निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्य

जनावरांच्या आहारात प्रक्रिया केलेला चाऱ्याचा समावेश करावा
जनावरांच्या आहारात प्रक्रिया केलेला चाऱ्याचा समावेश करावा

उन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते.

 जनावरांच्या गुणवत्तेनुसार दूध उत्पादन मिळविण्यासाठी त्यांचा आहार संतुलित, सकस आणि पुरेसा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जनावरांच्या खाद्यावर साधारणपणे ७० टक्के खर्च होतो, हा खर्च कमी करण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे खाद्य (१६-२० टक्के प्रथिने व ७० टक्के एकूण पचनीय पदार्थ) घरच्याघरी तयार करावे.

चाऱ्यावर प्रक्रिया जनावरांना नियमितपणे वर्षभर सकस व संतुलित चारा मिळणे आवश्यक असते. मात्र अनियमित पाऊस, पाण्याचा अभाव, चारा लागवडीसाठी जमिनीची कमतरता या गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता जास्त असूनसुद्धा दूध उत्पादनामध्ये घट होते. जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेल्या चाऱ्याचा पुरवठा नियमितपणे करणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते. यासाठी निकृष्ठ चाऱ्यावर कमी खर्चामध्ये प्रक्रिया करणे आणि त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यावर करणे उपयुक्त ठरते.

उसाच्या भुश्‍यावर प्रक्रिया  

  • उसाच्या भुश्‍यावर वाफेची प्रक्रिया करून त्यांमध्ये २ टक्के युरिया, १२ टक्के मळी आणि २ टक्के खनिज मिश्रण मिसळून त्यावर ठरावीक वजनाचा दाब देऊन ब्लॉक तयार केले जातात. हे ब्लॉक तयार केल्यावर २ ते ३ महिन्यांनी जनावरांच्या खाद्यामध्ये वापरावेत.
  • गहू भुश्यावर प्रक्रिया

  • प्रथम १०० किलो भुसा फरशीवर पसरावा. एका ड्रममध्ये  ५० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४ किलो युरिया मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण झारीच्या साह्याने सर्व भुश्यावर व्यवस्थित शिंपडावे. भुश्यावर युरियाचे द्रावण शिंपडल्यानंतर तो चांगला खाली वर करावा. यामुळे सर्व भुश्‍यावर सम प्रमाणात द्रावण मिसळते.
  • त्यानंतर भुश्‍याचा ढीग करून प्लॅस्टिकच्या कागदाने हवाबंद करावा. बाजूने शेणमातीचा थर द्यावा. साधारणपणे २१ दिवसांनी या भुश्‍यामध्ये अमोनियाची प्रक्रिया होऊन त्याची पाचकता व रुचकरपणा वाढून त्यामधील प्रथिनांचे प्रमाणही वाढते. यानंतर हा चारा जनावरांच्या खाद्यात वापरावा.
  • प्रक्रिया केलेला गव्हाचा भुसा जनावरांना सुरवातीला १० ते १२ दिवस २ ते ३ किलो द्यावा. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवावे. प्रक्रिया केलेला चारा दिल्यावर दररोज ५ ते ७ किलो हिरवा चारा देणे आवश्यक असते. जनावरांना स्वच्छ पाणी भरपूर पाजावे.
  • युरोमोल निर्मिती  

  • प्रथम १५ किलो गव्हाचा कणीयुक्त कोंडा किंवा भाताचा कणीयुक्त कोंडा (तेलविरहित राईस ब्रान) घ्यावा.
  • एका भांड्यामध्ये १२ किलो उसाची मळी आणि त्यामध्ये ४ किलो युरिया मिसळून २५ ते ३० मिनिटे उकळावे. या गरम द्रावणामध्ये १५ किलो कोंडा चांगला मिसळून घ्यावा.
  • युरोमोल तयार करताना युरिया, उसाची मळी, आंबवण भरडा व्यवस्थित मिसळावे.
  • जनावरांना सुरवातीला सवय होईपर्यंत ८ ते १० दिवस प्रत्येक दिवसासाठी १ किलो युरोमोल द्यावे. हे खाद्य २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस उपयोगात आणू नये.
  • युरोमोल खाद्य ६ महिन्यांपेक्षा लहान वयाच्या वासरांना देऊ नये. जर दुभते जनावर प्रतिदिन २० लिटर पेक्षा अधिक दूध देत असेल तर नेहमीच्या खुराकामध्ये ५० टक्‍क्यांपर्यंत युरोमोल खाद्य उपयोगात आणावे आणि उरलेले ५० टक्के नेहमीचे खाद्य द्यावे. युरोमोलचा जनावरांच्या आहारामध्ये वापर केल्यास खाद्यातील पेंडीचे प्रमाण कमी करता येते.
  • टीप ः पशूतज्ज्ञाच्या सल्यानेच जनावरांच्या आहारात प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचा वापर करावा.

    - कु. घोषिता हिंगोणेकर, ८३०८७२६६६८  (कृषी महाविद्यालय, धुळे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com