शास्त्रीय पद्धतीनेच व्हावेत जल संधारणाचे उपाय

नदी, नाला खोलीकरण करताना संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्याची गरज आहे.
नदी, नाला खोलीकरण करताना संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

गावातील पाण्याचे स्रोत ज्या भागात आहेत, त्या प्रवाहाच्या वरच्या भागात योग्य जागा बघून पाझर तलाव केला तर नक्की फायदा होतो. समतल चर आपण कुठे घेतो, तिथे पाऊस कसा आणि किती आहे, माती कशी आहे, इत्यादी गोष्टींचा विचार करावा. याचबरोबरीने नदी खोलीकरण, वनराई बंधाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.

पाझर तलाव

  • जलसंधारणासाठी हा उपाय सध्या सगळ्यात यशस्वी आहे. पाझर तलावाचा उद्देश वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून, ते काही काळ थांबेल आणि मग आजूबाजूच्या जमिनीत मुरेल एवढा वेळ त्याला देणे हा आहे.
  • गावातील पाण्याचे स्रोत ज्या भागात आहेत, त्या प्रवाहाच्या वरच्या भागात योग्य जागा बघून पाझर तलाव केला तर नक्की फायदा होतो. पण बऱ्याचदा त्या त्या वर्षाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी किंवा स्थानिक लोक किंवा नेते यांच्या मागणीवरून चुकीच्या ठिकाणीही पाझर तलाव केले जातात. अशा तलावांच्या अगदी जवळही सुमारे ४० फूट खोलीपर्यंत पाणी मिळत नाही अशी तक्रार अनेक ठिकाणी लोक करत आहेत. याचा अर्थ असा की अभ्यास न करता पाझर तलाव केला की नुकसान होते.
  •    वनराई बंधारे

  • पावसाळा संपल्यानंतर प्लॅस्टिकच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती (क्वचित रेती) भरून, ती पोती पाण्याच्या स्रोतामध्ये (ओढा, नाला, नदी इत्यादी) रचून किमान दोन महिने पाणी थांबवून, ते वापरासाठी उपलब्ध राहावे यासाठी वनराई बंधारा बांधला जातो.
  • या बंधाऱ्यामुळे जरी पाणी पूर्ण अडवले जात नसले तरी कमी खर्चात, कमी वेळात, स्थानिक साहित्य वापरून केला जाणारा आणि यशस्वी ठरलेला उपाय म्हणून हा बंधारा लोकप्रिय आहे.
  • अनेकदा एखादा उपाय करताना सर्वंकष विचार झाला नाही तर किंवा तो विचार पूर्णपणे लोकांपर्यंत पोचला नाही तर अजाणतेपणी काही चुका होऊन शेवटी दूरगामी नुकसान होण्याची भीती असते.
  • जलसंधारण करताना पाण्यावर लक्ष केंद्रित झाल्यामुळे असेल किंवा बाकीचा विचार न झाल्यामुळे असेल, पण आपण मातीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या वनराई बंधाऱ्यांसाठी जी माती वापरली जाते, ती किती लोक पुढच्या पावसाळ्याआधी नीट काढून ठेवतात? हा मोठा प्रश्न आहे. माझ्या बघण्यात तरी ही सगळी माती त्या प्लॅस्टिकच्या पोत्यांसकट पाण्याबरोबर वाहून जाते. दरवर्षी आपण ही माती कायमस्वरूपी गमावतो. आधीच माती कमी आहे, आपण ती गमावत आहोत, नवीन माती तयार व्हायला काही दशकं लागतात, हे लक्षात घ्यावे.
  • जेवढा मातीचा थर जास्त, तेवढा पाण्याचा साठा होण्यासाठी जास्त जागा. कारण पाणी हे मातीच्या थरांमध्ये साठू शकते, दगडामध्ये नाही. आपण चांगल्या हेतूसाठी काम करताना, केवळ आळस किंवा अनभिज्ञता यामुळे आपलंच कायमस्वरूपी नुकसान करून घेत नाही ना, याचा गंभीर विचार करायची आवश्यकता आहे.  
  • याव्यतिरिक्त वळण बंधारे, नालाबांध इत्यादी गोष्टी करून पाणलोट क्षेत्र विकास केला जातो. काम करताना स्थलानुरूप विचार केला गेला आहे असं दिसत नाही. त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने आणि विकासापेक्षा नुकसान अधिक दिसते. हे जलसंधारणाचे उपाय सर्वंकष विचार न करता केले जात आहेत, असे म्हणायला वाव आहे.
  • नदी, नाला खोलीकरण   

  • पावसाचे पाणी जेव्हा माती संपृक्त झाल्यामुळे किंवा खाली कठीण दगड असल्यामुळे जमिनीत न मुरता, पृष्ठभागावरून उताराच्या दिशेने वहायला लागते तेव्हा ओढा, नाला, नदी यांची निर्मिती होते. हे पाणी वाहते असेल आणि माणसाने प्रदूषित केले नसेल तर पिण्यायोग्य असते.
  • नदी ही एक परिसंस्था आहे. ते काही निसर्गाने माणसाला पाणी वाहून नेण्यासाठी आणि सांडपाणी सोडून देण्यासाठी दिलेले साधन नाही. माणूस सोडून इतरही प्राणी आणि वनस्पती यांना पाणी मिळण्याचा नदी हा एक स्रोत आहे.
  • सध्या आपण आपली गरज किंवा हाव प्रचंड वाढल्यामुळे जास्तीत जास्त पाणी अडवण्यासाठी नदी खोलीकरण करण्याच्या प्रयत्नात त्या नदीचा नैसर्गिक उतार संपवून, बदलून तिथे मोठी टाकी किंवा डोह तयार करतोय का? (अंदाजे २ ते १० किमी लांब आणि २५ ते ३० फूट खोल), याचा विचार या संदर्भात काम करणाऱ्यांनी करावा.
  • आपण फक्त माणसाची गरज बघून पाणी साठवण्याचा विचार करतोय, निसर्गाच्या संतुलनाचा  विचार करत नाही, ही आजची परिस्थिती आहे. आज पाणी साठवून ठेवताना नदीचा नैसर्गिक उतार संपतोय, प्रवाहावर त्याचा परिणाम होणार आहे.
  • नदी वाहती राहिली नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. त्याचबरोबर आपल्याकडे बहुतेक सर्व गावांमध्ये सांडपाणी नदीत सोडले जाते. आता हे सांडपाणी प्रवाहाबरोबर निघून जाते. तिथे खोलीकरण करून पाणी साठवले तर सर्व साठा प्रदूषित होण्याची भीती आहे. यावर ठोस उपाय होत नाही, तोपर्यंत हा धोका कायमच आहे. यामुळे साठवलेले पाणी आणि भूगर्भातील पाणी प्रदूषित होणार आहे.
  • समतल चर

  • जेव्हा मध्यम किंवा तीव्र उतार असतो तेव्हा पाणी वेगाने खाली वाहून जाते. त्यातच जर अनिर्बंध जंगलतोड होऊन तो भाग उजाड झाला असेल तर पाणी खाली जाताना बरोबर माती घेऊन जाते. यामुळे त्या भागातील मातीची धूप होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी उतारावर समतल चर खोदले जातात.
  • वाहून येणारे पाणी समतल चरांमध्ये काही काळ थांबते, काही प्रमाणात जमिनीत मुरते. त्याचा वेग कमी होतो. यामुळे जमिनीची धूप होत नाही. पण, समतल चर आपण कुठे घेतोय, तिथे पाऊस कसा आणि किती आहे, माती कशी आहे इत्यादी गोष्टींचा विचार करूनच चराचे आकारमान निश्चित करण्याची गरज असते. अन्यथा, नुकसान होते.
  • जिथे पाऊस कमी किंवा मध्यम स्वरूपाचा आहे, अशा ठिकाणी उतार असलेल्या ठिकाणी समतल चर उपयोगी पडतात.
  • गेली काही वर्षे सह्याद्री रांगेच्या पूर्व आणि पश्चिमेलाही समतल चर घेतले जात आहेत. या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, उतार तीव्र असतात, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मर्यादित आहे. अशा ठिकाणी सध्याचे समतल चर कमी पडतात. एका पावसात भरून वाहायला सुरुवात होते. त्यामुळे मूळ हेतू असफल होतो. अशा ठिकाणी या चरांचा आकार मोठा करण्याची गरज आहे, ते चर फुटून, वाहून जाऊ नयेत यासाठी योग्य काम करायची गरज आहे.
  • पावसाचे प्रमाण, भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून समतल चराचे उपाय करणे शहाणपणाचे ठरणार आहे.
  • -  डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०,

    (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com