जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणी

जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणी
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणी

जनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या मनात येईल, आपल्याला वेळ मिळेल त्या वेळी पिण्यासाठी पाणी देतो. याचा दुष्परिणाम निश्‍चितच जनावरांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. हे लक्षात घेऊन जनावरांना त्यांच्या गरजेनुसार पाणी आणि संतुलित खाद्य द्यावे. दूध उत्पादन व इतर पशूंपासून मिळणाऱ्या उत्पादनासाठी कर्बोदके, प्रथिने, पाणी, क्षार व जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ इत्यादी पोषणतत्त्वांची गरज असते. आपण पशुउत्पादन वाढवण्यासाठी आहारात पेंडा ढेप, धान्य, क्षार मिश्रण यांचा नियमित वापर करतो. परंतु हे उत्पादन टिकवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे पाणी. आपण त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. जनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या मनात येईल, आपल्याला वेळ मिळेल त्या वेळी पिण्यासाठी पाणी देतो. याचा दुष्परिणाम निश्‍चितच जनावरांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. १) गाय, म्हैस, शेळी, मेंढी यापासून दूध उत्पादन मिळते. या दुधामध्ये सर्वांत जास्त प्रमाण असणारा घटक म्हणजे पाणी. दुधामध्ये ८५ टक्के पाणी असते म्हणजेच याचा अर्थ जनावर पाणी जेवढे जास्त पिते, तेवढ्या प्रमाणात दूध उत्पादनात वाढ होऊ शकते. २) जनावराने पाणी पिण्याबरोबरच ते पाणी शरीरात टिकून राहिले पाहिजे. त्यासाठी देशी जनावरांना कमीत कमी दररोज ३० ते ४० ग्रॅम मीठ द्यावे. संकरित गायी व मुऱ्हा/ जाफराबादी म्हशी यांच्या आहारात ६० ते ७० ग्रॅम मिठाचा वापर करावा. ३) जनावराने पाणी जास्त पिण्यासाठी जनावरांसमोर २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. जेणेकरून तहान लागेल त्या वेळी जनावर पाणी पिऊ शकेल. ४) रक्तातसुद्धा पाणीच जास्त प्रमाणात असते. त्यासाठी जनावरांनी गरजेनुसार पाणी पिल्यास रक्त बनण्याची प्रक्रियाही चांगल्याप्रकारे सुरू राहील. रक्ताची कमतरताही होणार नाही. ५) जनावरांच्या पोट व आतड्यात पचलेले अन्न सर्व शरीरात पोचवण्याचे कामही पाणी/ रक्त यामार्फत होत असते. समजा शरीराला गरजेपेक्षा पाणी कमी पडले तर पुरेशा पाण्याअभावी पचलेले अन्नही शरीरात शोषले जात नाही किंवा शरीराच्या सर्व भागाला पचलेल्या पोषणतत्त्वांचा गरजेनुसार पुरवठा होत नाही. ६) जनावरांना जर वाळला चारा जास्त प्रमाणात देत असू त्या वेळी जनावरांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर खाललेला चारा मऊ होत नाही. चांगल्याप्रकारे रवंथ होऊन अशा चाऱ्याचे पुरेसे पाणी न मिळाल्यास पोटातील चारा फुगत नाही/ मऊ पडत नाही. यामुळे जनावरांना पोट भरल्याचे समाधानही मिळत नाही. ७) पाण्याअभावी शरीरात लाळही पुरेशा प्रमाणात होत नाही. लाळेचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही लाळ पुरेशा प्रमाणात वाळला चारा, पशुखाद्य यामध्ये मिसळली जात नाही. चारा मऊ न झाल्यामुळे चाऱ्याचे पचनही व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर पोटात तयार झालेली आम्लताही कमी होत नाही. त्यामुळे आम्लधर्मीय अपचनाचा त्रास वाढतो. ८) शरीराला पाणी कमी पडल्यास जनावर अशक्त होते, कातडी निस्तेज व कोरडी होते, डोळे पाणीदार राहत नाहीत. ९) शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे शरीरात मूत्र कमी प्रमाणात तयार होते. कमी मूत्रामध्ये शरीरात तयार झालेले टाकाऊ पदार्थ, काही विषारी पदार्थ पूर्णपणे विरघळत नाहीत. मूत्राद्वारे शरीरातून बाहेर टाकले जात नाहीत. यामुळे असे टाकाऊ/ विषारी पदार्थ शरीरात जास्त काळ साठून राहिल्यास किडनीमध्ये बिघाड होवू शकतो. पूर्ण शरीरावर हळूहळू दुष्परिणाम दिसू लागतात. १०) पाण्याच्या अभावी जनावरांच्या शरीरातील सांध्यांचे कार्यही सुरळीत चालत नाही. यामुळे अखडलेले सांधे, सांधेदुखी अशा समस्या दिसू लागतात. ११) पाण्याअभावी प्रजनन संस्था, श्‍वसनसंस्था, पचनसंस्था ओलसर न राहता कोरडी होते. यामुळे या संस्थेचा दाह होण्याची शक्‍यता वाढते. १२) पाण्याअभावी शरीरात संप्रेरकांचा अभाव होवून विविध शरीरक्रिया, प्रजननावर विपरीत परिणाम होतात. १३) पाण्याअभावी गर्भाशयातील गर्भालाही पोषणतत्त्वे पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाहीत त्यामुळे गर्भाची वाढ उत्तमप्रकारे होत नाही. १४) पाण्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते. यामध्ये शरीराला पाणी कमी पडल्यास शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यास मर्यादा येतात. १५) जनावरांच्या शरीरातील १० टक्के पाणी जरी कमी झाले तरी त्याचे दुष्परिणाम जनावरांच्या शरीरावर दिसून येतात. जनावरांनी पाणी कमी पिण्याची कारणे ः १) मीठ क्षारांचा अभाव, अस्वच्छ पाणी, केवळ सतत हिरव्या चाऱ्याचा पशुआहारात वापर. २) उन्हाळ्यात गरम पाणी पिण्यास उपलब्ध असते. सतत थंड ठिकाणी बांधून ठेवणे, आहारात वाळलेल्या चाऱ्याचा अभाव. मुबलक पाणी पिण्यासाठी उपाययोजना ः १. देशी जनावरांच्या आहारात दररोज ३० ते ४० ग्रॅम मिठाचा, तर संकरित गायी/मुऱ्हा/जाफराबादी म्हशींच्या आहारात ६० ते ७० ग्रॅम मिठाचा वापर करावा. २. जनावरांच्या दैनंदिन आहारात मिठाचा वापर करावा. ३. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ, ताजे पाणी २४ तास उपलब्ध करून द्यावे. ४. उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. ५. जनावरांना मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये ठेवल्यास जनावर गरजेनुसार उन्हात, सावलीत बसू शकेल, पुरेसे पाणीही पिते. ६. जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवा/वाळला चारा तसेच पशुखाद्याचा वापर करावा. ८. वेळोवेळी पाण्याचे हौद स्वच्छ धुवून घ्यावेत. ९. गरजेनुसार इलेक्‍ट्रोलाईटस्‌ पावडरचा पाण्यामध्ये वापर करावा. १०. पाणी पिण्यासाठी अल्प प्रमाणात मीठ/पीठ पाण्यात मिसळावे. यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. मीठ/पीठ जास्त प्रमाणात वापरू नये. संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com