agricultural stories in Marathi, success story of Chandrshekar Bulbule,Bori,Dist.Parbhani | Agrowon

शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथ
माणिक रासवे
रविवार, 24 मार्च 2019

बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर भास्करराव बुलबुले यांची साडेदहा एकर शेती आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी बुलबुले यांनी सोयाबीन आणि हरभरा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. जमीन सुपीकता आणि पाणी बचतीसाठी तुषार सिंचन वापरावर त्यांनी भर दिला आहे.

बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर भास्करराव बुलबुले यांची साडेदहा एकर शेती आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी बुलबुले यांनी सोयाबीन आणि हरभरा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. जमीन सुपीकता आणि पाणी बचतीसाठी तुषार सिंचन वापरावर त्यांनी भर दिला आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कक्षामध्ये सहायक प्रशाकीय अधिकारी पदावर चंद्रशेखर बुलबुले कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून बुलबुले यांनी वडिलोपार्जित शेतीशी नाळ कायम ठेवली आहे. बाजारपेठेचा अभ्यास करत पारंपरिक पीक पद्धतीत बदल केला. गेल्या बारा वर्षांपासून त्यांनी महाबीजअंतर्गत सोयाबीन आणि हरभरा बीजोत्पादनास सुरवात केली आहे. बीजोत्पादनामुळे त्यांना किफायतशीर दर मिळतो. एन हंगामात बाजारात दर कोसळल्यानंतर होणाऱ्या नुकसानीची जोखीम कमी झाली.

शेती नियोजनास सुरवात
चंद्रशेखर बुलबुले यांचे मूळगाव बोरी. या गावशिवारात त्यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती होती. मधल्या काळात त्यांनी साडेचार एकर नवीन शेत जमीन विकत घेतली. चंद्रशेखर बुलबुले यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बोरी येथे झाले. त्यांना पहिल्यापासून शेतीची आवड असल्याने शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतरही त्यांनी शेतीशी असलेली नाळ कायम ठेवली. दर रविवारी तसेच अन्य शासकीय सुट्यांच्या दिवशी ते पूर्णवेळ शेतावर असतात. त्यांच्याकडे एका सालगडी आहे. पेरणी, खुरपणी आणि काढणीच्या कामासाठी मजूर लावले जातात. दरवर्षी खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक नियोजन, पाणी, कीड, रोग व्यवस्थापनासह वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना चंद्रशेखर बुलबुले हे स्वतः करतात. यासाठी त्यांना  परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि डॉ. अनिल बुलबुले यांचे मार्गदर्शन मिळते.

बीजोत्पादनातून वाढविला नफा
पारंपरिक पिकांच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्यामुळे अपेक्षित नफा मिळत नव्हता. त्यामुळे बुलबुले यांनी खरीप तसेच रब्बी हंगामात बीजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे ठरविले. सुरवातीला खासगी कंपन्याचे बीजोत्पादन घेतले.२००६-०७ पासून बुलबुले यांनी महाबीज अंतर्गत सोयाबीन, गहू, कांदा, हरभरा अशा विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले. गेल्या काही वर्षांपासून बुलबुले यांनी खरिपामध्ये सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले.  तसेच घरच्या पुरते अर्धा एकर क्षेत्रावर गव्हाचे उत्पादन घेतले जाते.
बीजोत्पादनाबाबत बुलबुले म्हणाले, की मी सोयाबीनच्या जेएस ३३५, एमएयूएस ७१ आणि हरभऱ्याच्या विजय या जातीचे मागणीनुसार पायाभूत किंवा पैदासकार बियाण्यांचे उत्पादन घेतो. दरवर्षी सोयाबीन आणि हरभऱ्याचे दहा एकरावर बीजोत्पादन असते. योग्य व्यवस्थापनातून सोयाबीनचे एकरी १० क्विंटल आणि हरभऱ्याचे सरासरी एकरी ८.५ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यंदा सोयाबीनचे दहा एकरांतून १०४ क्विंटल बीजोत्पादन मिळाले. यंदा बोनससह प्रति क्विंटल ४ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. सोयाबीनला आजवर प्रति क्विंटल कमाल ५ हजार ५०० रुपये दर मिळाला आहे.
गतवर्षी हरभऱ्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये दर मिळाला होता. हमीभावापेक्षा दर कमी असल्यामुळे महाबीजतर्फे फरकाची रक्कम देण्यात आली. प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस मिळाला. विजय हरभरा जात विकसित होऊन दहा वर्षांचा कालावधी झाला असला, तरी उत्पादन चांगले असल्यामुळे या जातीच्या बीजोत्पादनावर माझा भर आहे. बाजारभाव जरी कमी झाला तरी होणाऱ्या आर्थिक नुकसानीची जोखीम बीजोत्पादनामुळे कमी झाली.

 

पीक पद्धतीत बदल
चंद्रशेखर बुलबुले यांच्या साडेदहा एकर शेतीमध्ये सिंचनासाठी एक विहीर आहे. त्यांच्या शेतीजवळून करपरा मध्यम प्रकल्पाचा कालवा जात असल्याने विहिरीमध्ये पाण्याचा झिरपा रहातो. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना खरिपात कापूस, ज्वारी, तूर आणि रब्बी हंगामामध्ये गहू लागवडीचे नियोजन असायचे. सिंचनाची सुविधा तसेच गावात विक्रीची व्यवस्था असल्यामुळे  काही वर्षे बुलबुले यांनी मिरची, वांगी, फ्लॅावर आदी भाजीपाल्यासह टरबुजाचेही उत्पादन घेतले. परंतु गेल्या काही वर्षात दुष्काळी स्थितीमुळे विहिरीतील पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने त्यांना भाजीपाला लागवड करणे शक्य होत नाही. काही वर्षांपूर्वी कापूस हे त्यांचे प्रमुख नगदी पीक होते. दरवर्षी सहा एकरांवर कापूस लागवड करत होते. परंतु लागवड, कीड व्यवस्थापन, वेचणीसह अन्य बाबींचा खर्च वाढला. त्या तुलनेत बाजारभाव मात्र कमीच राहिले. उत्पादन खर्च वाढल्याने फारसा नफा उरत नसल्यामुळे त्यांनी कापूस  लागवड बंद केली. अपुऱ्या पाण्यामुळे गव्हाचे क्षेत्रदेखील त्यांनी कमी केले. साधारणपणे २००३ मध्ये बुलबुले यांनी पीक पद्धतीमध्ये बदल केला. विहिरीतील पाण्याची उपलब्धता लक्षात घेत खरिपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा लागवडीवर त्यांनी भर दिला. दोन्ही पिके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याने बुलबुले यांनी हीच पीक पद्धती कायम ठेवली आहे.

पीक व्यवस्थापन
सोयाबीन आणि हरभरा व्यवस्थापनाबाबत बुलबुले म्हणाले, की सोयाबीनची पेरणी बैलचलित अवजाराने केली जाते. सोयाबीन काढणीनंतर रान ओलावून हरभऱ्याची ट्रॅक्टरचलित यंत्राने पेरणी केली जाते. त्यानंतर दोन संरक्षित पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. दोन्ही पिकांना माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खताच्या मात्रा दिल्या जातात. पावसाच्या खंड काळात विहिरीतील उपलब्ध पाणी तुषार सिंचन संचाद्वारे दिले जाते. पीक वाढीच्या टप्प्यात संरक्षित पाणी दिल्याने पीक उत्पादनात वाढ मिळाली आहे. सोयाबीन आणि हरभरा पिकामध्ये एकात्मिक कीड, रोगनियंत्रणावर भर दिला आहे. किडींची आर्थिक नुकसान पातळी ओळखून तज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच कीडनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात खर्चात बचत होते.

जमीन सुपीकतेवर भर

चंद्रशेखर बुलबुले यांच्याकडे एक लाल कंधारी बैलजोडी, एक गावरान गाय यासह एकूण पाच जनावरे आहेत. त्यामुळे दरवर्षी शंभर बैलगाड्या शेणखत उपलब्ध होते. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून १५० बैलगाड्या शेणखत ते विकत घेतात. गेल्या चौदा वर्षांपासून एक आड एक वर्ष बुलबुले शेणखत जमिनीत मिसळतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि ओलावाही टिकून राहतो. माती परीक्षणानुसारच रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जातो. येत्या काळात टप्प्याटप्प्याने रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्णपणे बंद करुन सेंद्रिय शेती पद्धतीने बीजोत्पादन घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. 

 

शेती नियोजनाची सूत्रे

  •  सोयाबीन, हरभरा बीजोत्पादनावर भर.
  •  नवीन तंत्र आणि यांत्रिकीकरणाचा वापर.
  •  जमीन सुपीकता आणि तुषार सिंचनातून पाणी बचत.
  •  प्रत्येक पिकाच्या जमाखर्चाची नोंद.
  •  येत्या काळात सीताफळ, हळद लागवडीचे नियोजन.
  •  भास्कराचार्य शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य.
  •  गटचर्चा, शिवार फेरीच्या माध्यमातून पीक व्यवस्थपानाची चर्चा.

 - चंद्रशेखर बुलबुले, ८६२३९९०११६

 

 

 

 

 

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची...वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती ...
गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची...अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी...
अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील...पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत...
मुंबईतील नोकरी सांभाळून गावी विस्तारली...मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात...