'कोरडवाहू'साठी शाश्‍वत पीक मिळविण्याचे तंत्र
'कोरडवाहू'साठी शाश्‍वत पीक मिळविण्याचे तंत्र

'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक मिळण्याचे तंत्र

माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-२५ वर्षांपासून शाश्‍वत पीक उत्पादनासाठी प्रयोग करत आहे. त्यामुळे तुमच्याकडे पाणी आहे, म्हणून तुम्हाला शक्य आहे, असे म्हणणारे शेतकरी भेटतात. मग आपल्या प्रयोगांचा कोरडवाहू शेतीसाठी कसा फायदा होऊ शकेल, हाही माझ्या अभ्यासाचा विषय होऊन गेला आहे. गेल्या ४-५ वर्षांत कोरडवाहू क्षेत्रात फिरण्याची व अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यातून कोरडवाहू शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या लक्षात आल्या. राज्यामध्ये बागायतीची सोय १८ टक्के जमिनीला तर ८२ टक्के पिकाऊ जमीन कोरडवाहू आहे. पाटबंधाऱ्याच्या सोयी आणि सुधारणा केल्या तरी राज्यातील मोठे क्षेत्र कोरडवाहू राहणार, ही वस्तुस्थिती आहे. अशा क्षेत्रामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे शेती व पिकाचे हमखास उत्पादन मिळण्याची खात्री राहत नाही. बऱ्याच वेळा अगदी हातातोंडाशी आलेले पीक पाऊस गेल्यामुळे वाळून जाते. दर ४-५ वर्षांत एकदा तरी दुष्काळी स्थिती उद्भवते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटून जाते. कोरडवाहू शेतीच्या समस्या ः

  • १. कोरडवाहू क्षेत्रात जमीन धारणा मोठी असते. पूर्वी बैलाने मशागत केली जात असे. त्या वेळी घरटी ५०-१०० जनावरे होती. आता बैलांचे काम ट्रॅक्‍टरसारख्या यंत्राने होऊ लागल्याने बैलांचे महत्त्व कमी झाले. पर्यायाने गो संवर्धनही कमी झाले. आता घरच्या दुधाच्या गरजेइतक्याच जनावरांचा सांभाळ केला जातो. वैरण विकून त्यातून पैसा उभे करण्याला महत्त्व आले. परिणामी जमिनीला शेणखत, कंपोस्‍ट, सेंद्रिय खतपुरवठा कमी झाला. जमिनीची सुपीकता धोक्‍यात आली आहे.
  • २. कोरडवाहू क्षेत्रात पाऊस अपुरा पडतो. पावसाळ्यातील दोन पावसात बऱ्याच वेळा मोठे अंतर पडते. या काळात पिके वाळतात, वाढ खुंटते. परत पाऊस पडल्यानंतर पीक वाढू लागेपर्यंत जमिनीतील ओलावा संपुष्टात येतो. अनेक वेळा दाणे भरण्याच्या अवस्थेत पाऊस गायब होतो. १-२ संरक्षित पाण्याअभावी पीक हातचे जाते.
  • ३. या क्षेत्रात पाऊस पडण्याचे दिवस कमी असतात. बऱ्याच वेळा थोड्या कालावधीत जास्त पाऊस पडून जातो. अशावेळी पूर्व अगर आंतरमशागतीने पोकळ झालेली मातीची धूप होऊन वाहून जाते. यातून सुपीकतेची हानी होते. याची शेतकऱ्यांना कल्पना असली तरी पर्याय माहीत नसल्याने शेतकरी हतबलतेने मशागत करतो.
  • ४. या क्षेत्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. कापसावर कापूस घेतला जातो. जमिनीत पिकांची फेरपालट होत नाही. रोग किडींचे प्रमाण वाढते.
  • ५. कापूस व तूर ही लांब तरावरील पिके तर या पिकात मूग, उडीद, सोयाबीनसारखी मिश्र पिके घेण्याची प्रथा आहे. काही भारी जमिनी असणाऱ्या क्षेत्रात रब्बी हंगामात गहू, करडई, हरबरा अशी पिके घेतली जातात. यासाठी १०० टक्के जमिनीची पूर्व मशागत, डवरणी अगर कोळपणी व भांगलणी अशी कामे केली जातात. यात बचत करणे शक्य असूनही विचार होत नाही.
  • ६. दर ४-५ वर्षांत एखादे साल दुष्काळाचे येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कायम कमकुवत राहते.
  • वरील सर्व समस्या सोडवून या शेतकऱ्याला एक तरी शाश्‍वत पीक मिळण्याचे तंत्र आवश्यक आहे. यासोबत उत्पादन खर्च कमी करणे व जमिनीची सुपीकता वर्षानुवर्षे वाढत नेणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या तंत्राने विचार केल्यास खर्चामध्ये मोठी बचत शक्य आहे. त्यात प्रथम पूर्व मशागतीवरील खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल पाहू.

    कोरडवाहू भागामध्ये प्रामुख्याने कपाशी व तूर ही पिके घेतली जातात. ही लांब अंतरावरील दीर्घकालीन पिके असून, त्यात आंतरपिके घेतली जातात. या कमी कालावधीच्या पिकातून शेतकऱ्याला मध्यम मुदतीने उत्पादन मिळते. ही शेतकऱ्यांची आत्यंतिक गरज असते. मात्र, त्यामुळे संपूर्ण क्षेत्राची मशागत करावी लागते. हे टाळण्यासाठी लांब अंतरावरील कपाशी, तूर यांसारख्या पिकांमध्ये मिश्र पिके घेऊ नयेत. मूग, उडीद, सोयाबीन यांसारखी कमी कालावधीची पिके वेगळ्या शेतामध्ये सलग पद्धतीने घ्यावीत.

    याचे फायदे काय होतील? १. अल्पमुदतीच्या पिकातील अंतर कमी असल्याने त्याची पेरणी यंत्राने केली जाते. हे पेरणी यंत्र चालण्यापुरती हलकी नांगरणी व वखराची पाळी इतकीच पूर्व मशागत करावी. लांब अंतरावरील पिकाच्या क्षेत्रात कोणतीही पूर्व मशागत करू नये. पेरणी पूर्वी पिकाचे ओळीतील अंतर ठरवून तितक्‍या अंतरावर बैल अगर ट्रॅक्‍टरने काकर पाडून टोकण पद्धतीने करावी. २. आपल्याकडे बी महाग असल्यामुले कापूस टोकण (डोबणे) पद्धतीनेच पेरला जात असला तरी स्वस्त किंवा घरच्या बिया असल्याने तूर मात्र यंत्राद्वारे पेरली जाते. मिश्रपिकांचीही पेरणी यंत्राने पेरता सरता लावून पेरले जाते. इथे गरजेपेक्षा खूप जास्त बी पडते. इतर कामाच्या व्यापातून त्याची योग्य वेळेत विरळणी करणे शक्‍य होत नाही. दाटीमुळे तुरीची झाडे लहान राहून मर्यादित उत्पादन मिळते. या ऐवजी तूरही टोकण पद्धतीने ६०-७५ से.मी. अंतरावर कापसाप्रमाणेच पेरावी. पाऊस पडताच करावयाचे काम असल्याने या वेळी मजुरांची उपलब्धताही होते. अगोदर काकर मारल्यास फक्त ओळीत योग्य अंतरावर दाणे टाकून हाताने माती झाकता येते. कमी कष्ट व मजुरात टोकणीचे काम संपविता येते. इथे एकूण शेतीतील केवळ मिश्रपिकांपुरतीच (२० ते २५ टक्केच) पूर्व मशागत केल्याने खर्चात ७५ ते ८० टक्के बचत होते. ३. लांब अंतरावरील पिकातील ओळीतील अंतर ः तूर अगर कापसाच्या दोन ओळीतील अंतर १५० ते १८० से.मी. ठेवावे. प्रचलित पद्धतीत हे अंतर ९० ते १२० से.मी. असते. अंतर वाढविण्याचे कारण आपण पिकाचे दोन ओळीत तणांचा पट्टा वाढविणार आहोत. अंतर वाढविल्याने टोकणीसाठी लागणाऱ्या मनुष्य बळात बचत होते. बियाणे खर्चही कमी होतो. अंतर जास्त असल्याने प्रत्येक झाडाला वाढण्यासाठी भरपूर वाव मिळतो. उत्पादनामध्ये वाढ होते.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com