agricultural stories in Marathi, Success story of Bhatarratna Atalbihari Bajpayee International school,Pathri,Dist.Parbhani | Agrowon

शाळा पेरतेय शिक्षण, शेती अन् ग्रामविकासाचे बीज
माणिक रासवे
रविवार, 2 जून 2019

पाथरी(जि. परभणी)मधील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेची भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा विद्यार्थांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या बरोबरीने शेती, पूरक उद्योग आणि ग्रामविकासाचे बीज पेरत आहे. शिक्षक, पालक आणि लोकसहभागातून सर्वांगिण शिक्षणाचा हा पॅटर्न ग्रामविकासाला दिशा देणारा आहे.

पाथरी(जि. परभणी)मधील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेची भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा विद्यार्थांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या बरोबरीने शेती, पूरक उद्योग आणि ग्रामविकासाचे बीज पेरत आहे. शिक्षक, पालक आणि लोकसहभागातून सर्वांगिण शिक्षणाचा हा पॅटर्न ग्रामविकासाला दिशा देणारा आहे.

पाथरी (जि. परभणी) येथील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा लोकसहभागातून कायापालट झाला आहे. शालेय शिक्षण समिती, शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाच्या बरोबरीने माहिती तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन तसेच शेतीपूरक व्यवसायासंबंधी ज्ञान आणि माहिती देण्यासाठी शालेय प्रकल्प राबविले जातात. आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त करणारी ही परभणी जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषदेची शाळा आहे. कोणतीही सुटी न घेता वर्षाचे ३६५ दिवस सुरू राहणारी शाळा म्हणूनदेखील जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या या शाळेची स्थापना १९४९ साली झाली. गुणवत्ता विकासासोबत लोकसहभागातून शाळेचे रुपदेखील पालटले आहे. डिजिटल वर्ग असलेल्या या शाळेमध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) अभ्यासक्रम बालवाडी ते चौथी या इयत्तांसाठी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांना हा अभ्यासक्रम सुरू केला जाईल. या अभ्यासक्रमामध्ये ‘लोकल टू ग्लोबल' या संकल्पनेअंतर्गत मातृभाषेतून शिक्षणावर भर आहे. शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक, क्षेत्र भेटी प्रकल्पांचा समावेश आहे. एमआयईबीचा अभ्यासक्रम सुरू करणारी परभणी जिल्ह्यातील ही पहिली शाळा आहे.

पालकांकडून व्यसनमुक्तीचा संकल्प
जिल्हा परिषदेसह अनेक खासगी शाळांना प्रवेशासाठी विद्यार्थी शोधावे लागतात. मात्र या शाळेत प्रवेशासाठी पालक विद्यार्थ्यांची नोंदणी करतात. विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी पालकांकडून व्यसनमुक्त राहण्याची हमी घेतली जाते. सध्या अंगणवाडी ते इयत्ता आठवीपर्यंत शाळेमध्ये १ हजार २८ एवढी विद्यार्थी संख्या आहे.

शिक्षक, पालकांचा चांगला सहयोग
विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी महिन्यातून एकदा पालक शाळेला भेट देऊन अभ्यासाची चर्चा करतात. शाळा व्यवस्थापन समिती बैठक तसेच पालक सभा नियमित होतात. दर महिन्याला निधी संकलित करून शाळेला मदत केली जाते. लोकसहभागातून शाळेसाठी सुसज्ज सभागृह बांधले आहे. माजी विद्यार्थीदेखील शाळेला मदत करतात. विधान परिषदेचे सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे या शाळेस नेहमी सहकार्य मिळते. शाळेची सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे आमदार दुर्राणी यांनी शाळेला दोन एकर जमीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
विद्यार्थांच्या शालेय पोषण आहारात दाळ खिचडी नियमित दिली जाते. अधून मधून दुधाची खीर असते. दर बुधवारी बदाम, खारीक, खजूर, शेंगदाणे, गूळ तसेच हंगामानुसार उपलब्ध होणारी फळे विद्यार्थ्यांना दिली जातात. सध्याच्या दुष्काळी स्थितीत उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो.

क्रीडा, कलागुणांना चालना
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना कब्बडी, खो-खो, धावणे या क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य प्राप्त व्हावे यासाठी सराव घेतला जातो. सिद्धांत चिंचाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावरील पारितोषिके मिळवली आहेत. कलागुणांना चालना देण्यासाठी स्नेहसंमेलन, आनंदनगरी चित्रकला स्पर्धा आयोजन केले जाते. अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनालय आहे.

स्वयंसेवी संस्थांची साथ
शाळेतर्फे विविध उपक्रम आयोजित केले जातात. येत्या काळात शेती, ग्रामविकास, जलमृदसंधारण, याचबरोबरीने शैक्षणिक प्रगतीसाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या बरोबरीने विविध उपक्रम आखण्याचे नियोजन व्यवस्थापन समितीने केले आहेत.

रात्र अभ्यासिकेची सोय
विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्यासाठी तसेच नियमित अभ्यासाची सवय वृद्धिंगत होण्यासाठी शाळेतील शिक्षक संजय उजागरे यांच्या संकल्पनेतून गावातील विविध भागांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेचे शिक्षक उपस्थित राहून विविध विषयांबाबत मार्गदर्शन करतात. विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी यश संपादन करत आहेत.

शेती शिक्षण प्रकल्प
शाळेतील ८० टक्के विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांना शेतीविषक ज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने शेती संबंधित विविध अभ्यास प्रकल्प राबविले जातात. गावाच्या परिसरात भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर नेऊन भाजीपाला लागवड, व्यवस्थापन ते बाजारातील विक्रीपर्यंतची माहिती दिली जाते. याचबरोबरीने भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन विद्यार्थी विक्री व्यवस्थेची माहिती घेतात. परिसरात यशस्वीरीत्या शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पांवर विद्यार्थ्यांना नेले जाते.

सौरऊर्जेचा वापर
विद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व समजण्यासाठी शाळेच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसविले आहेत. शाळेच्या काही वर्गातील पंखे, विद्युत दिवे व सीसीटीव्ही कॅमेरा सौरऊर्जेवर चालतो. येत्या काळात सौरऊर्जेच्या वापरावर शाळेचा भर आहे.

एकही सुटी नसलेली शाळा
सन २०१३ पर्यंत या शाळेचे कामकाज इतर शाळांप्रमाणे चालायचे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण ३५० विद्यार्थी होते. तत्कालीन मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांच्या प्रयत्नांतून शाळेमध्ये अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच पालक यांच्या सहभागातून शाळेमध्ये बदल घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला वर्षभर सुटी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.२०१३ पासून आजतागायत या शाळेने ३६५ दिवस चालणारी शाळा असा नावलौकिक मिळवला आहे. विद्यमान मुख्याध्यापक सुभाष चिंचाणे यांच्यासह शिक्षकांनी उपक्रमांमध्ये भर घातली. शिक्षण आणि गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवत शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. शैक्षणिक वर्षात अन्य शाळा सुरू झाल्यानंतर ही शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरते. दर रविवारी तसेच दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीमध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत भरते. सुटीच्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेत कमी गुण मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी शिकवणी वर्गांचे आयोजन केले जाते.

पालकांचा चांगला सहभाग
शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक बैठकीत सदस्यांकडून निधी संकलन करून शाळेला मदत केली जाते. गुणवत्तावाढीसाठी प्रत्येक पालक शाळेशी जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. उपक्रमशील शिक्षकांना सतत प्रोत्साहन दिले जाते.
- शिवाजी वांगीकर,
(अध्यक्ष, जि.प. शाळा व्यवस्थापन समिती)

लोकसहभागातून शिक्षणावर भर
गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे शाळेची प्रगती झाली. क्षेत्र भेटीअंतर्गंत शेती शिक्षणावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन भाजीपाला उत्पादन, शेतीपूरक व्यवसाय, बाजारपेठेतील शेतमालाची विक्रीबाबत माहिती दिली जाते.
- सुभाष चिंचाणे, ९८६०२३५८९९
(मुख्याध्यापक)

 

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची...वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती ...
गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची...अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी...
अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील...पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत...
मुंबईतील नोकरी सांभाळून गावी विस्तारली...मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
बहुवीध पीक पद्धतीद्वारे जोखीम कमी...लातूर जिल्ह्यातील हेर येथील प्रयोगशील शेतकरी...
पाण्याचे महत्त्व ओळखूनच सुधारले पीक...सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उभे ठाकलेले संकट व...
दुष्काळातही बहरलेली बेलखेडेेंची...अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
केशर आंबा बाग, मिश्रपिके,  अन...लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज...
शेततळ्याच्या जोरावर फुलली २५ एकरांत...संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील...
देशी गोपालन व्यवसायातून घेतली नव्याने...इमूपालन व्यवसायात काही लाख रुपयांचा आर्थिक फटका...