गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसा

लाठी जि. वाशीम ः संस्थेच्या गोशाळेमध्ये भाकड तसेच आजारी जनावरांचे संगोपन केले जाते.
लाठी जि. वाशीम ः संस्थेच्या गोशाळेमध्ये भाकड तसेच आजारी जनावरांचे संगोपन केले जाते.

लाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा गोरक्षण जीवदया संस्थेने परिसरातील गावांमध्ये लोकसहभागातून अंधश्रद्धा निर्मूलन, विद्यार्थी शिक्षण याचबरोबरीने गोवंश संगोपन आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित केले आहे. संस्था लोकसहभागातून ग्राम आणि शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबविते.

व्यसनमुक्‍ती, यात्रा-जत्रांमधील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामविकासाच्या उद्देशाने लाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा गोरक्षण जीवदया संस्थेची वाटचाल सुरू आहे. गोरक्षणासोबतच दुर्गम मेळघाटातील महिलांसाठी 'एक घर- एक साडी' यासारख्या सामाजिक उपक्रमासाठी देखील संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. पब्लिक ट्रस्ट अन्वये नोंदणी असलेल्या या संस्थेचे संस्थापक दिलीप नामदेव पवार आहेत. संस्थेचे अध्यक्ष शामसुंदर मुंदडा आणि सचिव मदनलाल गोयंका आहेत. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या दिलीप पवार यांना समाजातील अनिष्ठ रुढी, परंपराविरोधात जागृतीचा ध्यास लागला. ग्रामीण भागात व्यसनाधीनतेविरोधात जाणीवजागृती करण्याचा त्यांनी निर्धार केला. संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्‍ती सोबतच समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम वऱ्हाडासह विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये करत आहेत. जनजागृतीवर दिला भर ग्रामीण भागात आजही विविध प्रकारच्या अंधश्रद्धा दिसतात. याबाबत दिलीप पवार यांनी विदर्भातील विविध गावांमध्ये जनजागृती केली. लाठीनजीक असलेल्या धमधमी गावामध्ये दिलीप पवार यांनी १९९९ साली 'एक गाव- एक उत्सव' या उपक्रमांतर्गंत आयोजित अन्नदान कार्यक्रमात ग्रामस्थांचे प्रबोधन केले. त्यांच्या पुढाकारामुळे गावातील जनावरांचा बळी देण्याची प्रथा संपुष्टात आली. याच कार्यक्रमात गावातील शालेय मुलामुलींना वह्या, पुस्तकांसह शालेय साहित्याचे वितरण झाले. गरजू महिलांना दहा हजार साड्यांचे वितरणही लोकसहभागातून करण्यात आले. दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांचे वाटप, आदिवासी भागात कपड्यांचे वाटप केले जाते.

आदिवासी गावांमध्ये विविध उपक्रम  दुर्गम मेळघाटातील आदिवासींची दोनवेळच्या जेवणाची आबाळ होते. दुर्गम भागातील कुटुंबांकडे पुरेसे कपडेही नसतात. ही बाब लक्षात घेत संस्थेने 'एक घर- एक साडी' ही संकल्पना मांडली. त्याकरिता समाजातील दानशूर लोकांना साड्या व लहान मुलांचे कपडे दान करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमास दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या सात वर्षांपासून मेळघाटातील आदिवासी पट्यात दरवर्षी सुमारे पन्नास हजारांवर कपड्यांचे वाटप संस्थेच्या माध्यमातून होते. भद्रावती येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे सुमारे दहा हजारांवर साड्या मेळघाटात वाटपासाठी दिल्या जातात, अशी माहिती दिलीप पवार यांनी दिली. आदिवासींच्या उत्कर्षासाठी सुरू असलेल्या सेवाभावी कार्याची दखल राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने देखील घेतली आहे.

गोवंश संरक्षणाचा वारसा लाठी येथे गोशाळा उभारण्यात आली आहे. संस्थेला पशुसंवर्धनासाठी जागा दान मिळाली. त्यासोबतच गोठ्यामधील जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याकरिता ८० हजार रुपये कायमस्वरूपी सुरक्षित ठेव म्हणून जमा करण्यात आली आहे. या संस्थेत गेल्या ३५ वर्षांपासून गोरक्षणाचे काम होत आहे. जखमी, आजारी जनावरांवर उपचार करून त्यांचे संगोपन केले जाते. यासाठी पशुतज्ज्ञाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गोशाळेमध्ये भाकड जनावरांचे संगोपन केले जाते. सध्या गोशाळेत २५० पेक्षा अधिक जनावरे आहेत. जनावरांसाठी चारा, पाणी तसेच औषधोपचाराचा खर्चदेखील संस्था स्बळावर करते. काही दानशूरांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते, अशी माहिती डॉ. राम नागे यांनी दिली. जनावरांच्या खाद्यासाठी संस्थेकडे ३५० क्‍विंटल वाळलेला चारा (कुटी) आहे. गरजेनुसार समाजातील दानशूरांना चाऱ्यासाठी आवाहन करण्यात येते. त्यामुळे पुरेसा चारा उपलब्ध होतो. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. गोशाळेत बहुतांश जनावरे ही देशी किंवा स्थानिक जातीची आहेत. यातील काही जनावरांपासून दूध संकलित होत असले तरी त्यांची क्षमता कमी असल्याने संस्थेतच या दुधाचा उपयोग होतो. दुग्धोत्पादनावर भर आर्थिक स्राेत बळकटीकरणासाठी येत्या काळात दुधाळ जनावरच्या संगोपनाचा निर्णय संस्थेने घेतला आहे. यासाठी देशभरातील जातिवंत दुधाळ गोवंशाची निवड केली जाणार आहे. गोशाळेत दुग्धोत्पादन भर देत परिसरातील ग्राहकांना दुधाची विक्री केली जाणार आहे. याचे नियोजन संस्थेने केले आहे.  दूध उत्पादनाच्या बरोबरीने येत्या काळात दुग्धजन्य पदार्थ तसेच गोमूत्र, शेणापासून विविध उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारने गोरक्षण संस्थांच्या बळकटीकरणाला चालना दिली आहे. त्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली असून दिलीप बाबा संस्थेच्या गोरक्षण उपक्रमाचा या प्रकल्पात समोवश करण्यात आला आहे. आर्थिक मदतीचा वापर संस्थेचे आर्थिक स्राेत बळकटीकरणासाठी करण्यात येत आहे.

जमीन सुपीकतेसाठी प्रयत्न

संस्थेची शेती असून त्यामध्ये जनावरांकरिता हिरव्या चाऱ्याची लागवड केली जाते. सद्यःस्थितीत तीन एकरांवर मका लागवड करण्यात आली आहे. संस्थेची सुरवातीला २७ एकर जमीन होती. ती आता ४० एकरांवर पोचली आहे. यातील काही क्षेत्रांवर हंगामी पिकांची लागवड केली जाते. जमिनीचा पोत राखण्यासाठी गोशाळेत उपलब्ध होणाऱ्या शेणखताचा वापर केला जातो. यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे. त्याची पीक उत्पादनवाढीसाठीही फायदा झाला आहे.

संस्थेचे उपक्रम

  •   दरवर्षी रक्तदान शिबिर.
  •   लाठी येथे संस्थेचे वाचनालय.
  •   विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांचे वाटप.
  •   एक गाव- एक उत्सव.
  •   व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती.
  •   गोशाळेच्या माध्यमातून जनावरांचे संगोपन.
  •   येत्या काळात जनावरांसाठी फिरते रुग्णालय.
  • - डॉ. राम नागे ः ८३०८३९३१९७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com