सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी हक्काची

सांगली ः शिवाजी मंडईमध्ये दररोज विविध पालेभाज्यांची उलाढाल होते.
सांगली ः शिवाजी मंडईमध्ये दररोज विविध पालेभाज्यांची उलाढाल होते.

सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी मंडईमध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी चांगली संधी मिळते. जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती असली तरी, प्रयोगशील शेतकरी कमी पाण्यात भाजीपाला उत्पादन घेऊन थेट विक्रीसह व्यापाऱ्यांनाही विक्री करतात. शेतकऱ्यांसाठी ही मंडई हक्काची बाजारपेठ बनली आहे.

वेळ सकाळी सहाची...  शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी शिवाजी मंडई भरू लागली होती. ताजी भाजी घ्या...पालेभाजी ताजी...अशी साद  शेतकरी घालत होते. ग्राहकही तत्परतेने शेतकऱ्यांकडे भाजी खरेदीसाठी जात होते. याच दरम्यान दुष्काळी पट्ट्यातील एक शेतकरी टेम्पो भरून कांदापात विक्रीसाठी घेऊन आला होता. कांदापात घ्या ....कांदापात.... पंधरा रुपयांची जोडी...  कांदापातीची अशी जाहिरात शेतकरी करत होता. ताज्या हिरव्यागार कांदापातीमुळे टेंम्पोजवळ ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली होती... असे हे चित्र  दररोज मंडईत पाहावयास मिळते.  सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी मंडई दररोज सकाळी सहा ते दहा या काळात विविध ताज्या भाजीपाल्यांनी भरलेली असते. शहरातील ही भाजीपाला मंडई ८० वर्षे जुनी आहे. सांगली जिल्ह्यातील लगतची गावे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मंडई भाजीपाला विक्रीसाठी चांगले मार्केट आहे. या मध्यवर्ती मंडईमुळे अनेक शेतकऱ्यांना थेट भाजीपाला विक्री करणे सोईचे झाले आहे. याठिकाणी भाजीपाल्याचे सौदे देखील होतात. शेतकऱ्यांसाठी ही हक्काची बाजारपेठ झाली आहे. वास्तविक पाहता सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यात बाजारपेठा आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाजीपाल्याची विक्री होते. सध्या दुष्काळाची परिस्थिती आल्याने उपलब्ध पाणी साठ्यावर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीस प्राधान्य दिले आहे. कमी दिवसांत, कमी व्यवस्थापनात भाजीपाला पिकांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित नफा होत असल्याचे भाजीपाला उत्पादक सांगतात.

या ठिकाणाहून येतो भाजीपाला

  •  जिल्ह्यालगतच्या कर्नाटकातीतून देखील आवक.
  •  वाळवा, मिरज, पलूस, तासगाव तालुका.
  •  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका.
  •  पुणे जिल्हा आणि घटप्रभा भागातून पुदिन्याची आवक.
  • आवक होत असलेला शेतीमाल ः
  • मेथी, कोथिंबीर, कांदापात, देशी केळी, पालक, चाकवत, माठ, पुदिना.
  •   पहाटे पाच वाजता लहान, मोठे टेम्पो भरून भाजीपाल्याची आवक.
  •   सहा वाजता सौदे सुरू होऊन नऊ वाजता संपतात.
  •   भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी संधी.
  •   किरकोळ व्यापारी करतात भाजीपाला खरेदी.
  •   लहान-मोठे व्यापारी खेडोपाड्यातील शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची खरेदी करून सांगलीत विक्री करतात.
  •   शेतकरी व्यापाऱ्यांना प्रतिपेंडीमागे ५० पैसे कमिशन देतात.
  •   विक्रीनंतर शेतकऱ्यांना जागेवर पैसे मिळतात.
  • दररोजची आवक आणि दर

  •   मेथी ः १०,००० ते १५,००० पेंड्यांची आवक, दर सरासरी ५०० ते ६०० रुपये शेकडा.
  •   पुण्यातून पुदिन्याची ८०० ते ९०० पेंडी आवक, दर ८ रुपये ते १० रुपये पेंडी (मोठी पेंडी)
  •   घटप्रभा पुदिन्याची २००० ते ३००० पेंडी आवक, दर ३ रुपये ते ५ रुपये पेंडी.
  •   कांदापात ५००० पेंडी आवक, दर ६०० ते ८०० रुपये शेकडा.
  • शेतकऱ्यांना मिळतो अपेक्षित दर

    दररोजच्या आवकेनुसार भाजीपाल्याचा दर ठरतो. बाजारातील भाजीच्या दरात होणारी चढ-उतार शेतकऱ्यांच्या लक्षात येते. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करुन भाजीपाल्याची लागवड करतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे बाजारपेठेतील दरावरून दिसून येते. हंगामानुसार भाजीची लागवड केल्याने अपेक्षित दर मिळतात.

    भाजीपाला ठरला फायदेशीर आमचा भाग तसा दुष्काळी. पाणी टंचाईमुळे मोठ्या कालावधीच्या पिकांची लागवड करणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून मी कांदा रोपवाटिकच्या बरोबरीने पातीसाठी कांदा लागवड करतो. हे पीक साडेतीन महिन्याचे आहे. पीक वाढीच्या काळात टप्प्याटप्प्याने पाणी देतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी असा पीक हंगाम आहे. संक्राती दरम्यान कांदापातीला मागणी असते. मी स्वतः सांगली बाजारात थेट विक्री करत असल्याने जास्तीचे चार पैसे मिळतात. सध्याच्या काळात पुरेसे पाणी नसल्याने कमी कालावधीचे भाजीपाला पीक घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भाजीपाला पिकातून मला चांगले उत्पन्न मिळते.   - विष्णू साळुंखे, ९७६४०२०५३३ (मांजर्डे, ता. तासगाव, जि. सांगली)

    पंधरा वर्षांपासून भाजीपाला लागवड लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे आम्ही पाच शेतकरी प्रत्येकी वीस गुंठ्यात भाजीपाला करतो. भाजीपाला हेच आमचे मुख्य पीक आहे. आम्ही रत्नागिरीला देखील भाजीपाला विक्रीस पाठवतो. सध्या आम्ही गावातील एका व्यापाऱ्याकडे भाजीपाला विक्रीसाठी देतो. व्यापारी सांगलीत भाजीपाल्याची विक्री करुन संध्याकाळी आम्हाला पैसे देतो. यामुळे आमच्या वेळेत बचत होते. तसेच पिकाचे नियोजन करणे शक्य होते.  गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही भाजीपाला लागवड करीत आहोत. आठ महिन्यात वीस गुंठ्यात पालक,चाकवत यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करतो. या पिकांतून खर्च वजा जाता चांगले पैसे मिळतात. - नंदू करवते,९७३०२८०२७७ (कवठेपिरान, ता.मिरज, जि. सांगली)

    पालेभाजी विक्रीवर भर मी लहान व्यापारी आहे. आमच्या भागात सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड होते. भाजीपाला विक्री करण्यासाठी गावातील भाजीपाला उत्पादक मला बोलावतात. त्यांच्याकडून भाजी खरेदी करून मी शिवाजी मंडईत विक्री करतो. भाजीपाला विक्रीवरच माझा उदरनिर्वाह चालतो. भाजी विक्री झाल्यानंतर उत्पादकाला पैसे देतो. ते मला प्रतिपेंडीमागे ५० पैसे कमीशन देतात. दररोज मी १००० ते १५०० पेंड्या मेथी, पालक, तांदूळजा अशा भाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतो. - प्रकाश जाधव (व्यापारी, कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली)

    दराची चांगली स्पर्धा भाजीपाला खरेदी आणि विक्रीसाठी व्यापाऱ्यांच्या बरोबरीने शेतकरीदेखील असतात. यामुळे दराची स्पर्धा होते. याचा फायदा व्यापारी आणि शेतकऱ्यांना होतो. ही भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील लहान व्यापारी भाजीपाल्याच्या खरेदीसाठी येतात. या मंडईत शहरातील ग्राहक सकाळी ताजी भाजी खरेदीसाठी येतात. ग्राहकांनाही ताजा भाजीपाला रास्त दरात मिळतो. - दिलावर बागवान (व्यापारी, सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com