उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाची

क्रीम सेपरेटर
क्रीम सेपरेटर

प्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता तपासणी, दूध पाश्चरायझेशन व पॅकेजिंग या गोष्टी आवश्यक असतात. प्रकल्पामध्ये विविध यंत्रणांची गरज असते. यंत्रणेमधून दुधाचे निर्जंतुकीकरण होऊन साठवणक्षमता आणि गुणवत्ता वाढवली जाते.

कच्चे दूध विकण्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धन करून विकले असता, जास्त नफा मिळतो. दुधाचे व्यावसायिक स्तरावर वितरण करायचे झाल्यास त्यास काही बाबी आवश्यक असतात.दूधप्रक्रिया प्रकल्पामध्ये शीतकरण सयंत्र (मिल्क कूलिंग सिस्टिम), दूध साठवण सायलो, पाश्चरायझर, होमोजिनायझर, बॉयलर, क्रीम सेपरेटर, वॉटर सॉफ्टनर, पॅकेजिंग यंत्रणा, शीतगृह , जनित्र (जनरेटर) व कॅन वॉशर इत्यादी यंत्रणांची आवश्यकता असते. दुधाची दैनंदिन विक्री क्षमता आणि संकलन यावर प्रकल्पाची क्षमता अवलंबून असते. सध्याची विक्री क्षमता आणि भविष्यात होणारी वाढ या गोष्टी लक्षात घेऊन प्रकल्पाची आखणी करावी.आपला प्रकल्प उभारणीपूर्वी  परिसरातील प्रकल्पांचा अभ्यास करावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रकल्पातील घटक दूध रिसेप्शन विभाग : येथे शेतकऱ्यांकडून आलेले कच्चे दूध तपासून थंड सायलोमध्ये साठवले जाते. जेणेकरून ते पुढील प्रक्रियेपर्यंत टिकून राहते. पाश्चरायझर : यामध्ये दुधाचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. एका विशिष्ट तापमानावर दुधाला गरम करून परत लगेच थंड केले जाते. क्रीम सेपरेटर : यामध्ये साय (क्रीम) दुधापासून वेगळी केली जाते. याचा उपयोग तूप बनवण्याकरिता होतो. होमोजिनायझर : दुधावर उच्च दाबावर प्रक्रिया केले जाते. यामुळे दुधावर साय येत नाही. शीतगृह (कोल्ड रूम) : उत्पादित पदार्थ हे कमी तापमानावर साठविले जातात.   आईस बँक टॅंक : थंड पाण्याची निर्मिती केली जाते. हॉट वॉटर जनरेटर : याचा उपयोग गरम पाणी, तसेच वाफ बनवण्याकरिता होतो. यामध्ये बॉयलर असतो. वॉटर सॉफ्टनर : पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा हॉट वॉटर जनरेटर आणि इतर ठिकाणी उपयोग केला जातो. जनित्र : वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गरजेचा आहे. दूध गुणवत्ता तपासणी विभाग : दुधाची गुणवत्ता, तसेच निर्मित पदार्थांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. प्रकल्प उभारणी करताना बाजारपेठ : योग्य बाजारपेठ व मागणी असल्याशिवाय दूधप्रक्रिया प्रकल्प उभारू नये. स्थान : प्रकल्पाचे स्थान हे मुख्य बाजारपेठ आणि दूध संकलन केंद्रापासून फार लांब असू नये. जेणे करून वाहतुकीचा खर्च कमी राहील. प्रकल्प कुठल्याही प्रदूषित ठिकाणी उभारू नये. कामगार  उपलब्धता : कुशल व अकुशल कामगार हे आवश्यक  घटक  आहेत. कच्च्या मालाची उपलब्धता : दूध व इतर कच्चा माल हा सतत उपलब्ध असावा. भविष्यातील वाढ :   प्रकल्पाची क्षमता ही भविष्यातील दूधप्रक्रियेमध्ये होणारी वाढ विचारात घेऊनच ठरवण्यात यावी. जेणेकरून उपलब्ध यंत्रणेमध्ये थोडा फार बदल करून क्षमता वाढवता येते, खर्च वाचतो. मूल्यवर्धित पदार्थांचे प्रक्रिया नियोजन : दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सकाळ व संध्याकाळी येणाऱ्या दुधाचे योग्य नियोजन करून त्या प्रकारे पदार्थांची निर्मिती करावी. किती प्रमाणात दूध पिशवी निर्मिती व पदार्थ निर्मिती करावी याचे गुणोत्तर ठरवावे. संपूर्ण आठवड्याचे नियोजन एकदाच करावे. त्याप्रमाणे प्रकल्प चालवावा. प्रकल्पातील प्रत्येक उपकरणांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पॅकेजिंग व लेबलिंग : दूध पिशवी पॅकेजिंगकरिता पॉलिफिल्म डिझाइन करावी. त्यावर कंपनीचा लोगो असावा. वेष्टनावरील माहिती  अन्न सुरक्षा मानकांनुसार असावी. सयंत्र देखरेख : उपकरणांची देखरेख वेळेवर करावी. जुने व जीर्ण झालेले भाग त्वरित बदलावेत. वितरण वाहने : उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी शीत वाहनांचा उपयोग करावा.  

  • उत्पादक कंपनीनुसार प्रकल्पातील यंत्रणेचे दर बदलू शकतात. सरासरी अंदाजासाठी ही माहिती दिली आहे.
  •  प्रकल्पामधील यंत्रांचा खर्च हा साधारणतः ३५-४५ लाख रुपये एवढा होऊ शकतो. प्रकल्पा व्यतिरिक्त बांधकाम खर्च  ७ ते १० लाख रुपये होईल.
  • मूल्यवर्धित पदार्थ जसे पनीर, खवा, दही, ताक, तूप इत्यादी पदार्थांच्या निर्मिती करीता वेगळी यंत्रे लागतात. त्यावरील खर्चात समावेश केलेला नाही.
  • उपलब्ध बाजारपेठ व मागणीनुसार पदार्थ निर्मिती यंत्रे घ्यावीत. याकरिता बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करावा.
  • -  डॉ. रूपेश दातीर, ८०५५९६२२९४ -  डॉ. सुवर्तन  रणवीर, ७४०४९४०७५९ (डॉ.रूपेश दातीर हे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, बेंगलूरू आणि डॉ. सुवर्तन रणवीर, डॉ. विजय केळे हे पारुल विद्यापीठ, बडोदा, गुजरात येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com