बंधाऱ्यांची परिस्थिती अन् परिणाम

दुर्लक्षित झालेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा. यामुळे परिसरातील जलसंधारणावर प्रतिकूल परिणाम होतो.
दुर्लक्षित झालेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा. यामुळे परिसरातील जलसंधारणावर प्रतिकूल परिणाम होतो.

सध्या जलसंधारण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे आणि शेततळी येतात. आजच्या लेखात आपण या जलसंधारण उपायाच्या मागे असलेला विचार आणि त्याच्या सध्या दिसणाऱ्या परिणामाची स्थिती काय आहे, ते पाहणार आहोत.

आपल्याकडे धोरण ठरवताना किंवा कदाचित प्रशासकीय सोयीसाठी असेल, सर्व राज्यासाठी साधारण सारखेच किंवा एकाच प्रकारचे उपाय सुचवले आणि केले गेले. भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, एकूण भूगर्भ रचना इत्यादी बाबींकडे दुर्लक्ष झाले. कारण या जलसंधारण उपायांची सध्याची अवस्था पाहिली तर वर उल्लेखलेल्या बाबींचा गंभीर विचार आणि अभ्यास करून निर्णय झाले आहेत असे बहुतांश ठिकाणी झालेले काम बघून वाटत नाही.

सिमेंट बंधारा

  • मोठे नाले, ओढे, उपनद्या आणि नद्या अशा जलस्रोतांचा उपयोग जलसंधारणासाठी करताना त्या प्रवाहातील पाणी अडवणे, साठवणे आणि काही प्रमाणात जिरवण्यासाठी पाण्याला वेळ देणे, या गोष्टींसाठी योग्य जागा निवडून सिमेंट बंधारा बांधला जातो.
  • सिमेंट बंधाऱ्यांचा वापर पाण्याचा वेग कमी करणे, पाणी आजूबाजूच्या जमिनीत मुरून भूजल पातळी वाढवण्यासाठी मदत करणे, आणि पाण्याचा साठा करून त्याचा वापर पावसाळा संपल्यानंतर करण्याची सोय अशा गोष्टींसाठी करणे हा हेतू असतो. पण, यात एक गडबड होते.
  •  आपण मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक परिस्थिती यांचा विचार न करता, सरसकट सगळीकडे सारखेच निकष लावून बंधारे बांधले जातात. त्यामुळे जिथे ३००० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे आणि जिथे ४० मिमी पाऊस पडतो तिथेही सारखेच निकष असतात. त्यामुळे हा उपाय यशस्वी होताना दिसत नाही.
  •  ज्या ठिकाणी पाऊस कमी किंवा मध्यम स्वरूपाचा आहे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे, तिथे सिमेंट बंधारे काही प्रमाणात यशस्वी होताना दिसतात, कारण अशा ठिकाणी माती पाण्याबरोबर वाहून येऊन बंधाऱ्यात साठत नाही. पण जिथे पाऊस भरपूर आहे, पाण्याचा प्रवाह वेगवान आहे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मर्यादित आहे, अशा ठिकाणी हा उपाय जवळजवळ पूर्णत: अपयशी झाल्याचे किंवा होत असल्याचे सहज बघायला मिळेल. अशा ठिकाणी हे बहुतांश बंधारे वाहून आलेल्या गाळाने भरले आहेत. त्यामुळे पाणी साठवण्यात अपयशी ठरल्याचे दिसते.
  •   बेसुमार जंगलतोड, अनियंत्रित विकास, भौगोलिक परिस्थिती, जमिनीचे चढउतार इत्यादी गोष्टींमुळे हे गाळाचे प्रमाण सतत वाढत जात आहे. जोपर्यंत ही गाळ वाहून आणणारी आणि साठू देणारी कारणे आपण दूर करत नाही, त्यावर उपाय करत नाही, तोपर्यंत हे बंधारे अयशस्वी झालेले दिसतील.
  • कोल्हापूर पद्धतीचा बंधारा

  •  कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हे कमी आणि मध्यम प्रमाणात पाऊस असेल आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असेल तर उपयोगी पडतात. बंधाऱ्यामध्ये लावायच्या प्लेट्स जर वेळेत आणि व्यवस्थित लावल्या गेल्या नाहीत, किंवा चोरी किंवा आळस इत्यादी कारणांनी लावल्याच गेल्या नाहीत, तर पाणी साठत नाही आणि यांचा मूळ उद्देश बाजूलाच पडतो. पावसाळ्यात पाणी येते आणि निघून जाते.
  •  जर हे बंधारे जास्त पावसाच्या प्रदेशात बांधले तर ते गाळाने भरून जातात, किंवा पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे प्लेट्स हलून खराब होतात. पाण्याची गळती सुरू राहते. जेव्हा गरज असते तेव्हा उन्हाळ्यात यात पाणी शिल्लक राहत नाही. या सर्व कामांमध्ये स्थानिक लोकांना सहभागी करून घेतले जात नसल्याने काम चालू असताना आणि नंतरही त्या कामांकडे लोकांचे लक्ष राहत नाही. याचा थेट परिणाम त्याच्या यशावर होतो.
  • शेततळे

  • प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतात हक्काचा पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने शेततळे योजना झाली असावी. जेव्हा ही शेततळी मागेल त्याला मंजूर होतात तेव्हा यात प्रश्न निर्माण होतो?
  •     शेततळे म्हणजे जल व्यवस्थापनाचे अतिसुलभीकरण झाले आहे. महाराष्ट्राचे भौगोलिक घटक आणि पर्जन्यमान यावरून नऊ भाग पडतात, हे आपण मागच्या लेखात पाहिले आहेत. आता सर्व ठिकाणी शेततळ्यांसाठी सारखेच निकष ठेवून चालेल का? याचा विचार करायची गरज आहे.
  •     सर्वात लहान शेततळ्याचा आकार १५ x १५ x ३ मी. असावा हे मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रात एकवेळ बहुतांश ठिकाणी चालू शकेल, पण जेव्हा हेच निकष कोकणातल्या पाच जिल्ह्यांमध्ये लावले जातात, तेव्हा गडबड होते. कोकणात एवढी खोली बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. मग तो शेतकरी जमेल तेवढा खाली जातो, साधारण दोन-अडीच मीटर, आणि आकारमान निकषात बसावे म्हणून चांगली माती काढून जमिनीच्या वर लावतो. त्या जमिनीवरच्या भागात पाणी कधी साठणार नसतं किंवा मग त्याला अस्तर लावून त्यात बाहेरून पाणी भरले जाते. यात दोन गोष्टी होतात, एक म्हणजे, पाण्याच्या साठ्याचे खासगीकरण होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा पाणी विहीर किंवा बोरवेलमधून उपसून हे तळे भरले जाते तेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. या दोन्ही गोष्टींमुळे त्या शेतकऱ्याचे तर नुकसान होतेच, पण त्या भागातील भूजालावरही याचा दुष्परिणाम होतो. यामुळे, एक चांगला ठरू शकणारा उपाय अपायकारक उपाय ठरतो.
  •     जिथे खेकडे असतात, तिथे तर अस्तरसुद्धा खराब होऊन पाण्याचा निचरा होण्याची भीती असते. त्यामुळे, जोपर्यंत हे निकष स्थलानुरूप ठरवले जात नाहीत आणि शेततळी केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली जातात, तोपर्यंत हा उपाय उपयोगी पडणे अवघड आहे.
  • - डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०

    ( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com