ऊस पीक व्यवस्थापन

जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी पाचट आच्छादन करावे
जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी पाचट आच्छादन करावे

सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाचटाचा आच्छादनासाठी वापर करणे आवश्यक आहे. अवर्षणाच्या काळात तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते. मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळाद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. हरितद्रव्यांचे प्रमाण घटल्यामुळे पाने पिवळी पडू लागतात. उसाच्या पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कांड्यांची लांबी, संख्या आणि जाडी कमी होऊन वजनात घट येते. उसामध्ये तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते. साखर उतारा घटतो. पाण्याचा तीव्र ताण बसल्यास वाढ खुंटते.

 पाचटाचा वापर तोडणी केल्यानंतर हेक्टरी ७.५ टन ते १० टन पाचट निघते. दुष्काळी परिस्थितीत  पाचटाचा वापर आच्छादनासाठी करावा. यामुळे बाष्पीभवन कमी होते. हे आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरूरीचे आहे. ऊस लागवड केल्यानंतर दीड महिन्यापासून चार महिन्यांच्या उसात पाचट टाकणे शक्य होते. पाचट किंवा त्याची कुट्टी आच्छादनासाठी वापरावी. या तंत्राने महिन्याला एका पाण्याच्या पाळीवर ऊस वाचविणे शक्य आहे.

ठिबक सिंचन  ऊस लागवड जोड ओळ पद्धतीने केल्याने सर्वांत जास्त उत्पादन आल्याचे सिद्ध झाले आहे. ३ फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सऱ्यांमध्ये ऊस लागण करून एक सरी रिकामी सोडून पुन्हा दोन सऱ्यामध्ये लागवड करावी. रोपांची लागवड करताना भारी जमिनीत दोन रोपांत २ फूट अंतर ठेवावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरताना त्यामध्ये अर्धा फूट अंतर ठेऊन लागवड करावी. दोन ओळीच्या मध्यावर थोडी सरी सपाट करून ठिबक सिंचन नळी ठेवावी. ड्रिपरच्या प्रवाहानुसार दोन ड्रिपरमध्ये दोन ते अडीच फूट अंतर ठेवावे.

सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीतील अंतर्गत तापमान संतुलित राहते. जमिनीची जलधारणक्षमता, जडणघडण आणि हवेचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर सेंद्रिय कर्बाचा पुरवठा सुरळीत होतो. सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रामुख्याने हिरवळीचे खत, हंगामानुसार हेक्टरी २० ते ३० टन शेणखत, ५ टन कंपोस्टखत आणि ५ टन गांडूळ खतचा वापर करावा. त्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.

आंतरमशागत ज्या ठिकाणी पाचटाचा वापर केलेला नाही तेथे पाण्याचा ताण पडल्यानंतर जमीन भेगाळते. त्यामुळे जमिनीतील ओल बाष्पीभवनाने झपाट्याने कमी होते. जमिनीला भेगा पडू नयेत म्हणून आंतरमशागतीची (कुळवणी) कामे करावीत. मातीच्या थरामुळे आच्छादन तयार होऊन भेगा पडण्याचे प्रमाण लांबणीवर पडते.

पीक व्यवस्थापन  

  • ठिबक सिंचनाचा वापर करावा. सरी वरंबा असल्यास एक आड एक सरीस पाणी द्यावे.
  • पाण्याचा ताण पडत असल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी. तसेच दर ३ आठवड्यांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया फवारणी करावी.
  •  - ०२१६९-२६५३३३ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com