शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षम

महिला बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालनास सुरवात.
महिला बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालनास सुरवात.

चिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे परिसरातील महिला बचत गटांना प्रशिक्षण, आर्थिक मदत केली जाते. याचबरोबरीने सामाजिक उपक्रमदेखील राबविले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्तीबाबत हिरकणी प्रतिष्ठान कार्यरत आहे.

समाजात अाजही अनेक महिला उपेक्षित, दुर्बल जीणं जगतात. बेरोजगारी, अंधश्रद्धा, व्यसनामुळे कुटुंबे उद्‍ध्वस्त झाल्याने अालेले अाबाळपण, अशा अनेक दुर्लक्षित घटकांना सन्मान पोचविण्याचे काम चिखली येथील हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान करीत अाहे. ॲड. वृषाली राहुल बोंद्रे यांच्या पुढाकारातून सुरू झालेले हे प्रतिष्ठान बुलडाणा जिल्ह्यात नावलौकिकास तर अालेच, शिवाय त्यांच्या कार्याला सर्वच स्तरातून पाठबळ देण्यासाठी अनेक जण पुढे येत अाहेत. अाजही ५० टक्के महिला चूल अाणि मूल या परिघातून बाहेर पडण्यासाठी धडपडत अाहेत. अनेकींना ते साध्य झाले. पण समाजात असंख्य महिलांचा वावर याच परिघात असतो. अशा महिलांना एक व्यासपीठ देण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षाच्या अनुषंगाने काम करण्यासाठी २०१२ मध्ये हिरकणी महिला प्रतिष्ठानची सुरवात झाली. ‘हिरकणी’ या नावाला धैर्याचा, धाडसाचा इतिहास अाहे. अशा धाडसी महिलेचे नाव प्रतिष्ठानसाठी निवडण्यात अाले. जनजागृतीसाठी कार्य हिरकणी प्रतिष्ठानमध्ये उच्चशिक्षित तसेच सामान्य महिलासुद्धा काम करतात. प्रतिष्ठानच्या पुढाकाराने महिलादिन, दारूमुक्तीसाठी आंदोलने, महिलांच्या अारोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे घेतले जातात. दारूमुक्तीचे काम जिल्हाभर केले जाते. व्यसनाधीन असलेल्यांचेही प्रबोधन करून त्यांना या चक्रातून बाहेर काढण्यासाठी काम संस्था अाहे. व्यसनाधिनतेकडे तरुणाईचा अोढा वाढत अाहे. अशा पिढीला व्यसनांपासून दूर नेण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानद्वारे दारूपासून परावृत्त करण्यासाठी विविध गावांमध्ये पथनाट्यांचे अायोजन करण्यात येते. कायदेविषयक जागरूकता ॲड. वृषाली बोंद्रे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात काम करीत असताना अनेक महिलांना कायदेविषयक अडचणी येतात. वारंवार ही बाब जाणवत होती. त्यामुळेच मी लग्नानंतर सुमारे १५ वर्षांनी कायद्याचे शिक्षण घेतले. परिसरातील महिलांवरील अत्याचार असेल किंवा इतर बाबी असतील, अशा वेळी त्यांना मार्गदर्शन केले जाते. सोबत तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन करण्यात येते. समाजात अनेकदा तरुणींची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस येतात. याला पायबंद घालण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हिरकणीच्या माध्यमातून घेतले जातात. हिरकणी कपडा बँक समाजातील वंचित व गरजूंना कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने चिखलीमध्ये हिरकणी कपडा बँक हा अभिनव उपक्रम राबविला जातो. ज्यांना जुने कपडे दान करायचे असतील अशांसाठी ही कपडा बँक मध्यस्थाचे काम करते. कपडे देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे हिरकणी बँकेचा कर्मचारी जाऊन कपडे गोळा करतो, त्याचबरोबरीने दान देणाऱ्या व्यक्तीला या कार्यासाठी सन्मानपत्र देतो. गोळा झालेले कपडे गरजूंच्या वस्तीत जाऊन वाटप केले जातात. हे कपडे ज्यांना दिले जातात त्यांनीही अापल्या भागासाठी लोकसहभागातून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. याचा उद्देश हाच की मोफत कपडे मिळाल्याची भावना घेणाऱ्यात राहत नाही, असे वृषाली बोंद्रे सांगतात. तीन वर्षांपूर्वी अामदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या अागळ्यावेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी चिखली भागात प्रतिष्ठान टेक्टाईल पार्क उभारण्याचा प्रयत्न करत आहे. कपडा बँकेत येणारे सर्वच कपडे जात नाहीत. शिल्लक राहलेल्या कपड्यांचा पुनर्वापर करून त्यापासून पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना दिले जाणार अाहे. यातून रोजगार निर्मिती होईल, शिवाय शिल्लक असलेल्या कपड्यांचा योग्य वापर होणार आहे.       महिला पतसंस्थेची स्थापना महिलांमध्ये अार्थिक जागरूकता यावी, त्यांना व्यवहार ज्ञान मिळावे तसेच महिला बचत गटांना मदत करता यावी यासाठी २०१३ मध्ये हिरकणी महिला पतसंस्था सुरू झाली. सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी, अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी या पतसंस्थेचे उद्‍घाटन केले. महिलांना पतसंस्थेचे व्यवहास सोपे होण्याच्या उद्देशाने वर्षभरापासून मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली अाहे. या सेवेमुळे घरबसल्या पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार पाहता येतात. तसेच देशभरातील कोणत्याही बॅंकेत पैसे पाठविण्याची सोय आहे.

महिला बचत गटांना केले बळकट

चिखली गाव परिसरात महिलांचे जे बचत गट काम करतात त्यांना कर्ज मिळवून देणे, रोजगाराच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्याचे काम ‘हिरकणी’मार्फत केले जाते. अनेक गटांना नेमका काय रोजगार केला पाहिजे याची माहिती नसते, अशा वेळी तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन मिळवून दिले जाते. महिला गटांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिला असतात. त्या शेतीसोबतच छोट्या-छोट्या उद्योगाकडे वळाल्या तर कुटुंबाला अाधार मिळू शकतो. शासकीय योजनांची सविस्तर माहिती बचत गटांना दिली जाते. प्रतिष्ठानने महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी सुरुवातीपासूनच सकारात्मक पुढाकार घेतला. या काळात स्थापन झालेल्या दहा महिला बचत गटांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करतानाच प्रत्येक गटाला एक लाख रुपये भांडवल पतसंस्थेच्या माध्यमातून देण्यात अाले. या निधीतून बचत गटांनी कपडे शिवण्याचे यंत्र, शेळी-मेंढी पालन, गांडूळखत निर्मिती, पापड, शेवया निर्मिती यंत्र, कापडी पिशवी निर्मिती असे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. यातून गटांची आर्थिक उलाढाल वाढली आहे. शेतीत राबणाऱ्या, शहरी भागात रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या महिलांना अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या उद्योगातून पाठबळ मिळाले तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात, हेही यानिमित्ताने दिसून अाले. येत्या काळात महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यावर प्रतिष्ठान काम करणार अाहे. पूरक उद्योगातून महिलांना अात्मविश्वासही मिळेल सोबत या महिलांना व्यवहार ज्ञान मिळून देण्यासाठी, त्यांच्यात व्यवसायाच्या अंगाने कुशलता अाणण्यासाठी अामचा प्रयत्न राहील, असे ॲड. वृषाली बोंद्रे म्हणाल्या.

हिरकणीचे उपक्रम

  •  चिखली पंचायत समितीमध्ये वॉटर एटीएम सुविधा.
  •  तीन अनाथ मुलींना दत्तक घेत त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी.
  •  दहा गरजू अनाथ मुलींना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती.
  •  विधवा महिलांना पाठबळ देण्यासाठी काम. पूरक उद्योगाचे प्रशिक्षण.
  •  महिलांसाठी अारोग्य शिबिरांचे अायोजन.
  •  योग शिबिर, हाडांची ठिसूळता तपासणी, हिमोग्लोबीनची चाचणी, रक्तगट तपासणी.
  •   जागतिक कुटुंब दिनानिमित्त एकत्र कुटुंबातील सदस्यांचा सत्कार, मातृदिन उपक्रम.
  • - ॲड. वृषाली बोंद्रे, ९४२२१८२४९३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com