agricultural stories in Marathi, TECHNOWON, layering of mulching paper | Agrowon

पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग पेपरचा वापर
वैभव सूर्यवंशी
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. आच्छादनामुळे तापमान, अतिआर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे पीकवाढीला फायदा होतो. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून दर चांगला मिळतो.   

पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. आच्छादनामुळे तापमान, अतिआर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे पीकवाढीला फायदा होतो. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून दर चांगला मिळतो.   

पिकामध्ये कोणतेही आच्छादन वापरण्यापूर्वी त्या पिकाचा प्रकार, हवामान, हंगाम, भौगोलिक स्थान आणि वातावरण यांचा विचार करावा. भाजीपाला पिकामध्ये पॉलिथिन आच्छादन उपयुक्त दिसून आले आहे. आच्छादनामुळे पाण्याची बचत होते, कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, शेतीमालाची गुणवत्ता सुधारते. आच्छादन करताना पिकाचे आर्थिक गणित समजवून घ्यावे. कारण, या मल्चिंग पेपरचा सुरवातीचा एकरी खर्च पिकानुसार ८ ते १२ हजार रुपये येतो.

 आच्छादन वापराचे फायदे ः

 • पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. त्यामुळे पिकास दिलेली खते  रोपांच्या वाढीसाठी उपलब्ध होतात.
 • पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे कमी पाण्यातसुद्धा उन्हाळ्यात पिकाचे चांगले उत्पादन मिळते. हे आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरुरीचे आहे.
 • पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास ठिबक लॅटरलचे आयुष्यमान वाढते.
 • रासायनिक खते उघड्या जमिनीत दिल्यास त्यातील बराच मोठा अंश वातावरणाशी संपर्क आल्याने जमिनीतून नष्ट होतो. त्यामुळे जमिनीत दिलेल्या खताचे अपेक्षित परिणाम पिकावर दिसत नाहीत. मात्र आच्छादनामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो.
 • उन्हाळ्यामध्ये दिवसा जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते. अनेकदा पिकाच्या मुळ्यांना ते सोसत नाही. हे टाळण्यासाठी पॉलिथिन कागदाचे आच्छादन उपयोगी ठरते. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहतो.
 • हिवाळ्यात जमिनीचे तापमान विशेषतः रात्रीच्या वेळी खूप खाली जाते, त्यामुळे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही. त्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा फळांचा आकार बिघडतो. पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.
 • आच्छादनामुळे तापमान, अति आर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे पीकवाढीला फायदा होतो. आच्छादन वापरल्याने फळांचा मातीशी संपर्क न आल्याने फळांची प्रत सुधारते. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून दर चांगला मिळतो.
 • पिकास दिलेली भर, उंच गादीवाफ्यांचा अवलंब आणि त्यासोबत ठिबक सिंचनाची व्यवस्था यामुळे शोषक मुळ्यांच्या परिसरातील जास्त झालेले पाणी शेतातून बाहेर काढण्यास सुलभ होते. परिणामी रोग नियंत्रित राहतात.
 • काही किडींचे अवशेष गळून पडलेल्या फळांवाटे व पानांवाटे जमिनीत जातात. तेथे काही काळ सुप्त अवस्थेत राहून पुन्हा पिकावर प्रादुर्भाव करतात. पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास किडींच्या जमिनीतील वाढीस अडथळा होतो.
 • पॉलिथिन आच्छादनामुळे माती मोकळी, भुसभुशीत राहते, त्यामुळे मुळांभोवती हवेशीरपणा वाढतो; तसेच उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणावर होते.
 • आंतरमशागत करताना पिकाची मुळे बऱ्याचदा तुटतात. पॉलिथिन मल्चिंगमुळे मुळांची वाढ कागदाखालीच होते, त्यामुळे आंतरमशागत करताना मुळे तुटत नाहीत. आच्छादनाचा फायदा उत्पादनवाढीमध्येही दिसून आला आहे.

 मल्चिंग पेपरचा वापर  ः

 • वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक आच्छादन पेपर बाजारात उपलब्ध आहेत.
 • चांगल्या कंपनीचे ‘आयएसआय'' मार्क असलेला चांगला प्लॅस्टिक आच्छादन पेपर घ्यावा.
 • टोमॅटो, मिरचीसाठी एक मीटर रुंदी असणारा चंदेरी रंगाचा प्लॅस्टिक पेपर निवडावा. पेपरची जाडी २५ किंवा ३० मायक्रॉन असावी. पेपर साधारणतः ४०० मीटर लांबीमध्ये उपलब्ध असतात.
 • लागवडी आधी मातीपरीक्षण करावे. म्हणजे लागवडीपूर्वी खताची मात्रा जमिनीत मिसळून देता येते. जमिनीची नांगरट करून माती भुसभुशीत करून घ्यावी. भाजीपाला पिकाच्या निवडीनुसार गादीवाफे आणि दोन ओळींमधील अंतर ठेवावे.

पॉलिथिन आच्छादनाचे प्रकार
बाजारात पारदर्शक प्लॅस्टिक, काळे प्लॅस्टिक, सूर्यकिरण परावर्तित करणारे प्लॅस्टिक (सिल्व्हर पेपर), इन्फ्रा रेड प्रकाशास पारदर्शी प्लॅस्टिक, वेगवेगळ्या रंगांचे प्लॅस्टिक आणि विणलेले सच्छिद्र आच्छादन असे प्रकार उपलब्ध आहेत.

प्रकार 

आकार (मी.)
(लांबी व रुंदी)

 पिके
रेड लेबल  ४०० मी. x १.२ मी.   कलिंगड, खरबूज, काकडी आणि स्ट्रॉबेरी
ऑरेंज लेबल  ४०० मी. x १.२ मी.  पपई व केळी पीक आणि कलिंगड खरबुजाचे दुहेरी पीक
ब्ल्यु लेबल   ४०० मी. x ०.९ मी.  काकडी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची व इतर वेलवर्गीय पिके आणि कपाशी
यलो लेबल ४०० मी. x ०.९ मी.  सर्व वेलवर्गीय पिके
ग्रीन लेबल २००  मी. x १.५ मी.  डाळिंब, संत्री, पेरू आणि इतर फळबागा
व्हाईट लेबल ४०० मी. x १.२ मी.   कलिंगड आणि खरबुजाचे दुहेरी पीक

          
     मल्चिंगसाठी गादीवाफानिर्मिती ः

 • उभी आडवी नांगरट करून माती भुसभुशीत करावी. मोठी ढेकळे फोडून घ्यावीत. अणकुचीदार दगड गोटे किंवा मागील पिकाची धसकटे वेचून बाहेर काढावीत.
 • रोटाव्हेटर किंवा कुळवाच्या मदतीने गादी वाफे तीन ते चार फूट अंतरावर तयार करावे लागतात. जेणेकरून दोन ओळींमधील अंतर पाच फूट राहते. अशा गादीवाफ्यावर एकरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. त्यामध्ये माती परिक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा मिसळावी. त्यानंतर गादीवाफे लागवडीस तयार करावेत. पिकाच्या गरजेनुसार गादीवाफ्याचा आकार ठरवावा.
 • मल्चिंग पेपर गादीवाफ्यावर पसरण्यापूर्वी ठिबकची लॅटरल अगोदर टाकून घ्यावी, त्यानंतर पेपर पसरावा.
 • कागदाच्या दोन्ही बाजू मातीमध्ये गाडून घ्याव्यात. धातूच्या धारदार कडा असणाऱ्या ग्लासचा उपयोग करून त्रिकोणी पद्धतीने दीड फुटावर छिद्रे तयार करावीत. गरज भासल्यास ग्लास विस्तवावर गरम करून छिद्र पाडावे. छिद्राचा व्यास तीन इंचापर्यंत असावा. या छिद्रांमध्ये रोपांची लागवड करावी.
 • आंतरमशागतीची कामे करताना, फळांची काढणी करताना पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यावी.

मल्च लेयिंग यंत्राचा वापर ः

 • मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी ट्रॅक्टरचलित मल्च लेयिंग यंत्राचा वापर करावा.
 • यंत्राच्या वापरामुळे वेळ, मजूर व श्रमात बचत होते. मल्चिंग पेपर चांगल्याप्रकारे अंथरला जातो.
 • यंत्राच्या वापरामुळे बेसल डोस देणे, गादीवाफा तयार करणे (६ ते ८ इंच उंची आणि ३० ते ३४ इंच रुंद), लॅटरल टाकणे, पेपर अंथरून कडेने माती लावणे ही कामे करता येतात.
 •  साधारणपणे दोन तासांत एक एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरता येतो.
 • मजुराच्या साह्याने वरील सर्व कामासाठी साधारणतः ८ ते ९ हजार रुपये प्रती एकर इतका खर्च येतो. तसेच या कामांसाठी दीड ते दोन दिवस लागतात. परंतू या यंत्राचा वापर केल्यास एक ते दीड तासात सर्व कामे एक ड्रायवर  आणि एक मजुराच्या साह्याने पूर्ण होतात.

आच्छादन करण्यासाठी मर्यादा आणि फायदे ः

 • दरवर्षी वापरलेले प्लॅस्टिक आच्छादन शेतातून काढणे आवश्‍यक आहे. कारण ते जमिनीत मिसळत नाही किंवा कुजतही नाही. आच्छादन आणि पीक निघाल्यानंतर ते काढण्याचा खर्च होतो.
 • प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रारंभिक खर्च जास्त आहे. परंतु या आच्छादनामुळे पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढून त्यातून खर्च भरून निघतो.
 • पारदर्शक प्लॅस्टिक आच्छादनातून सूर्यप्रकाश पोचत असल्यामुळे तेथे तणे वाढतात. त्यामुळे मुख्य पिकांसोबत तणांची स्पर्धा होते. काळ्या प्लॅस्टिकमध्ये जरी आच्छादनाखाली तण वाढत नसले, तरी रोपांसाठी आच्छादनाला पाडलेल्या छिद्रातून तणे वाढतात. त्यांचे नियंत्रण आवश्‍यक आहे.

संपर्क ः वैभव सूर्यवंशी ९७३०६९६५५४
(कृषि विज्ञान केंद्र, जळगाव)

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या...हरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग,...
अवजारांच्या वापरांमुळे महिलांचे कष्ट...महिलांचा शेती कामातील वाटा लक्षात घेता,...
बंधाऱ्यांची परिस्थिती अन् परिणामसध्या जलसंधारण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर...
शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल...इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत...
योग्य प्रकारे ट्रॅक्‍टर चालवा, दुर्घटना...शेतमाल वाहतुकीचा मुख्य स्त्रोत ट्रॅक्‍टर आहे....
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...
तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...
फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...
गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...
जमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...