झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू प्रदर्शनाची

प्रदर्शनामधील गाईंचा अद्ययावत गोठा.
प्रदर्शनामधील गाईंचा अद्ययावत गोठा.

इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनामध्ये जातिवंत दुधाळ गाई, पशुपालनातील नवीन तंत्रज्ञान, स्वच्छ दूधनिर्मिती आणि प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी यंत्रणा पाहावयास मिळतात. जगभरातील पूरक उद्योगातील नवीन तंत्र या प्रदर्शनात पाहावयास मिळते.

जगभरातील विविध संस्था दरवर्षी कृषी आणि पूरक उद्योगाबाबत प्रदर्शनांचे आयोजन करत असतात. या प्रदर्शनापैकी इटली देशामधील महत्त्वाचे प्रदर्शन म्हणजे क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू प्रदर्शन. दरवर्षी आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये जातिवंत दुधाळ गाई, त्यांच्या व्यवस्थापनाचे तंत्र याचबरोबरीने आहार, आरोग्य आणि दूध प्रक्रियेबाबत जगभरात विविध कंपन्यांनी विकसित केलेले नवीन संशोधन पाहावयास मिळते. या ठिकाणी प्रामुख्याने आईस्किम, लोणी, चीज, योगर्ट, क्रिमनिर्मितीसाठी उपयुक्त नवीन यंत्रणा पाहावयास मिळाल्या. याचबरोबरीने बायोगॅसनिर्मिती आणि वीजनिर्मितीमधील नवीन यंत्रणा प्रदर्शनात मांडलेल्या होत्या. असे होते प्रदर्शन लोकांमध्ये पशुपालनाची आवड निर्माण होण्यासाठी इटलीमध्ये दरवर्षी दुधाळ गाई तसेच जातिवंत वासरांची स्पर्धा घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने दूध देण्याची क्षमता, शरीराची ठेवण, वजन, त्वचा याचा प्रामुख्याने विचार केला जातो. क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू प्रदर्शनात जातिवंत होल्स्टिन फ्रिजियन आणि ब्राऊन स्वीस या दुधाळ गाईंचे संगोपन कसे केले जाते, याची शास्त्रशुद्ध माहिती तज्ज्ञांनी दिली. याठिकाणी जनावरांना खरारा करणारी यंत्रणा, यंत्राद्वारे केसांची कापणी, पायाच्या नख्या काढण्याचे तंत्र याचबरोबरीने कासेच्या व्यवस्थापनाची तांत्रिक माहिती विविध कंपन्यांच्या स्टॉलवर तसेच संशोधन संस्थाच्या तज्ज्ञांकडून मिळत होती. प्रदर्शनात अद्ययावत गोठादेखील पाहावयास मिळाला. गोठ्यामध्ये गाईंना बसण्याकरिता मका भुस्सा जमिनीवर पसरविण्यात आला होता. त्यामुळे गाय जमिनीवर बसली तरी कास तसेच पायाला जखमा होत नाहीत. प्रदर्शनातील दुग्ध स्पर्धेमध्ये ३०० जातिवंत दुधाळ गायी सहभागी झाल्या होत्या. यातील निवडक होल्स्टिन फ्रिजियन गाईंची प्रतिदिन दूध देण्याची क्षमता ३५ ते ५० लिटर होती. या गाईचे दिवसातून तीन वेळा दूध काढले जाते. प्रदर्शनात प्रामुख्याने होल्स्टिन फ्रिजियन, जर्सी, ब्राऊन स्वीस, ग्युरेन्सी या दुधाळ गाई तसेच मांस उत्पादनासाठी चायमिनिया, मार्चिगिनिया, मेरेनामा, पोडोलिका या जाती प्रदर्शनात पाहावयास मिळाल्या. प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रत्येक गाईसमोर माहिती लावलेली होती. या पशू प्रदर्शनामध्ये १५ देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यामुळे विविध देशांतील लोकांशी चर्चा झाल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. पशुपालन हा मुख्य व्यवसाय म्हणून केला आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर कसा फायदेशीर ठरतो हे या प्रदर्शनात पाहावयास मिळाले.प्रदर्शनामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा पाहावयास मिळाल्या. दुग्ध व्यवसाय, चारानिर्मिती, मुरघासनिर्मिती, लोडिंग, अनलोडिंग करणारी विविध उपकरणे प्रात्यक्षिकासह पाहावयास मिळाली. इटलीमधील पशुपालन व्यवसायामध्ये तरुणांचा चांगला सहभाग दिसून आला. शेतकऱ्याकडे जरी दोन-तीन दुधाळ गायी असल्या तरी त्याचे १०० लिटर दूध जमा होते. यामुळे कमी गाईंमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळविणे येथील पशुपालकांना शक्‍य होते. चांगल्या वंशावळीच्या गाई असल्यामुळे त्यांची पुढील प्रजाती तयार करण्याकरिता जातिवंत वळूची रेतमात्रा वापरली जाते. येथील पशूपालकाकडे दुधामध्ये किती फॅट, एस. एन. एफ. प्रथिनांचे प्रमाण आहे याची नोंद घेतली जाते.

प्रदर्शनातील तंत्रज्ञान

स्वयंचलित रोबो पार्लर ः   होल्स्टिन फ्रिजियन आणि ब्राऊन स्वीस गायीचे दूध जास्त प्रमाणात असल्याने दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ करणे, दूध काढणे, दूध काढल्यानंतर टीट डिपिंग करणे, दुधाच्या नोंदी ठेवण्याचे काम रोबो पार्लरमध्ये मनुष्यविरहित केले जाते. या रोबो पार्लरमध्ये २० ते २५ लिटर दूध सात मिनिटांमध्ये काढले जाते. गाय पार्लरमध्ये आल्यानंतर तिच्या दूध देण्याच्या प्रमाणानुसार पशुखाद्य दिले जाते. याचबरोबरीने दुधाची संगणकावर नोंद घेतली जाते.   ॲक्‍टिव्हिटी मीटर ः या मीटरमध्ये गाय माजावर येणे, रवंथ क्रिया तसेच आरोग्य याविषयी माहिती नोंदविली जाते. हा मीटर गायीच्या गळ्यात बांधतात. या मीटरवर झालेली नोंद संगणकाला पाठविली जाते. गाईंमध्ये ताणतणाव वाढल्यास मीटरमध्ये बसविलेला अलार्म वाजतो.  शेण काढण्याकरिता स्क्रॅपर ः परदेशात गाईंच्या गोठ्यातील शेण गोळा करण्यासाठी स्क्रॅपरचा वापर करतात. ज्या गोठ्यात शंभरपेक्षा जास्त गाई असतात, तेथे स्क्रॅपरचा वापर केला जातो. यामुळे मनुष्यबळ कमी लागते. गोठ्यात ओल रहात नाही. रोगराईचे प्रमाण कमी राहाते.   पाण्यासाठी बाऊल ः गोठ्यामध्ये गाईंना पाणी पिण्याकरिता बाऊल सिस्टिम आहे. त्यामुळे  २४ तास ताजे पाणी उपलब्ध करून दिले जाते.   फॅन ः उन्हाळ्याच्या दिवसात गोठ्यातील तापमान कमी करण्याकरिता मोठे फॅन लावलेले असतात.   मुरघास ः इटलीमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याची लागवड केली जाते. या देशात बर्फ पडत असल्याने केवळ तीन ते चार महिने जमीन लागवडीखाली असते. या काळात मक्याची लागवड केली जाते. या मक्यापासून मुरघास तयार केला जातो. याचबरोबरीने उपलब्ध सुका चाऱ्याच्या गठ्ठे करून ठेवले जातात. या चाऱ्याचा वापर हिवाळ्यात केला जातो.

गाय विण्यापूर्वी सूचना देण्याचे यंत्र हे यंत्र गाईच्या शेपटीला लावले जाते. यावर नोंदी ठेवल्या जातात. गाय विण्यापूर्वी अर्धा ते एक तास यंत्राचा अलार्म होतो. त्यामुळे प्रसूती होण्यापूर्वी पूर्व तयारी करणे शक्य होते.

स्वयंचलित खरारा ब्रश   गाईंना खरारा करण्यासाठी गोठ्यात स्वयंचलित ब्रश लावलेला असतो. गाई त्यांना हवे त्या वेळी यंत्राजवळ उभे राहून खरारा करून घेतात. या ब्रशमुळे मनुष्यबळाचा वापर कमी होतो.

बॉक्‍स मॅटचा वापर जनावरांना बसण्यासाठी रबरापासून बनविलेले खास पद्धतीचे बॉक्‍स मॅट वापरले जातात. या मॅटमधील बॉक्समध्ये वाळू भरलेली असते. मॅट उचलून स्वच्छता केली जाते.

जनावरे तपासणीसाठी अत्याधुनिक खोडा जनावरांवर सुरक्षितपणे उपचार करण्यासाठी अत्याधुनिक खोडा उपयुक्त ठरतो. जनावरांच्या पायाला झालेल्या जखमेवर उपचार किंवा नख्या काढण्यासाठी या खोड्यामुळे कमी मनुष्यबळात उपचार करता येतो. 

वासरासाठी शेड इटली देशात थंड हवामान असल्याने लहान वासरांना उबदार वातावरणात ठेवण्यासाठी लहान फायबरचे शेड बांधतात. थंडीपासून संरक्षणाकरिता त्यामध्ये हिटर बसवले असतात. शेडसमोरील भागात लहान पार्टिशन घालून वासराला फिरायला जागा ठेवलेली असते. त्यामुळे वासराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. या ठिकाणी  वासराला दूध आणि पाणी पाजण्याची व्यवस्था केलेली असते. याकरिता तेथे लहान बादल्या लावलेल्या असतात.

- सी. व्ही. कुलकर्णी, ९९७५१००७०५, 

(लेखक मे. बी. जी. चितळे डेअरी, भिलवडी स्टेशन, जि. सांगली येथे डेअरी फार्म मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com