सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी सामना शक्य

सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी सामना शक्य
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी सामना शक्य

कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी सोयाबीनपासून बनवलेले विविध पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. भोपाळ येथील केंद्रिय कृषी अभियांत्रिकी संस्थेद्वारे सोयापदार्थांच्या निर्मितीची शास्त्रीय पद्धती विकसित करण्यात आली आहे. या सोयापदार्थांची निर्मिती, वापर याविषयी जागरुकता करण्यासाठी त्याचा समावेश मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त मंडलामध्ये करण्यात आला. अंगणवाड्यांमध्ये राबवलेल्या अटल बाल पालक योजनेमध्ये महिला बचतगटांची मदत घेण्यात आली. यातून कुपोषणग्रस्त मुलांच्या वजनामध्ये चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण, २०१५-१६ नुसार पाच वर्षांखाली ३८.४ टक्के मुलांची वाढ खुंटलेली आहे. याचा अर्थ असा की देशातील सुमारे अर्धी मुले ही कुपोषणाच्या छायेत आहेत. मध्यप्रदेशमध्येही पोषक घटकांची कमतरता ही मोठी समस्या आहे. सुमारे २८.५ टक्के महिलांमध्ये ऊर्जेची तीव्र कमतरता त्यांच्या शरीर वस्तुमान निर्देशांकानुसार (बीएमआय) दिसून येत आहे. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या एकात्मिक बालक विकास योजना (आयसीडीएस) च्या अहवालानुसार, होशंगाबाद हा कुपोषित जिल्ह्यातील एक जिल्हा असून, तिथे नवजात बालकांच्या मृत्यूचा दर ४७ टक्क्यांपर्यंत आहे. त्यापाठोपाठ जन्मतानाच मूत्यदर हा १७ टक्के आहे. जिल्ह्यातील १५ टक्के मुले तीव्र कुपोषणग्रस्त आहेत.

  • या समस्येवर मात करण्यासाठी एकात्मिक बालक विकास योजनेअंतर्गत नियमित पोषक आहार कार्यक्रम राबवला जात आहे. अशा अनेक प्रयत्नानंतरही काही मुले कुपोषणाच्या तिसऱ्या अवस्थेत आहेत. त्यांच्यासाठी विशिष्ठ आहाराची सोय करण्यात येत आहे.
  • भोपाळ येथील केंद्रिय कृषी अभियांत्रिकी संस्थेद्वारे सोयाबीनपासून विविध पोषक आहारनिर्मितीच्या तंत्रज्ञानाचा प्रसारही केला जात आहे. त्यासाठी गावपातळीवर आणि बचतगटासाठी विविध परिषदा, प्रदर्शने, पोषकता मेळा, प्रशिक्षणे यांचे आयोजन केले जात आहे. त्यातून स्थानिक पातळीवर कमी खर्चामध्ये सोयापदार्थाच्या निर्मितीविषयी माहिती दिली जात आहे.
  • गावपातळीवर बचतगटांना सोयापदार्थ निर्मिती आणि वाटपाचे काम अटल बाल पालक या योजनेअंतर्गत देण्यात आले आहे. हे अन्न अंगणवाडीच्या मुलांना पुरवले जाते. गेल्या १२ महिन्यांपासून आहारामध्ये सातत्यपूर्ण सोयसत्तू २० ग्रॅम किंवा सोयनट्स २० ग्रॅम किंवा सोयबिस्किट २५ ग्रॅम प्रतिदिन असे सोयापदार्थ देण्यात येत आहेत. त्याचे चांगले फायदे मुलांच्या आरोग्यामध्ये दिसून येत आहेत.
  • पिपारिया मंडल ः येथील ४७ अंगणवाड्यापैकी ४२ अंगणवाड्यांमध्ये अटल बाल पालक योजना स्वीकारली आहे. सर्वेक्षण आणि मार्च २०१७ च्या नोंदीनुसार, पिपारीया मंडलामध्ये कार्यक्रम राबवण्यापूर्वी ६२० मुले कुपोषणग्रस्त होती. येथे सोयापदार्थांच्या निर्मितीचे प्रशिक्षण आणि पोषकतेविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या मुलांना सोयसत्तू, सोयनट्स आणि सोयबिस्किट्स नियमितपणे देण्यात आले. त्यातील २८६ मुलांचे (४६ टक्के) वजन वाढले, तर ३५.६ टक्के मुले कुपोषणाच्या ग्रेड २ मधून ग्रेड १ मध्ये आली आणि ५.६ टक्के मुले (३५) सामान्य स्थितीत आली. मात्र, २३ मुलांच्या (३.७ टक्के) वजनामध्ये कोणताही बदल दिसला नाही. ५५ मुलांच्या (८.८ टक्के) स्थलांतरामुळे वजन किंवा कुपोषणाची स्थिती तपासता आली नाही. इटारसी मंडल ः एकूण ६६ अंगणवाड्यापैकी ३३ अंगणवाड्यामध्ये अटल बाल पालक योजना राबवली गेली. येथे ५२० मुले कुपोषणाच्या ग्रेड २ मध्ये होती. त्यांना प्रतिदिन सोयपदार्थ दिल्यानंतर ९१ टक्के मुलांच्या वजनामध्ये वाढ झाली. ५ टक्के मुले सामान्य स्थितीत आली. तिथे १६८ मुले कुपोषणाच्या ग्रेड ३ मध्ये होती, त्यातील ७० टक्के मुलांचे वजन वाढले, २.३ टक्के सामान्य स्थितीत आली. मात्र, अन्य आरोग्याच्या समस्यामुळे २८ टक्के मुलांमध्ये कोणतीही सुधारणा दिसली नाही. होशंगाबाद ग्रामीण मंडल ः कार्यक्रम राबवण्यापूर्वी १२०६ मुले कुपोषणाच्या ग्रेड२ मध्ये होती, तर १०० मुले तीव्र कुपोषणग्रस्त होती. त्यांना सोयापदार्थ पुरवण्यात आल्यानंतर ७७.६ टक्के मुलांचे वजन वाढून, ते कुपोषणाच्या ग्रेड१ मध्ये आले. तीव्र कुपोषणग्रस्त १०० मुलांपैकी १६ मुलांमध्ये सुधारणा दिसली, ८.५ टक्के मुले ग्रेड १ मध्ये आली आणि १.३२ टक्के मुले सामान्य स्थितीत आली. येथे एकूण १८२ अंगणवाड्या असून, त्यातील ६० अंगणवाड्यांमध्ये अटल बाल पालक योजना राबवण्यात आली. या योजनेमध्ये बचत गटांकडून सोयापदार्थाची शास्त्रीय पद्धतीने निर्मिती करून घेण्यात आली. त्याच्या दर्जावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. या अन्नाचा अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आला. या प्रक्रियेमुळे महिला बचतगटांना उत्पन्नही मिळाले. त्याचप्रमाणे सर्व थरांमध्ये सोयापदार्थांविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत झाली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com