण्यात अविद्राव्य आहे. जमिनीत टाकल्यानंतर त्याचा पाण्याशी संपर्क येताच विघटन होऊन, त्यापासून अमोनियाच्या स्वरूपात नत्र उपलब्ध होते. अन्य खतांच्या तुलनेत पाण्याद्वारे निचरा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
  • कॅल्शिअम सायनामाइडची उपयुक्तता

  • यात १९.५ टक्के नत्राव्यतिरिक्त २० टक्के कॅल्शियम ऑक्साईड (CaO) असते. परिणामी आम्लयुक्त जमिनीची आम्लता कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढते.
  • या खतामुळे जमिनीमधील पूर्वीच्या पिकांचा अवशेषांचे लवकर विघटन होते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  • डोंगराळ व अति पावसाच्या प्रदेशातील आम्लयुक्त जमिनीत हे खत इतर खतांपेक्षा जास्त परिणामकारक व उपयुक्त ठरते.
  • हे सुरुवातीच्या काळात बुरशीनाशक, सुत्रकृमीनाशक, कीडनाशक म्हणून उपयोगी ठरते. तणांचे बी रुजण्यास हे प्रतिबंध करते.
  • खताच्या वापरामुळे नत्र मात्रेमध्ये भातासारख्या पिकांमध्ये २५% आणि भाजीपाला, फळपिकामध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत बचत होते.
  • या खतामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. हवेतील नत्र स्थिरीकरण होऊन ते पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते.
  • खत कसे वापरावे?

  • पिकासाठी शिफारशी नत्र मात्रेपैकी १/३ मात्रा कॅल्शिअम सायनामाइडद्वारे व २/३ मात्रा युरिया किंवा अन्य नत्रयुक्त खताद्वारे पेरणी किंवा लावणीपूर्वी ७ ते १० दिवस आधी द्यावी. वार्षिक/बहुवार्षिक पिकामध्ये (उदा. फळपिके) छाटणीनंतर खत मात्रा देताना याचा वापर करावा.
  • वापरताना घ्यावयाची काळजी
  • या खताचा त्वचेशी किंवा डोळ्यांशी जवळून संपर्क आल्यास त्वचेला खाज सुटते, डोळे जळजळणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे असे परिणाम जाणवतात. यामुळे खत वापरताना हातमोजे घालून व डोळ्यास गॉगल लावावा. जमिनीमध्ये ओलावा असताना तसेच खत वापरानंतर त्वरित पाणी देण्याची सोय असेल अशा वेळीच या खताचा जमिनीत वापर करावा.हे खत युरियाप्रमाणे लवकर पाणी शोषून घेते, त्यामुळे एचडीपीई/ पॅालीप्रोपिलीन पिशव्यांमध्ये साठवावे. ओलसर किंवा दमट जागी साठवणूक करू नये.
  •  ः डॉ. सु. शं. अडसूळ, ९०११०३००३३, ९४२२०८४८३३ (सेवानिवृत्त कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com