ताडपत्रीपासून सुलभ तंत्राचा पिवळा चिकट सापळा

ताडपत्रीपासून सुलभ तंत्राचा पिवळा चिकट सापळा
ताडपत्रीपासून सुलभ तंत्राचा पिवळा चिकट सापळा

काही तंत्रज्ञान अत्यंत सोपे, सुलभ व कमी खर्चाचे असते. कपिलेश्वर (ता. जि. अकोला) येथील संदीप सूर्यवंशी यांनी पिवळ्या रंगाच्या व ग्रीस लावलेल्या ताडपत्रीचा वापर चिकट सापळे म्हणून कपाशीच्या शेतात केला. त्यांच्या कीडनाशक फवारण्यांच्या संख्येत त्यामुळे चांगलीच घट येऊन त्यावरील खर्चही कमी झाल्याने त्यांना काही प्रमाणात समाधान मिळाले आहे. अलीकडील काळात पीक संरक्षणावरील खर्च कसा कमी करता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्या काही वर्षांत प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी विविध पिकांवर येत असलेल्या विविध किडींमुळे त्रस्त झाला आहे. किडींचे नियंत्रण व्यवस्थापन करताना होणारा अतोनात खर्च हा उत्पन्नाच्या तुलनेत भरमसाट वाढल्याने शेतकरी एक तर पीकबदलाचा विचार करीत आहे. किंवा काही वेगळे प्रयोग करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण शेतकऱ्याची क्लृप्ती अकोला जिल्ह्यातील कपिलेश्‍वर (ता. अकोला) येथील संदीप शिवपालसिंग सूर्यवंशी हा तरुण शेतकरी आपल्या कापूस पिकात प्रभावी पीक संरक्षण करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कपिलेश्‍वर हा भाग खारपाणपट्ट्यात असून कोरडवाहू आहे. बीटी कॉटन तंत्रज्ञानाच्या वापराने अलीकडील वर्षांत रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. संदीप यांचाही असाच अनुभव आहे. दरवर्षी कपाशीवर हंगामात मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी, बोंड अळी आढळते. ते म्हणतात की साधारण एक हेक्टर क्षेत्रासाठी फवारणीचा खर्च किमान चार हजार रुपये असतो. अशा दोनपासून चारपर्यंत फवारण्या तरी कराव्या लागतात. दरवर्षी सुमारे साडेआठ एकर क्षेत्रात कपाशी असते. त्यामुळे हा खर्च वाढतो. रसशोषक किडींचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने संदीप यांनी अत्यंत साधे सोपे सुलभ तंत्र वापरले आहे. असे आहे सुलभ तंत्र गेल्या वर्षी संदीप यांना कृषी खात्याच्या व आत्माच्या अधिकाऱ्यांनी पिकात स्टिकी ट्रॅप, अर्थात पिवळे चिकट सापळे किंवा तसे कापड वापरण्याचा सल्ला दिला. त्याचा फायदा झाला. रसशोषक किडी या कापडावर चिकटले. तशी फवारण्यांची संख्या कमी झाली होती. शिवाय ज्या एक किंवा दोनच फवारण्या काढाव्या लागल्या त्याही फार महागड्या कीटकनाशकाच्या नव्हत्या. त्यामुळे खर्च कमी झाला. साडेपाच एकरांत मागील वर्षी कोरडवाहू कपाशीमध्ये ९० क्विंटल कापूस झाला. मागील वर्षी केलेला प्रयोग यंदाही अंमलात आणला. हे सोपे तंत्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ताडपत्रीचे कापड आहे. त्याला पिवळा रंग दिला आहे. त्याला आॅइल किंवा ग्रीस लावले आहे. अवघ्या १२० रुपयांत ते आणले आहे. यासाठी अन्य दुसरा कुठलाही खर्च होत नसल्याचे संदीप सांगतात. असा आहे सापळ्याचा वापर साधारण १२ फूट लांब व पाच फूट रुंद असा हा पिवळा ताडपत्रीचा पट्टा आहे. कपाशी पिकात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तो फिरवला जातो. एकावेळी साधारण चार अोळी तो कव्हर करतो. पिवळा रंग व ग्रीस त्याला असल्याने पांढरी माशी, मावा आदी किडी त्याकडे आकर्षित होतात व त्यावर चिकटून बसतात. यंदा पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये बीटी कपाशीची लागवड केली. त्यात अशा प्रकारच्या प्रयोगामुळे यंदा तर केवळ एकच फवारणी करावी लागली असे संदीप म्हणाले. जी काही फवारणी घेतली आहे तीसुद्धा केवळ निंबोळी अर्काची. कपाशीची वाढही समाधानकारक राहिली. प्रत्येक झाडावर बोंडांची संख्या चांगली होती. फवारण्या कमी झाल्याने शेतात मित्रकीटकांची संख्याही चांगली राहिली. ताडपत्रीचा हा पट्टा शेतातून फिरवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. कापड हातात पकडण्यासाठी केवळ दोघेजण पुरेसे होतात. एकरी साधारण अर्धा ते पाऊणतास यासाठी पुरेसा होतो. खर्च कमी झाला सिंचनाची सोय नसल्याने आमच्या भागात कोरडवाहू कपाशी पेरली जाते. दरवर्षी साधारण १६ क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळते. यंदाही त्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. माझा प्रयोग पाहून अन्य दोन तीन शेतकऱ्यांनीही त्याचा वापर केला. त्याचा चांगला फायदा दिसून आल्याचे संदीप म्हणाले. यंदा किडींचा प्रादुर्भाव तसा कमी होता. पण तरीही किमान तीन ते चार फवारण्या व त्यावरील खर्च वाचवणे शक्य झाले. या तुलनेत अन्य शेतकऱ्यांना पाच ते सहा फवारण्या कराव्या लागल्याचे संदीप म्हणाले. संपर्क ः संदीप सूर्यवंशी- ९४०४३७४७१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com