पाणीवाटप, वहनात होणाऱ्या चुकांचे परिणाम

पाणीवाटप, वहनात होणाऱ्या चुकांचे परिणाम
पाणीवाटप, वहनात होणाऱ्या चुकांचे परिणाम

कित्येक धरणे आपल्याला बघायला मिळतील की ती पाण्याने भरलेली असतात, पण ते पाणी शेतापर्यंत पोचवायला कालवे किंवा इतर उपाय केले नसल्याने ते पाणी जिथे पोचायला हवे, तिथे पोचत नाही. यात धरणाचा खर्च झाला, पण त्याचा उपयोग होऊ न शकल्याने खर्च आणि स्त्रोत वाया जातो, पाण्याची टंचाई मात्र कायम रहाते.

ठिकठिकाणी धरणे बांधून सिंचनाची सोय करायचा प्रयत्न झाला. पण, त्यात सुसूत्रता नाही. सिंचनाचे जगातील सर्वात मोठं जाळे आपण तयार केले, पण आपली या कामातील कार्यक्षमता इतकी कमी आहे, की आपण जेमतेम ३५ टक्के एवढ्या कार्यक्षमतेने सिंचनासाठी पाणी पुरवठा करतो आहोत. याचे दोन दुष्परिणाम आहेत, एक म्हणजे, पाण्याचा होत असलेला अपव्यय आणि दुसरं म्हणजे, प्रती हेक्टरी वाढत चाललेला सिंचनाचा खर्च. हे दुहेरी नुकसान आपण गेली अनेक वर्ष अनुभवत आहोत. आज परिस्थिती अशी आहे की अजून दहा वर्षांनी सिंचनासाठी प्रतीहेक्टरी किती खर्च होईल आणि त्या वेळी पुरेसा पाणीपुरवठा असेल का, याचा अंदाजही आपण करू शकत नाही.

 पाणीपुरवठ्यातील विरोधाभास  

  • पाण्याचा होणारा अपव्यय आणखी एका मोठ्या संकटाला आमंत्रण देत असतो. सिंचनासाठी केलेल्या पुरवठ्यातील कार्यक्षमता जेव्हा कमी असते, तेव्हा ते वाया जाणारे पाणी आजूबाजूच्या जमिनीत मुरत रहाते, आणि एक वेळ अशी येते की ती जमीन पाणथळ होऊन जाते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता खालावत जाऊन शेवटी तो भाग नापीक होऊन जातो. म्हणजेच, जिथे पाणीपुरवठा कमी होतो तिथे कोरडा दुष्काळ आणि जिथे अशा चुकांमुळे पाणीपुरवठा गरजेपेक्षा जास्त आणि अनियंत्रित होतो तिथे ओला दुष्काळ अशी विरोधभास असणारी परिस्थिती अगदी बाजूबाजूच्या भागांमध्ये बघायला मिळते. अशी कित्येक धरणे आपल्याला बघायला मिळतील की ती पाण्याने भरलेली असतात, पण ते पाणी शेतापर्यंत पोचवायला कालवे किंवा इतर उपाय केले नसल्याने ते पाणी जिथे पोचायला हवे, तिथे पोचत नाही. यात धरणाचा खर्च झाला, पण त्याचा उपयोग होऊ न शकल्याने खर्च आणि स्त्रोत वाया गेल्यात जमा होतो आणि पाण्याची टंचाई मात्र कायम रहाते.
  • शेततळ्याचे निकष तपासा
  • सध्या “मागेल त्याला शेततळे” अशी योजना चालू आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभही होताना दिसतो. पण असे उपाय सरसकट सगळीकडे केले जात असून त्याचा गंभीर दुष्परिणाम आज बघायला मिळत आहेत आणि भविष्यातही जास्त स्पष्टपणे दिसणार आहे. मातीचा प्रकार, भूगर्भाची रचना, पडणारा पाऊस इत्यादी गोष्टी नजरेआड करून एकाच निकषाच्या आधारे ही शेततळी केली जात आहेत. यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
  •  शेततळी किमान तीन मीटर खोल असावीत असा निकष असल्याने तो पूर्ण करून अनुदानासाठी पात्र ठरायला जमीन मालकाचा काहीही करून खोली तीन मीटर करण्याकडे कल असतो. विशेषत: कोकणात ही अडचण प्रकर्षाने जाणवते. भूगर्भाची जडणघडण अशी आहे की तीन मीटर खोल जाता येतं असं नाही. मग तो जमीन मालक जमिनीच्या खाली दोन मीटर आणि जमिनीवर एक मीटर असा तलाव खणून आणि बांधून  काढतो. मग त्यात प्लॅस्टिक अंथरून पाणी खाली जिरून जाणार नाही, अशी योजना केली जाते. यात, वरच्या एक मीटर भागात पाणी साठत नाही, आणि खाली साठवलेलं दोन मीटर पाणी उन्हाळ्यापर्यंत टिकत नाही.
  • आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अशा प्लॅस्टिक आच्छादन असलेल्या तलावांत बरेचदा पाणी बाजूच्या विहिरीतून किंवा  कूपनलिकेमधून भरलं जाते असं निरीक्षण आहे. यामुळे दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे, तलावाचा पृष्ठभाग विहीर आणि कूपनलिकेपेक्षा खूप जास्त असल्याने पाण्याचे बाष्पीभवन जलद गतीने होते. आणि दुसरं म्हणजे, भूगर्भात जेव्हा पाणी असते तेव्हा ती सार्वजनिक साधनसंपत्ती असते, पण हेच पाणी उपसून जेव्हा तलावात घेतले जाते तेव्हा ते पाण्याचं खासगीकरण होते आणि यात आजूबाजूच्या लोकांना त्यात वाटा मिळत नाही. म्हणजेच, हा उपाय करताना आपण खर्च करून पाणी लवकर संपवतो आणि नियोजनात अत्यंत ढिसाळपणा दाखवत पाण्याची नासाडी मात्र करतो.     
  • बदलत्या जीवनशैलीमुळे आपली पाण्याची गरज वाढते आहे आणि उपलब्धता आणि नियोजनातील कार्यक्षमता कमी होते आहे. याचा थेट परिणाम पाण्याच्या स्त्रोतांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर झाला आहे आणि होतो आहे. बदलती पीकपद्धत हाही एक महत्त्वाचा मुद्दा या संकटात भर घालत आहे. सिंचनातील अकार्यक्षमता, पाण्याची उपलब्धता, पाऊस, माती इत्यादी गोष्टींचा विचार आणि अभ्यास न करता नगदी पिकांच्या मागे धावत सुटल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
  • पुनरुज्जीवनाची गरज     जल संधारण करताना त्या भागातील कमी झालेले किंवा जवळपास संपवलेले जंगल, झाडझाडोरा याबद्दल विचार करून त्या सगळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी काम करायची आवश्यकता आहे. जल संधारण हे केवळ पाण्याच्या कामापुरते नसून आपण त्याबरोबर मृद्संधारण आणि जंगल संवर्धन (फक्त वृक्ष संवर्धन नव्हे) करणं अपेक्षित आहे, तर अपेक्षित परिणाम अनुभवायला मिळतील. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर स्थलानुरूप जल संधारण उपाययोजना करणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, पण दुर्दैवाने, याकडे अजूनही बहुसंख्य लोक, तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, धोरण तयार करणारे आणि राबवणारे, माध्यमं, इत्यादी क्षेत्रांतील लोकांचे पुरेसे लक्ष वेधले जात नाही. आपण यापुढच्या भागांमध्ये स्थलानुरूप जलसंधारण उपाययोजना म्हणजे काय? हे प्रत्यक्ष उदाहरणातून पहाणार आहोत.

    कूपनलिकांची खोदाई चिंताजनक सध्या परिस्थिती आणि लोकांची मानसिकता अशी झाली आहे की, शहर असो किंवा खेडेगाव, बहुसंख्य ठिकाणी धडाक्याने कूपनलिका करण्याचा एकूण उत्साह (खरंतर उन्माद) भयंकर रूप धारण करतोय. काही वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपट आला होता, “थ्री इडियट्स”. त्यात एका रखवालदाराची गोष्ट दाखवली आहे. त्याला एक सवय असते, गस्त घालताना “ऑल ईज वेल” अशी आरोळी मारायची. ती ऐकून लोक त्याच्यावर विश्वास ठेवून बिनघोर झोपायचे. नंतर लक्षात येते की त्याला नीट दिसतंच नाही. तो उगाचंच असं ओरडत फिरायचा आणि लोकांना नुसत्या कल्पनेने सुरक्षित वाटायचं. सध्या अशीच परिस्थिती आहे. फक्त आत्ता “ऑल ईज बोअरवेल” असं चालू आहे. कोणीही उठतो आणि विचार, अभ्यास न करता, योग्य आणि अनुभवी तज्ज्ञाचा सल्ला न घेता, मन मानेल तिथे कूपनलिका करायचा प्रयत्न करत राहतो. जमिनीला आपण जिथे कूपनलिका पाडू, तिथे पाणी मिळेल अशी थोडीशी भाबडी पण स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारी ही कृती पाण्याचा प्रश्न सोडवत तर नाहीच, पण गोंधळ तयार करायला आणि सर्वसामान्य लोकांमध्ये निराशा निर्माण करायला हातभार लावत आहे.

    नळपाणी योजनांचा प्रश्न   अनेक गावांमध्ये नळपाणी योजना केल्या जातात. अनेक सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत अशा योजना लोकांना पुरेसे पाणी मिळावे या हेतूने राबवल्या जातात. पण अशा योजना राबवताना, तिथल्या लोकसंख्येला वर्षभर पुरेल इतकी तिथल्या पाण्याच्या स्त्रोताची ताकद आहे का, या प्रश्नाकडे बरेचदा दुर्लक्ष होते. त्यामुळे योजनेवर खर्च तर होतो, पण पाणी मिळत नाही. अशा योजना दोन, पाच वर्षांत बंद पडतात आणि खर्च वाया जातो. कित्येक गावांमध्ये अशा प्रकारे राबवल्या गेलेल्या तीन, तीन नळपाणी पुरवठा योजना दिसतात, म्हणजे त्यातले पाईप वगैरे यंत्रणा दिसते, फक्त त्या योजनांमधून पाणी मात्र मिळत नाही.

     ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० ( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com