agricultural stories in marathi, post harvesting in bael fruit | Agrowon

घरगुती प्रक्रियेतून बेलफळापासून बनवा मूल्यवर्धित पदार्थ
डॉ. आर. टी. पाटील
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

बेल झाड औषधी असून, घरगुती पातळीवर विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती शक्य आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या वाया जाणाऱ्या या फळांच्या प्रक्रियेविषयी या लेखातून जाणून घेऊ.

बेल झाड औषधी असून, घरगुती पातळीवर विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती शक्य आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या वाया जाणाऱ्या या फळांच्या प्रक्रियेविषयी या लेखातून जाणून घेऊ.

आपल्या संस्कृतीमध्ये शंकराच्या पूजनासाठी बेलाच्या पानांचे महत्त्व सर्वांना ज्ञात असले तरी त्यांच्या फळांचा वापर फारसा होत नाही. हे फळ तपकिरी छटा असलेले हिरवे असून, पिकल्यानंतर मातकट पिवळे पडते. त्यावरील कठीण कवचामुळे ते फोडण्यासाठी हातोडी किंवा जड दगडाचा वापर करावा लागतो. फळ फोडल्यानंतर तंतुमय पिवळा गर असून, त्यात केसाळ अशा बिया दिसून येतात. गोलाकार असलेले हे फळ पिकण्यासाठी ११ महिन्यांचा कालावधी लागतो. फळांची चव ही किंचित चिंच आणि लिंबाप्रमाणे असते. त्याच्या चवीचा घटका आणि गुलाबाप्रमाणे मंद सुवास, यामुळे फळ अनेकांना आवडू शकते. ही फळे ५ ते २० सेंमी आकाराची असतात. या फळांच्या गराचा वापर नारळ दूध किंवा अन्य पेयांमध्ये करता येतो. त्याचप्रमाणे काही भागामध्ये कच्च्या अवस्थेमध्ये फळाची चटणी केली जाते. बेलाच्या पानाचा वापर सॅलडमध्ये केला जातो. पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचा झालेला गर हा चवीला गोड लागतो. त्याचा वापर पेयांच्या निर्मितीमध्ये केला जातो. त्याला इंग्रजीमध्ये वूडअॅपल मिल्क असे म्हणतात.

बेल फळाचे आरोग्यदायी गुणधर्म ः

 • बद्धकोष्ट, अपचन, अल्सर, मूळव्याध, श्वसनाशी संबंधित समस्या, जुलाब आणि अतिसार अशा अनेक समस्यांवर बेल फळ औषधी मानले जाते.
 • विविध जिवाणू आणि विषाणूजन्य प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त.
 • विविध आजारातील दाह व वेदना कमी करण्यासाठी फायद्याचे.
 • स्तनदा मातांच्या दुधामध्ये वाढीसाठी उपयुक्त.
 • मधुमेहावरील उपचार आणि लैंगिक अक्षमता रोखण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

बेलातील पोषक घटक ः
विविध जीवनसत्त्वं, पोषक घटक आणि सेंद्रिय संयुगाने परिपूर्ण असलेल्या फळामध्ये टॅनिन, कॅल्शिअम, फॉस्फरस, तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि अॅण्ड्रीऑन घटक असतात. त्यामुळे औषधी मूल्य वाढते.

 • पाचक ः आतड्यातील जंताचे प्रमाण कमी करते. अपचनाच्या बहुतांश समस्यांमध्ये उपयुक्त असून, तीव्र जुलाबाच्या स्थितीमध्ये उपचारामध्ये बेल फळांचा वापर केला जातो. बेलाचे खोड आणि फांद्यामध्ये डिंकाप्रमाणे येणाऱ्या चिकट स्त्रावाला फेरोनिया गम म्हणतात. त्याचा वापर अतिसार आणि जुलाबावरील उपचारात करतात. पेप्टिक अल्सर आणि मूळव्याधावरील उपचारामध्ये बेल फळाची वापर सूचवला आहे. तसेच बेल पानामध्ये टॅनिनचे अधिक प्रमाण असल्यामुळे दाह कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरतात. यात बुरशीविरोधी आणि परजिवी विरोधी गुणधर्म असल्याने बेल फळाचा वापर पचनाशी संबंधित विविध आजारांमध्ये करता येतो.
 • रक्तशुद्धी ः रक्तशुद्धीसाठी अत्यंत कमी प्रमाणात (५० मिलिग्रॅम) बेल फळांचा रस गरम पाण्यामध्ये साखरेसह मिसळून दिला जातो. त्यामुळे शरीराला हानिकारक असलेली विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. त्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडावरील ताण कमी होतो.
 • कानदुखीसाठी ः कानदुखीवरील उपचार आणि वेदना कमी करण्यासाठी बेलाच्या मुळांचा वापर केला जातो.
 • स्कर्व्ही रोगापासून बचावासाठी ः अॅस्कॉर्बिक अॅसिड किंवा क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणाऱ्या स्कर्व्ही रोगाला रोखण्यासाठी क जीवनसत्त्वाने परिपूर्ण असलेले बेलफळ उपयुक्त ठरते. तीव्र आजाराचा धोका त्यामुळे कमी होतो. प्रतिकारकशक्ती वाढ करते.
 • मधुमेह नियंत्रणासाठी ः बेलाच्या फांद्या व खोडावर येणारा फेरोनिया गम मधुमेहावरील उपचारामध्ये मोलाचा ठरतो. तो रक्तप्रवाहातील शर्करेचा प्रवाह, साठवण यामध्ये सुरळीतपणा आणतो. त्यामुळे तीव्र मदूमेहाच्या स्थितीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतो. इन्सुलिन आणि शर्करेच्या पातळीचे योग्य व्यवस्थापन करतो.
 • श्वसनसंबंधित आजारांमध्ये ः बेलाची पाने सर्दी किंवा श्वसनाशी संबंधित आजाराचे प्रमाण कमी करतात. घशातील जखमा आणि खोकल्यावरील उपचारामध्ये उपयुक्त ठरतात. कफ पातळ करून बाहेर काढण्यामध्ये उपयुक्त असून, श्वसनाच्या तक्रारी कमी होतात.
 • मूत्रपिंडा(किडनी)च्या आरोग्यासाठी ः नियमित व योग्य प्रमाणात बेलफळांचा वापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये मूत्रपिंड संबंधित आजार होत नाहीत. रक्तातील विषारी द्रव्ये काढून टाकत असल्याने किडनीवरील ताण कमी होतो.
 • यकृताच्या आरोग्यासाठी ः बेलफळातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे यकृत समस्यांवरील उपचारात वापर होतो. त्यातील थायामीन आणि ड्रायबोफ्लाविन हे दोन्ही घटक यकृताच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. हृदयासाठी टॉनिक म्हणूनही हे फळ उपयुक्त ठरते.
 • सर्पदंशावरील आयुर्वेदिक उपचारामध्ये बेलफळांचा वापर केला जातो.
 • मलेरियापासून संरक्षण ः डेंग्यू आणि मलेरियाचा सातत्याने प्रादुर्भाव होत असलेल्या प्रदेशामध्ये बेलफळाचा गर त्वचेवर लावल्यास डास दूर राहून, या रोगापासून बचाव होत असल्याचे संशोधन प्रकाशित झाले आहे. थायलंड आणि म्यानमार या देशाच्या सीमावर्ती भागामध्ये बेलफळाच्या गराचा वापर महिला सौदर्यवर्धक घटकांमध्ये करतात. किंचित गरमपणाच्या जाणिवेशिवाय या गराच्या थराने अन्य कोणताही त्रास होत नाही. त्याचप्रमाणे अन्य डास विरोधी घटकांच्या तीव्र वासापासून सुटका होते.

महत्त्वाची सूचना ः
बेल व त्यासबंधित घटकांचा वापर अत्यंत योग्य प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. अन्यथा अतिरिक्त वापरामुळे पोटदुखी होऊ शकते. जर या आधी बेलफळाचा आहारात कोणत्याही प्रकारे वापर केलेला नसल्यास प्रथम अत्यंत कमी प्रमाणात वापर करून आपले शरीर त्याला कसा प्रतिसाद देते, हे पाहून पुढील उपचार करावेत. कोणतीही अॅलर्जी दिसून आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

बेलफळाची काढणी आणि साठवण ः

फळांची काढणी शक्यतो फिक्कट हिरवा रंग आल्यानंतरच्या स्थितीमध्ये करावी. अशी फळे ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये १५ दिवसापर्यंत राहू शकतात. त्यापेक्षा अधिक पिवळी किंवा पक्व फळे ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये आठवड्यापर्यंत राहू शकतात. पक्व फळांची साठवणूक ९ अंश सेल्सिअस तापमान व ८५ ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये तीन महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे करता येते. त्यानंतर मात्र देठाजवळ बुरशीची वाढ होते. काही वेळा कवचामध्ये भेगा पडतात.

काढणीपश्चात तंत्रज्ञान ः

 • काढणीनंतर त्यातील कच्ची व अपक्व फळे वेगळी काढून ठेवावीत.
 • आकारानुसार फळांची प्रतवारी करावी.
 • १०० पीपीएम क्लोरीन मिसळलेल्या पाण्याने फळे स्वच्छ धुवून घ्यावीत.

गर काढण्याची प्रक्रिया ः

 • फळावरील आवरण कठीण असल्याने फळे तोडण्यासाठी जाड चाकू किंवा बेल फळ तोडण्याच्या यंत्राचा वापर करावा. चमच्याच्या साह्याने आतील गर बिया व तंतूसह काढून घ्यावा. कवच टाकून द्यावे.
 • गरामध्ये एकास एक प्रमाणामध्ये पाणी टाकून चांगले मिसळून घ्यावे.
 • हे मिश्रण ८० अंश सेल्सिअस तापमानाला एक मिनीट गरम करावे.
 • प्रति किलो गरामध्ये पाच ग्रॅम या प्रमाणात सायट्रिक अॅसिड मिसळून घ्यावे.
 • हे मिश्रण पल्पिंग मशिन किंवा २० मेश आकाराच्या स्टेनलेस स्टिल चाळणीतून गाळून घ्यावे. या टप्प्यामध्ये सर्व बिया आणि तंतू वेगळे केले जातात.
 • प्रति किलो गरामध्ये १.५ ग्रॅम सोडियम मेटाबायसल्फेट मिसळावे.
 • हा गर हवाबंद झाकण लावून साठवावा. हा गर सहा महिन्यापर्यंत चांगला राहतो.

बेल स्क्वॅश निर्मिती ः

 • वरील प्रक्रियेने समप्रमाणात पाणी मिसळून, बिया वेगळ्या केलेला गर काढून घ्यावा. त्यात २५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड प्रति किलो गर या प्रमाणे मिसळावा किंवा लिंबाचा रसही वापरता येतो. या गराचा पीएच ३.५ ते ३.८ या दरम्यान ठेवावा.
 • बेलरस बनविण्यासाठी प्रति किलो गरासाठी १.४ लिटर पाण्यामध्ये १.६ किलो साखर विरघळून घ्यावी. हे द्रावण मसलीन कपड्याने गाळून गरामध्ये मिसळावी.
 • त्यात प्रति किलो गरासाठी २.५ ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फेट चांगले मिसळावे.
 • हा स्क्वॅश निर्जंतुकीकरण केलेल्या बाटलीत भरून हवाबंद करावा. या बाटल्या ८० ते ९० अंश सेल्सिअस तापमानाला १० ते २० मिनिटे पाश्चरायईज कराव्यात. त्यानंतर त्वरीत थंड पाण्यात बुडवून सामान्य तापमानाला आणाव्यात.

बेल जॅम ः

वरीलप्रमाणे गर काढल्यानंतर त्यात प्रति किलो गरासाठी एक किलो साखर आणि १० ग्रॅम पेक्टिन मिसळावे. हे मिश्रण सतत ढवळत अर्धे होईपर्यंत गरम करावे. त्यात प्रति किलो गरासाठी पाच ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. मिश्रणातील साखरेचे प्रमाण ८६.५ टक्के होईपर्यंत शिजवण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी. तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून हवाबंद करावा. भरतेवेळी तापमान ८२ ते ८५ अंश सेल्सिअस असावे. त्यानंतर बाटल्या सामान्य तापमानापर्यंत थंड कराव्यात.

बेल पावडर ः

गरामध्ये २००० पीपीएम (२ ग्रॅम प्रति लिटर) सोडियम कार्बोनेट मिसळावे. हा गर स्टेनलेस स्टिलच्या ट्रेमध्ये पातळ थरामध्ये पसरून ठेवावा. हे ट्रे सूर्यप्रकाशामध्ये दोन ते तीन दिवस ठेवून वाळवून घ्यावेत. शक्य असल्यास सौर ड्रायरचा वापर करावा. आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यापर्यंत झाल्यानंतर त्याचे तुकडे करून आर्द्रतेचे प्रमाण ४ टक्क्यापर्यंत होईपर्यंत पुन्हा वाळवावेत. हे तुकडे ग्रायंडरच्या साह्याने बारीक करून घ्यावेत. भुकटी चाळणीतून गाळून हवाबंद डब्यामध्ये बंद करावी. ४०० गेज पॉलिथीन किंवा पॉलीप्रोपीलीन पाऊच वापरून उष्णतेच्या साह्याने हवाबंद करता येतात.

 संपर्क : डॉ. पाटील,  ramabhau@gmail.com,
(डॉ. आर. टी. पाटील हे लुधियानातील केंद्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे निवृत्त संचालक अाहेत.)

 

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
खते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्रसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची...
कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...
वनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्यवनस्पतिशास्त्र आणि इमारत आरेखनशास्त्र या दोहोंचा...
ट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई...मजूर टंचाई लक्षात घेता विविध यंत्रांची निर्मिती...
अंड्यापासून रेडी टू कूक उत्पादने अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये अंड्यापासून अर्ध...
सौर प्रकाश सापळा फायदेशीर...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक...
पंचवीस एकरांत ‘ठिबक’मधील अत्याधुनिक...कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील प्रकाश...
सूत्रकृमींना रोखणारे विद्युत चुंबकीय...सूत्रकृमींचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या...
धान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा...सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी...
अवजारे कमी करतील महिलांचे श्रममध्यम ते मोठ्या आकाराच्या बियाण्याची टोकण...
ड्रोण करणार परागीकरणमोठ्या फळबागांमध्ये परागीकरण करण्यासाठी...
रोबो निवडतो तयार स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचे फळ तसे नाजूक, त्याची तोडणी हलक्या...
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोडियम क्षारांचे अाधिक्य असलेल्या...जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण वाढत असून,...
सातत्यपूर्ण ध्यासातून नावीन्यपूर्ण,...नाशिक जिल्हा द्राक्षशेतीसोबत अत्याधुनिक...
सूर्यफूल बियांपासून लोण्याची घरगुती...दुग्धजन्य लोण्याला तितकाच समर्थ पर्याय म्हणून...
अवजारांच्या वापरातून खर्च होईल कमीपीक उत्पादनाचा ३० ते ४० टक्के खर्च  शेती...
अल्पभूधारकांसाठी अधिक स्वस्त, कार्यक्षम...भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडतील अशी...
सूर्यफूल बियांपासून प्रक्रियायुक्त...आपल्याकडे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेलासाठी...
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...