आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक

रोग नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक आहे.
रोग नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक आहे.

लसीकरण हे लहान मुले, बाळांसाठी आणि आजारी लोकांसाठी असते, अशीच बहुतांशी लोकांचा समज असतो. लहानपणी सगळ्या लसी घेऊन झाल्यात, आता परत मोठेपणी लसीकरण कशाला? असा प्रश्नसुद्धा पडू शकतो. लसीकरणासंबंधी समज-गैरसमज दूर करण्यासाठी आपण आज मोठ्यांचे लसीकरण या विषयाची माहिती घेऊ.

मो ठ्या लोकांचे लसीकरण हा आरोग्यसेवेचा एक दुर्लक्षित भाग राहिलेला आहे. वास्तविक पाहता आजारांचे प्रमाण कमी होण्यासाठी लसीकरण हा सर्वात स्वस्त व खात्रीशीर उपाय आहे.

इन्फ्लुएंजा व स्वाइन फ्लू ( H१N१) काही वर्षांपूर्वी जेव्हा स्वाइन फ्लूची साथ नवीन होती, त्या वेळी मोठ्या प्रमाणात त्याची भीती होती.या लसीलासुद्धा प्रचंड मागणी होती. परंतु आता हा आजार आपल्यामध्ये एवढा रुळला आहे, त्याची एवढी सवय झाली आहे की त्याचे गांभीर्य कमी होते आहे असं वाटतं. वास्तविक पाहता ही लस सर्व गरोदर महिला, ६ महिने ते ५ वर्षे वयोगटातील मुले, ६५ वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येकाने घ्यायला हवी. दम्याचे, फुफ्फुसाचे, हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, यकृताचे आजार, मधुमेही यांना ही लस आवश्यक आहे. स्वाइन फ्लू (H१N१)लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी ही लस घेणे गरजेचे आहे. ही लस दरवर्षी घ्यायला लागते. या लसीमुळे स्वाइन फ्लूपासून संरक्षण मिळतेच, पण त्याशिवाय नेहमी होणारी सर्दी, खोकल्यापासूनसुद्धा बचाव केला जातो. इंजेक्शन व नाकाद्वारे घ्यावी लागणारी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. या लसीच्या इंजेक्शनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील कुठले वापरायचे ते आपल्या आजाराप्रमाणे डॉक्टर ठरवतात.

हिपॅटायटीस बी ही एक प्रकारची विषाणूजन्य कावीळ असते. याचा प्रसार रक्ताच्या संक्रमणातून व शरीरातील विविध स्रावांतून होतो. खास करून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना ही लस घेणे अतिशय आवश्यक आहे. परंतु सर्वांनीच ही लस घेणे अपेक्षित आहे. याची ३ इंजेक्शन्स घ्यावी लागतात.

हिपॅटायटीस ए हे सर्वांनी घेणे अपेक्षित नाही. काही विशिष्ट आजारांमध्ये, यकृताच्या व किडनीच्या आजारांमध्ये ही लस घेणे अपेक्षित आहे.

डीपीटी व टीडी घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात या आजारांसाठी ही लस घेतली जाते. दर दहा वर्षांनी घेणे अपेक्षित आहे. धनुर्वाताची लस बऱ्याचदा दिली जाते. कित्येकदा याची गरज नसते.

एचपीव्ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी जबाबदार आहे. यासाठीची वयाच्या नऊ वर्षापासून ते २६ वर्षांपर्यंत घ्यायला हवी. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी स्त्री व पुरुष या दोघांनाही ही लस घ्यायला हवी. हिमोफिलस इन्फ्ल्यूंझा बी आणि नुमोकॉकल लस ही लस सर्वांनी घेणे अपेक्षित नाही. काही विशिष्ट आजारांमध्ये प्रतिकारशक्ती खूप कमी होते. त्यांनीच फक्त ही लस घेणे अपेक्षित आहे.

टायफॉइड जेव्हा टायफॉइडची साथ येते तेव्हा सर्व लोकांनी ही लस घेणे आवश्यक असते. तसेच ज्यांना टायफॉइड होऊन गेलेला आहे, वारंवार प्रवास करणारे लोक यांना ही लस आवश्यक आहे. अन्यथा एरवी या लसीची गरज नाही. ही लस दर ३ वर्षांनी घ्यावी लागते.

कांजिण्या (चिकनपॉक्स) ही लस ज्यांना पूर्वी कांजिण्या झाल्या नाहीत अशा सर्वांना घेण्यास सुचविले आहे.

नागीण ६० वर्षांवरील सर्वांसाठी ही लस आवश्यक आहे. पूर्वी नागीण झाली असेल तरी ही लस घेणे आवश्यक आहे. मेनिंगोकॉकल जंतूसाठी लस या आजाराची साथ असताना, लष्करातील लोक व वसतिगृहात नवीन आलेले विद्यार्थी, काही देशांमध्ये प्रवासाआधी वगैरे ठराविक कारणांसाठी ही लस घ्यावी लागते.

रेबीज कुत्रा चावला नसतानासुद्धा रेबीजपासून प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी यासाठी ही लस दिली जाते. ० ,७ व २१ व्या दिवशी अशी तीन इंजेक्शन घ्यावी लागतात.पोलीस, पोस्टमन कुरियर देणारे, शाळकरी मुले, पशू तज्ज्ञ, वन कर्मचारी, आदी लोकांना ही लस घेणे फायदेशीर ठरते. कुत्रा चावल्यानंतरसुद्धा हीच लस वापरली जाते, परंतु त्याचे शेड्युल वेगळे आहे.

(लेखिका दौंड, जि. पुणे येथे अायसीयू तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com