हुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्ग

हुरड्याची कणसे दाखविताना मुलगा सौरभ, पत्नी सौ. मनीषासह हणमंत घायतिडक.
हुरड्याची कणसे दाखविताना मुलगा सौरभ, पत्नी सौ. मनीषासह हणमंत घायतिडक.

दरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन महिन्यांनंतर थेट विक्री करायची, असा हमखास उत्पन्नाचा मार्ग काळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील हणमंत घायतिडक यांनी शोधला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हुरडा उत्पादनात त्यांनी सातत्य ठेवून राज्यभरात मार्केट मिळविले आहे.

सोलापूर-बार्शी महामार्गावर वैरागपासून अवघ्या आठ किलोमीटरवर काळेगाव हे सुमारे अडीच हजार वस्तीचं गाव. ऊस, कांदा, भाजीपाला या नगदी पिकांसह ज्वारी, तूर ही या भागातील महत्त्वाची पिके. भोगावती नदीच्या पाणलोटात हे गाव येत असल्याने बऱ्यापैकी गाव शिवारात पाणी खेळले आहे. या नदीवरून अर्धा किलोमीटर अंतरावरून हणमंत संदिपान घायतिडक यांनी पाइपलाइन करून पाणी आणले आहे. यंदाही दुष्काळी परिस्थिती आहे, पण काही शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकेला जेमतेम का असेना, पण पाणी आहे. त्यापैकीच एक हणमंत घायतिडक. हणमंत घायतिडक यांची घराशेजारी अर्धा एकर आणि गावाबाहेर तीन एकर शेती आहे. सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॅा. लालासाहेब तांबडे आणि विषय विशेषज्ज्ञ अमोल शास्त्री यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने हणमंत यांनी तीन वर्षांपूर्वी खास हुरड्यासाठी ज्वारी लागवडीस सुरवात केली. यंदा त्यांनी घराशेजारील अर्धा एकरापैकी १५ गुंठ्यावर त्यांनी हुरड्याची ज्वारी लागवड केली आहे. उर्वरित तीन एकरात ऊस, कांदा लागवड आहे. या वर्षी कांदा, उसाला अपेक्षित दर नाही, त्यामुळे पीक व्यवस्थापनाचा खर्चही पदरात पडलेला नाही, पण यंदा ऊस-कांद्याच्या उत्पन्नापेक्षा ज्वारीच्या हुरडा विक्रीतून अवघ्या महिनाभरात हणमंत घायतिडक यांनी लाखभर रुपये मिळवून हमखास उत्पन्नाचा मार्ग शोधला. टोकण पद्धतीने लागवड हुरड्यासाठी ज्वारी करताना एकदम पेरली की, बाजारात पुरवठा करताना विक्री आणि दराचा ताळमेळ लागत नाही. एका पाठोपाठ लागवड केल्याने टप्प्याटप्प्पाने ती उपलब्ध होऊ शकते, हे लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन केले. लागवडीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खास हुरड्यासाठी विकसित केलेल्या फुले मधुर या जातीची निवड केली. घायतिडक यांनी अॅाक्टोबरच्या एक, सात, तेरा आणि २२ तारखेला जमीन तयार करुन दोन फुटावर सरी पाडून प्रत्येक नऊ इंचावर बियाणांची टोकण केली. पंधरा गुंठ्यासाठी एक किलो बियाणे लागले. टोकणी करण्यापूर्वी प्रतिकिलो बियाणास २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केली. पीक व्यवस्थापन  ज्वारीला सहसा खतांचा वापर किंवा फवारण्या कोणी करत नाही. किरकोळ खत आणि पाणी झाले की पुरेसे होते, पण भरघोस आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी घायतिडक यांनी सरी पाडताना पंधरा गुंठ्यासाठी पन्नास किलो १८ः४६ः० खत मिसळून दिले. बी टोकणीनंतर दुसऱ्या दिवशी पाणी दिले. पहिल्या पंधरा दिवसांत पहिली खुरपणी केली. पुढे दीड महिन्याने विरळणी केली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्वारी पोटरीत असताना दुसरे पाणी दिले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दाणे भरताना तिसरे पाणी दिले. पहिल्या पंधरवड्यात चांगल्या वाढीसाठी १९ः१९ः१९  एक किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली, तर पुढे पंधरा दिवसांच्या फरकाने पहिल्यांदा १२ः६१ः० आणि ०ः५२ः३४ फवारणी केली. शेवटची फवारणी ०ः०ः५० एक किलो २०० लिटर पाण्यात मिसळून केली. त्यानंतर जानेवारीमध्ये हुरडा काढणीला सुरवात झाली. कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने काळेगावमध्ये गेल्या तीन वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या विविध जातीच्या स्वीकारार्ह चाचणीचा कार्यक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत काळेगावमध्ये हुरड्यासाठी असणाऱ्या फुले मधुर या जातीच्या लागवडीचे प्रात्यक्षिक प्रयोग घेतले. यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. गावातील वीसहून अधिक शेतकऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यापैकी चार शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष व्यावसायिकदृष्ट्या उपयोग करून घेतला. त्यापैकी हणमंत घायतिडक हे एक आहेत.

फुले मधुर’ ठरली फायद्याची

कृषी विज्ञान केंद्राने २०१५-१६ मध्ये हणमंत घायतिडक यांना खास हुरड्यासाठी फुले मधुर या जातीचे मूठभर बियाणे दिले होते. यातून त्यांनी केवळ चार गुंठ्यात लागवड केली. त्या वेळी १५ ते २० किलो हुरडा मिळाला. जेव्हा त्यांनी स्वतः हुरडा खाल्ला आणि मित्र, नातेवाइकांना दिला, तेव्हा त्याच्या दाण्याचा छोटा आकार, विशिष्ट गोडी, रंग आणि सोलण्यासाठी कणसेही खूपच हलकी असल्याचे दिसून आले. त्यानंतर मात्र सलगपणे तीन वर्षे त्यांनी हुरडा करायला सुरवात केली. आता ते हुरडा उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जातात. २०१५-१६ मध्ये हणमंत घायतिडक यांना अवघा २० किलो हुरडा मिळाला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ४० किलो, २०१७-१८ मध्ये ६०० किलो आणि यंदा २०१८-१९ मध्ये पंधरा गुंठ्यातून ७०० किलो हुरडा मिळाला. हुरड्याच्या कणसांना १०० ते १२० रुपये किलो आणि सोललेल्या हुरड्याच्या दाण्यांना २०० ते २५० रुपये असा दर मिळतो आहे. पहिल्या वर्षी घायतिडक यांना सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी ९० हजार आणि यंदाच्या वर्षी एक लाख पाच हजारांपर्यंत उत्पन्न पोचले आहे. पाच हजारांचा खर्च वजा जाता निव्वळ एक लाखाचा नफा त्यांच्या हाती पडला. पंधरा गुंठे क्षेत्रात फक्त ज्वारी केली असती, तर चार ते पाच क्विंटल उत्पादन झाले असते. दराचा विचार करता केवळ बारा हजार रुपयांचे उत्पन्न झाले असते. हुरड्यामुळे उत्पादनाचा आकडा सात क्विंटल आणि उत्पन्न लाखापर्यंत पोचले आहे.

परजिल्ह्यात मिळविले मार्केट

ज्वारीचा हुरडा हे सोलापूरचे वैशिष्ट्य. महामार्गावरील हॅाटेल्स आणि काही कृषिपर्यटन केंद्रात हुरडा हमखास मिळतो. शिवाय शहरातील काही विक्रेतेही हुरडा विक्रीसाठी ठेवतात. साधारण जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यांत हुरड्याला मागणी असते. हणमंत यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. त्या दृष्टीने शेतात टप्प्याने लागवड केल्याने संपूर्ण कालावधीत त्यांच्याकडे हुरडा मिळतो. आज काही स्थानिक विक्रेते आणि कृषिपर्यटन केंद्रासह लातूर, पुणे, मुंबई शहरात हणमंतराव हुरडा पोचवतात. फोनवरूनही अॅार्डर मिळते. या कालावधीत पत्नी मनीषा, मुलगी शरयू, मुलगा सौरभ हे हणमंत यांच्याबरोबर कणसे काढणे, हुरड्यासाठी सोलणे या कामात साह्य करतात. त्यामुळे कधीही मागणी येवो, हुरडा किंवा कणसे त्वरित देण्याची सोय त्यांच्याकडे आहे.

ज्वारी उत्पादनात बार्शीची आघाडी सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात बार्शी भागात ज्वारीचा सर्वाधिक पेरा होतो. या भागातील ज्वारीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. खास सोलापुरी मालदांडी, दगडी अशा ज्वारी जातींचा हा परिणाम आहेच, त्याचबरोबरीने या भागातील जमीन ज्वारीसाठी चांगली आहे. येथील जमिनी दुष्काळी परिस्थितीतही पाण्याचा ताण सहन करू शकतात. त्यामुळे ज्वारी उत्पादन आणि गुणवत्ता चांगली मिळते. त्यामुळे हुरडाही चांगला तयार होतो. साहजिकच, दरवर्षी कितीही दुष्काळी परिस्थिती असो वा चांगला पाऊस होवो, बार्शी भागात ज्वारीचे क्षेत्र दरवर्षी वाढतच असते. ज्वारीचे कोठार गणल्या जाणाऱ्या मंगळवेढ्यानंतर बार्शीची ज्वारी उत्पादनात आघाडी आहे.

- हणमंत घायतिडक, ९०२१२२५५२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com