अभ्यासातून शेतीमध्ये करतोय बदल

पाणी योजनेची पहाणी करताना गटातील शेतकऱ्यांसह दीपक पाटील.
पाणी योजनेची पहाणी करताना गटातील शेतकऱ्यांसह दीपक पाटील.

वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे दीपक पाटील यांनी कोगनोळी (जि. बेळगाव) येथील वडिलोपार्जित जिरायती शेती बागायती केली. केवळ स्वतःच्या शेतीपुरता विचार न करता परिसरातील दहा शेतकऱ्यांना एकत्र करत सुमारे चाळीस एकर शेती बागायतीखाली आणली. एकमेकांच्या साथीने शेती शाश्वत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात दीपक शिवाजीराव पाटील हे इलेक्‍ट्रॉनिक विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते तिथेच स्थायिक झाले. पंरतू ही नोकरी सांभाळून सुटीच्या दिवशी ते कोगनोळी (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील शेतीमध्ये रमतात. दीपक पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ शेतीची आवड जपली आहे. दर आठवड्याच्या शेवटी तब्बल दीडशेहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून पाटील गावाकडील शेतीमध्ये पीक व्यवस्थापनात रमतात.

जिरायती शेती केली बागायती   शेती नियोजनाबाबत दीपक पाटील म्हणाले की, कोगनोळी गावात माझ्या वाट्याची वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. यातील दीड एकर माळ आणि दीड एकर मध्यम प्रकारची जमीन आहे.  पूर्वी भात, सोयाबीन, भुईमूग आणि हरभरा या पिकांची लागवड असायची. गेल्या वर्षी मी विहीर खोदली. त्यामुळे वीस गुंठ्यांवर ऊस लागवड केली. शेतीच्या व्यवस्थापनासाठी वाटेकरी ठेवला आहे. दहा वर्षापूर्वी पूर्णपणे माळ भाग असलेल्या कोगनोळीत पाणीटंचाई असायची. यामुळे केवळ पावसाच्या भरवशावर खरिपाचा हंगाम निघायचा. जमिनीत ओल टिकली तर रब्बीत हरभरा लागवड करायचो. मी १९९३ पासून वेंगुर्ला येथे नोकरीला असलो तरी गावाशी संपर्क कायम ठेवला आहे. परगावी नोकरीला असल्याने शेतीमध्ये वाटेकरी असला तरी नियोजनात माझा सहभाग असतो. १९९३ पासून आजतागायत सुटीच्या दिवशी गावाचा फेरा चुकलेला नाही. पूर्वी तीन एकरापैकी दोन एकरावर जिरायची पिकांची लागवड असायची. त्या वेळी खरिपात आणेगिरी या गावरान जातीचा भुईमूग तसेच रब्बी हंगामात मालदांडी ज्वारीची लागवड करायचो. पावसाच्या खंडामुळे काही वेळा पीक उत्पादनावर परिणाम व्हायचा. मी पुरेशा पाण्यासाठी गेल्या वर्षी विहीर खोदली. त्यामुळे खरीप, रब्बी हंगामातदेखील पिकांचे उत्पादन शाश्वत झाले. मी खरिपात दीड एकरावर भुईमूग आणि दीड एकरात सोयाबीन लागवड करतो. रब्बी हंगामात दीड एकरावर ज्वारी आणि अर्धा एकरात हरभरा लागवड करतो. परिसरातील शेतकरी तसेच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने दरवर्षी पीक व्यवस्थापनात बदल करतो. मला दीड एकरात भुईमुगाचे सहा क्विंटल, सोयाबीनचे दीड एकरात दहा क्विंटल, ज्वारीचे दीड एकरात दहा क्विंटल उत्पादन मिळते. सध्या मिळणारे उत्पादन उच्चांकी नसले तरी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करत पीक उत्पादन घेण्यावर माझा भर आहे. भुईमूग, हरभरा घरगुती वापरासाठी ठेवतो. सोयाबीनची विक्री करतो. गेल्या वर्षी नदीवरून पाइपलाइन केल्याने यंदा पूर्ण तीन एकरात उसाच्या को-८६०३२ जातीची लागवड केली आहे. उसाला पाचटाचे आच्छादन केले आहे. सेंद्रिय खतांच्या वापरावर माझा भर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी कमी पडले तरी पुरेसा ओलावा जमिनीत टिकून राहिल्याने ऊस चांगल्या प्रकारे तगून राहिला. मागील वर्षी मला वीस गुंठ्यातून ३० टन उसाचे उत्पादन मिळाले. मी ऊस लागवड करताना एक डोळा लागवडीचादेखील प्रयोग केला आहे. शनिवारी कॉलेज सुटल्यानंतर मी वेंगुर्ल्याहून सायंकाळच्या सुमारास कोगनोळीला येतो. रविवारी सकाळी लवकर शेतावर जाऊन गड्यांच्या मदतीने पुढील आठवड्यातील पीक व्यवस्थापनाचे नियोजन करतो. पीक मशागत, पाणी व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रणासाठी कीडनाशकांची फवारणी याचे नियोजन केले जाते. त्यानुसार वाटेकरी पीक व्यवस्थापन करतात. वेंगुर्ल्याला गेल्यावरदेखील वाटेकऱ्यांच्या बरोबरीने शेती नियोजनाची चर्चा सुरू असते.

अभ्यासातून बदल दीपक पाटील हे इलेक्‍ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक असले तरी त्यांनी शेती विषयाची नाळ तुटू दिली नाही. कोगनोळीपासून दीडशे किलोमीटरवर कोकण पट्ट्यात ते राहतात. परंतू त्यांचे लक्ष सातत्याने शेतीतील नवे प्रयोग शोधण्याकडे असतात. ॲग्रोवनचे ते नियमित वाचक आहेत. त्यांच्या महाविद्यालयातील कृषी विषयातील तज्ज्ञ वीरेंद्र देसाई, ए. के. बिराजदार, ए. जी. नायर यांच्या सल्ल्याने ते दरवर्षी पीक उत्पादनवाढीसाठी व्यवस्थापनात बदल करतात. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना भेटी देऊन पीक पाहणी करतात. त्यांच्या सल्ल्याने पुढील हंगामात लागवडीचे नियोजन केले जाते. या सल्ल्याची पीक उत्पादनवाढ होण्यास मदत होते. येत्या जूनमध्ये शेताच्या बांधावर आंबा, नारळ, चिकू कलमांच्या लागवडीचे त्यांचे नियोजन आहे. याचबरोबरीने दीड एकरात शेवगा किंवा डाळिंब लागवड पाटील करणार आहेत. शासनाच्या कृषी विभागाकडे ठिबक सिंचन योजनेसाठी पाटील यांनी अर्ज केला आहे. संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

फेरपालटावर भर   पीक नियोजनाबाबत पाटील म्हणाले की, जमिनीची सुपीकता जपण्यासाठी मी पीक फेरपालटावर भर देतो. खरिपात सोयाबीन, भुईमूग आणि रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा लागवड ही माझी पीक पद्धती आहे. ज्या क्षेत्रात भुईमूग लागवड असते त्यामध्ये पुढील वर्षी सोयाबीन किंवा भात घेतो. भुईमुगावरील गाठी तसेच पाला जमिनीत मिसळल्याने जमिनीत उपयुक्त अन्नद्रव्यांची मात्रा वाढते. हरभऱ्याचा बेवडही फायदेशीर ठरतो. याचा फायदा पुढील पिकाच्या वाढीवर होतो.

माती परीक्षणावर भर  जमीन सुपीकतेवर पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेणखताचा वापर आणि माती परीक्षणानुसार रासायनिक खताच्या मात्रा दिल्या जातात. दरवर्षी कोगनोळी परिसरातील खत कंपन्या तसेच वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातून पाटील माती परीक्षण करून घेतात. यातील शिफारशीनुसार ते पिकाला खतमात्रा देतात.

शेतकऱ्यांना केले एकत्र दीपक पाटील यांनी केवळ स्वत:चा फायदा न पाहता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी येण्यासाठी प्रयत्न केले. पाटील यांची शेती नदीपासून अठरा हजार फुटांवर लांब आहे. त्यांना एकट्याला पाइपलाइन करणे शक्‍य नव्हते. यासाठी त्यांनी परिसरातील दहा शेतकऱ्यांना एकत्र केले. सर्वांनी सुमारे ३५ लाखांची गुंतवणूक करून नदीवरून पाइपलाइन केली. यामुळे गेल्या वर्षभरात सुमारे चाळीस एकर जिरायती क्षेत्र बागायती झाले. मार्च ते मेपर्यंत ज्या वेळी पाण्याची टंचाई असते, त्या वेळी नदीचे पाणी सर्वच शेतकऱ्यांना पिकाला देणे शक्य होते. त्यामुळे हंगामी पिकाखालील जमीन वर्षभर बागायती झाली. पीक आणि आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ मिळाली. या योजनेचे व्यवस्थापन गटातील शेतकरी तात्यासो चौगुले हे पहातात.

-  दीपक पाटील, ९४२२४३४१६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com