प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरता

सोयाबीनवर प्रक्रिया करणारी यंत्रणा
सोयाबीनवर प्रक्रिया करणारी यंत्रणा

सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा रोहित देशमुख यांनी परिसरामध्ये उपलब्ध होणारा शेतमाल, फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.  उद्योगातील प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला स्वावलंबी होत आहेत. श्रद्धा देशमुख यांनी सौरऊर्जेव्दारे वाळविलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरू केली आहे. या उत्पादनासही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

श्रद्धा देशमुख यांचे माहेर देगलूर तालुक्यातील होट्टल. देशमुख या अभियांत्रिकी पदवीधर आहेत.  सगरोळी येथील रोहित देशमुख यांच्याशी त्यांचा विवाह झाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रोहित देशमुख हे काही काळ नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत होते. तेथील वास्तव्यात आदिवासी महिला मका, तसेच अन्य शेतमालापासून पारंपरिक पद्धतीने मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने तयार करून विक्री करीत होत्या. या महिलांच्यापासून श्रद्धा देशमुख यांना प्रक्रिया उद्योगाची प्रेरणा मिळाली. सगरोळी येथे आल्यानंतर श्रद्धा देशमुख यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून परिसरामध्ये उपलब्ध होणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्याची संकल्पना मांडली. कुटुंबीयांनीदेखील त्यांना प्रोत्साहन दिले. देशमुख यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्री या नावाने प्रक्रिया उद्योगाची नोंदणी केली. सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्रातील गृह विज्ञान विशेषज्ञ प्रा .माधुरी रेवणवार यांचे श्रद्धा देशमुख यांना प्रक्रिया उद्योगासाठी तांत्रिक मार्गदर्शन मिळते. सोयाबीन प्रक्रियेपासून सुरवात  सगरोळी परिसरात सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी पुरेसे सोयाबीन उपलब्ध झाले. सोयाबीनमधील पोषण मूल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन श्रद्धा देशमुख यांनी २०१३ मध्ये उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून सोया दूध निर्मिती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात सोया दुधाची घरगुती पद्धतीने निर्मिती केली जात असे. उत्पादित होणाऱ्या सोयाबीन दुधाचे वाटप अनाथालयातील मुले, तसेच संस्थेतील खेळाडूंना केले जात असे. पहिल्या टप्प्यात दररोज १५ ते २० लिटर सोया दूध निर्मिती केली जात असे. टप्प्याटप्प्याने मागणी वाढल्याने देशमुख यांनी सोया दूध निर्मिती संयत्र बसविले. तेलंगणा, महाराष्ट्राच्या सीमेवरील गाव परिसरातील नागरिकांना सोया दुधाच्या वापराबाबत फारशी जागरुकता नव्हती. याच बरोबरीने सोया दुधाचे पॅकिंग करणे आर्थिकदृष्‍ट्या परवडत नसल्यामुळे श्रद्धा देशमुख यांनी सोया दुधापासून पनीर निर्मिती सुरू केली. ग्राहकांच्या मागणीनुसार २५० ग्रॅम ते ५०० ग्रॅममध्ये सोयाबीन पनीर पॅकिंग केले जाते. सध्या दर आठवड्याला ३० किलो सोया पनीर उत्पादन होते.  पनीरची विक्री प्रामुख्याने परिसरातील हॉटेल्स, धाब्यांमध्ये केली जाते. प्रतिकिलो ३०० रुपये दराने पनीरची विक्री होते. श्रद्धा देशमुख यांनी प्रक्रिया प्रकल्पामध्ये गरजू महिलांना रोजगार दिला आहे. या प्रकल्पामध्ये सध्या चार महिला आणि एक पुरुष यांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. विविध हंगामामध्ये उत्पादनाच्या निर्मितीच्या गरजेनुसार मजुरांची गरज वाढते. त्या वेळी महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला जातो. प्रक्षेत्रावरच कच्चा मालाची उपलब्धता कृषी विज्ञान केंद्राच्या पीक प्रक्षेत्रावर सीताफळ, लिंबू, आवळा, आंबा, पेरू, गुलाब, कोरफड, शेवगा आदी फळे, भाजीपाला आणि फुलझाडांची लागवड आहे. प्रक्षेत्राभोवती नैसर्गिक कुंपण म्हणून करवंदाची लागवड  करण्यात आलेली आहे. त्यामुळे  हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात करवंद उपलब्ध होतात. एक एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने कोरफड लागवड करण्यात आली आहे. यामुळे प्रक्षेत्रावर प्रक्रिया उद्योगासाठी कच्चा माल उपलब्ध होतो, तसेच वाहतूक खर्चातही बचत होते. पॅकिंग, लेबलिंग करून विक्री उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीच्या विविध उत्पादनांचे विशिष्ट वजनामध्ये पॅकिंग केले जाते. त्यावर उत्कर्ष ब्रॅंड हे  लेबल चिटकवले जाते. प्रक्रिया उत्पादनांची सगरोळी गावामध्येच विक्री होते. याशिवाय नांदेड शहरासह जिल्ह्यातील हाॅटेल्स, रेस्टॅारंट, भोजनालये यांच्याकडून सोया पनीर, सीताफळ पल्प, विविध प्रकारची लोणची, स्क्वॅश यांना मागणी वाढत आहे. विविध ठिकाणी भरणारी कृषी प्रदर्शने, महिला स्वंयसहायता गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर उत्पादनांची विक्री होते. कृषी विज्ञान केंद्राला भेट देणारे शेतकरी, तसेच नागरिक प्रक्रिया उत्पादनांची खरेदी करतात. सीताफळ पल्पनिर्मिती कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर  सीताफळांच्या दीड हजार झाडांची लागवड आहे. सेंद्रिय पद्धतीने या बागेचे व्यवस्थापन केले जाते. सीताफळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत असतो.  यंत्राव्दारे, तसेच हाताने सीताफळ पल्पची निर्मिती केली जाते. त्यानंतर वर्षभर सीताफळ पल्प विक्री केली जाते. देशमुख यांनी २०१७-१८ मध्ये १ टन आणि २०१८-१९ मध्ये ३ टन सीताफळ पल्प तयार केला होता. हाताने तयार केलेला पल्प ४०० रुपये किलो आणि यंत्राने केलेला पल्प २५० रुपये किलो दराने विकला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग सध्या फेसबुक, व्हॅाट्सॲप ग्रुप, यू-ट्यूब आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्कृर्ष अॅग्रो इंडस्ट्रीच्या उत्पादनांची विक्री केली जाते. यामुळे मुंबई, पुणे, तसेच चेन्नई येथूनदेखील उत्पादनांना वाढती मागणी आहे. येत्या काळात आॅनलाइन मार्केटिंग करण्यात येणार असल्याची माहिती श्रद्धा देशमुख यांनी सांगितले.

महिलांना प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध गृह उद्योग, प्रक्रिया उद्योगांचे वर्षभरात १२ प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत एक हजार महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी लोणचे, पापड, मिरची पावडर, मसाले, विविध डाळ निर्मितीचे उद्योग सुरू केले आहेत. उत्पन्नाचा स्त्रोत मिळाल्याने अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत.

प्रक्रियेसाठी यंत्रे   श्रद्धा देशमुख यांनी परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन गावशिवारात उपलब्ध होणाऱ्या फळांपासून विविध उत्पादने तयार केली आहेत. त्यांच्या प्रक्रिया युनिटमध्ये सोयाबीन दूध तयार करण्याचे यंत्र, कोरफडीवर प्रक्रिया करणारे यंत्र, सीताफळ पल्प काढण्याचे यंत्र, पापडनिर्मिती यंत्र उपलब्ध आहे. वाळविलेला भाजीपाला बाजारपेठेची मागणी लक्षात घेत यंदाच्या वर्षीपासून श्रद्धा देशमुख यांनी सौरऊर्जेवर आधारित निर्जलीकरण संयंत्राच्याव्दारे वाळविलेल्या भाजीपाल्याच्या निर्मितीस सुरुवात केली आहे. मेथीसह अन्य पालेभाज्या, कांदा यांचे निर्जलीकरण केले जाते. औषधी गुणधर्म असलेली शेवगा पानांची पावडर, आले पावडर निर्मिती केली जाते.  आले पावडर आणि शेवगा पावडर ४०० रुपये किलो  आणि वाळवलेले कांद्याचे काप हे १५० रुपये किलो या दराने विकले जातात.

उत्पादने

  •  आंबा ः  लोणचे, पन्हे
  •  करवंद ः स्क्वॅश, लोणचे
  • लिंबू ः सिरप, लोणचे.
  • आवळा ः कॅन्डी,स्क्वॅश,
  • सिरप, मुरंबा, लोणचे, सुपारी
  •  कोरफडः  साबण, हॅन्डवाॅश, सरबत, जेल, शाम्पू.
  •  सीताफळ ः पल्प
  • पेरू ः जेली
  •  गुलाब ः सरबत,साबण, हॅन्ड वाॅश
  •  सोयाबीन ः दूध, पनीर
  •  पॅशन फ्रुटः सरबत
  • बेकरी उत्पादने ः केक
  • -  श्रद्धा देशमुख, ९१५८५९७७६६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com