अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून मिळाला आधार

बचतीमधून झाली प्रगती महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला विकासासाठी सुरू केलेल्या चळवळीचा ग्रामीण भागातील महिलांना फायदा होत असल्याचे बेल्हेकरवाडीत दिसून आले आहे. मजुरासाठी धडपड करणाऱ्या महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. पक्की घरे झाली. भटकंती थांबली हे बचतीचे फलित आहे. - मयुर कुलकर्णी, (तालुका समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ)
बेल्हेकरवाडी (जि.नगर) ः नियोजनासाठी एकत्र  आलेल्या बचतगटातील महिला.
बेल्हेकरवाडी (जि.नगर) ः नियोजनासाठी एकत्र आलेल्या बचतगटातील महिला.

बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर, ढगेवस्ती राहणारे बहूतांश कुटुंबे भूमीहिन, अल्पभूधारक. त्यामुळे ही कुटूंबे रोजगारासाठी स्थलांतरीत होत होती. मात्र आता येथील महिलांनी एकत्र येऊन बचतगट सुरु केले. गटाच्या माध्यमातून पुरक उद्योगांना सुरवात करत कुटुंबांना त्यांनी आर्थिकदृष्या सावरले आहे. 

साधारण तीन हजार लोकसंख्या असलेल्या बेल्हेकरवाडीअंतर्गत तुकारामनगर, ढगेवस्ती आहे. येथील काही कुटुंबाच्या जमिनी धरणात गेल्याने ती स्थलांतरित झाली आहेत. येथील बहुतांश कुटुंबे ही भूमिहिन, अल्पभूधारक आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने येथील महिला, पुरुष मोलमजुरी करायचे. अनेक कुटुंबे रोजगारासाठी विविध कामांच्या शोधात स्थलांतरीतही व्हायची. या कष्टकरी महिलांच्या जीवनात बचत गटातून उन्नती आली. सखुबाई राजेंद्र तेलोरे यांच्या अध्यक्षतेखाली २००५ साली दहा महिलांनी एकत्र येऊन पहिला श्रीस्वामी समर्थ महिला बचत गट सुरू केला. नित्यनियमाने बचत सुरू केली. त्यानंतर रेणुकामाता, साईप्रताप, दत्तगुरू, दत्तकृपा, जयमल्हार असे महिला बचतगट सुरू झाले. या गटातून सुमारे ८० महिला एकत्र आल्या. त्यांनी कर्ज घेऊन अंतर्गत व्यवहार सुरू केले. या गटाला महिला आर्थिक विकास महामंडळाने पाठबळ देऊन कर्ज उपलब्ध करू दिले. त्यामुळे आता तुकारामनगरमधील महिला सक्षम झाल्या आहेत, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड यांनी दिली.

सामाजिक कामात सहभाग बेल्हेकरवाडीतील तुकारामनगरमध्ये राहणाऱ्या महिलांची बचत गटामुळे उमेद वाढली. बचत गटात सहभागी झालेल्या महिला सामाजिक कामातही पुढाकार घेतात. महिलांच्या हिमोल्गोबीन तपासणी करण्यासाठी शिबिरासह अन्य उपक्रम राबवतात. लेक वाचवा, लेक शिकवा हा उपक्रमही घेतात. येथे राहणाऱ्या कुटुंबांना हक्काच्या जागा नाहीत, त्यामुळे हक्काच्या जागा मिळविण्यासाठी महिलांनी ग्रामसभेत आवाज उठवला. कधीही घराबाहेर शब्द न बोलणाऱ्या महिलांना सामाजिक ज्ञानासोबत बोलण्याची हिंमत वाढली. आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळाले.

रोजगार मिळाला, स्थलांतर थांबले महिला बचतगटातून बचत झाल्यानंतर गटांना कर्ज मिळाले. त्यामुळे महिलांना पूरक व्यवसाय सुरू करता आले.  नंदा कदम यांनी बचतगटात सहभागी होऊन मिळालेल्या कर्जावर दुग्धव्यवसाय सुरू केला. मुलीचे लग्न केले. दुकान सुरू केले. रोहिणी शिंदे यांनी बचतगटाच्या पैशाच्या आधारावर दीड एकर शेती खरेदी केली. शेळीपालन, गायपालन सुरू केले. घराचे बांधकाम केले. भूमिहिन केशरबाई कुरकुटे यांनी बचत गटाच्या पैशाच्या अाधाराने घराचे बांधकाम केले. त्यांनी शेतीमध्ये कूपनलिका घेऊन डाळिंबाची लागवड केली आहे. अलका आहेर यांनी पंधरा हजारांचे कर्ज काढून गाईंसाठी गोठा बांधला. कुंभार व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक केली. रेणुकामाता महिला बचत गटातून मिळालेले पैसे चंद्रकला संत यांनी मुलाला दिले. मुलाने गहू कापणीसाठी हार्वेस्टर खरेदी केला. अनेक महिलांना मुलां-मुलींचे लग्न, शिक्षणासाठी बचत गटातून मिळालेला पैसा कामी आला.

पंचवीस महिलांनी केला पक्का निवारा बेल्हेकरवाडीच्या तुकारामनगरात राहण्याऱ्या बहुतांश कुटुंबांची घरे झोपडीवजा. या महिलांनी बचत गटांत सहभाग घेतला आणि आर्थिक बाजू उंचावण्याला मदत झाली. बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक स्राेतातून तब्बल पंचवीस महिलांनी पक्की घरे बांधली आहेत. त्यामुळे भूमिहिन, अल्पभूधारक कुटुंबांना आता हक्काची घरे मिळाली आहेत. महिला बचत गटाचे हे मोठे यश मानावे लागेल, असे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी संगिता खंडागळे यांनी सांगितले. आतापर्यंत या गटांनी ३२ लाखांचे कर्ज मिळालेले असून त्यातील बारा लाख रुपयांची परतफेड झाली आहे.  

म हिलांनी सुरू केलेले व्यवसाय

  • शेळीपालन     ३५
  • गायपालन    १७
  • जनरल स्टोअर्स    ३
  • पिठाची गिरणी    ३
  • शेती विकास    ३०
  • हार्वेस्टर    १
  • कुंभार काम    ३
  • पूरक व्यवसायाला सुरवात आमच्या येथील बहुतांश कुटुंबे भूमिहिन. त्यामुळे रोजगाराचा कायम प्रश्न. मात्र, आम्ही महिला गट सुरू करून बचत केली. याचा चांगला फायदा झालेला असून महिलांनी पूरक व्यवसाय सुरू केले आहेत. बचत गटामुळे प्रगती साधता येते, संसार सावरता येतो, हे आमच्या महिलांनी दाखवून दिले आहे. - रोहिणी राजेंद्र शिंदे

    स्थलांतर थांबले... भूमिहीन, अल्पभूधारक महिलांची रोजागारासाठी सुरू असलेली धडपड महिला बचत गटामुळे उंचावली. पैसे खेळता होऊ लागल्याने रोजगाराचे साधन मिळाले. महिलांचे संघटन कामी आले आहे. घर संसार सावरता आले. स्थलांतर थांबले याचा आम्हाला अभिमान आहे. - सकुबाई राजेंद्र तेलोरे

    - मयुर कुलकर्णी, ८३२९५१४९५८ (तालुका समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com