असे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक स्फॅग्नम पीट मॉस

दोन हेड असलेले पीट मॉस काढणी यंत्र (हार्वेस्टर).
दोन हेड असलेले पीट मॉस काढणी यंत्र (हार्वेस्टर).

विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर केला जातो. नैसर्गिकरीत्या मॉस कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रयोगशाळेमध्ये मॉसनिर्मिती ही तुलनेने महाग पडते. त्यामुळे नैसर्गिक मॉस गोळा करण्यासाठी मोठ्या काढणीयंत्रांचा वापर केला जातो. पीट मॉस हे तणांच्या बिया, कीडी आणि रोगांचे अवशेषमुक्त असल्याने व्यावसायिक लागवडीसाठी त्यांना प्राधान्य दिले जाते. सर्वसाधारणपणे मॉसच्या स्फॅग्नम कुळातील मॉसच्या वापर होतो. त्यात जागतिक पातळीवर स्फॅग्नमच्या १६० प्रजाती आहेत. त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असून, हवाही चांगल्या प्रकारे खेळती राहते. वर्षानुवर्षे त्यांचा वापर करणे शक्य असून, त्यात पिकांची चांगली वाढ होते. कॅनडामध्ये नद्यांचे प्रवाह, तलाव अशा प्रदेशामध्ये सातत्यपूर्ण आर्द्रतायुक्त वातावरणामुळे पीटलॅंड तयार झालेले आहेत. त्यातील अनेक तर सुमारे १० हजार वर्षांपासून आहेत. बर्फाचे मोठे खंड जमिनीवर येत राहतात. ते वितळल्याने परिसरामध्ये दलदल राहण्याचे प्रमाण अधिक असते. अशा पाण्याचा निचरा होत नसल्याने त्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. ऑक्सिजनरहित वातावरणामध्ये सूक्ष्मजीवांचेही प्रमाण कमी राहते. अशा ठिकाणी झाडे, वनस्पती आणि मॉस कुजण्याचा वेगही अत्यंत मर्यादित असतो. त्यामुळे सेंद्रिय घटकांवर मॉस वाढते. पीटलॅंडचे दोन प्रकार आहेत. १) फेन (मिनेरोट्रॉपिक पीटलॅंड) ः ज्या ठिकाणी पाण्याची पातळी खूप वर आहे, आणि निचरा सावकाश होतो, अशा ठिकाणी वाहत्या पाण्यासोबत खनिज आणि अन्नद्रव्ये वाहून येतात. पाण्याचा सामू ४.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो. अशा ठिकाणी तपकिरी मॉस, सेजेस, रीड आणि अन्य पानथळीच्या वनस्पती वाढत असल्या तरी स्फॅग्नम मॉस फारसे वाढत नाही. एकसलग तंतूमध्ये वाढलेल्या स्वरूपामध्ये पीट उपलब्ध होते. २) बॉग (ऑम्ब्रोट्रॉपिक पीटलॅंड) ः पाण्याची पातळी खूप वर असलेल्या, मात्र पाण्यामध्ये खनिजांची उपलब्धता नसलेल्या ठिकाणांना बॉग किंवा ऑम्ब्रोट्रॉपिक पीटलॅंड म्हणतात. येथे पाणी केवळ पावसामुळे येते. वाऱ्यासोबत वाहत आलेल्या धुळींच्या कणामध्ये असेल, तेवढीच अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. बॉगमध्ये असेलल्या ऑक्सिजनरहित वातावरणामध्ये फारच कमी वनस्पती वाढू शकतात. कमी स्पर्धेमुळे स्फॅग्नम मॉसच्या वाढ चांगली होते. उलट स्फॅग्नम मॉस अशा पाण्यातून कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम धन भारीत मूलद्रव्ये घेऊन त्या बदल्यात हायड्रोजन सोडते. त्यामुळे पाण्याचा सामू ३ ते ४.५ पर्यंत आणखी कमी होतो. अशा स्थितीमध्ये बहुतांश तणे वाढूच शकत नाहीत. त्यामुळे स्फॅग्नम मॉस हे तणरहित राहते. मॉसविषयी अधिक माहिती ः

  • स्फॅग्नम मॉस वर्षभरामध्ये २ ते १२ सेंमी इतकेच वाढते. बॉगमध्ये वनस्पतींचा खालील भाग मृत झाल्यानंतर त्यावर सावकशा पीट तयार होते. त्याचे वार्षिक प्रमाण ०.५ ते १ मिमी इतके असते. असे वर्षानुवर्षे थर साठत ते दोन इंचांपासून २० फुटांपर्यंत वाढलेले आढळतात.
  • बॉगमध्ये वर असलेले मॉस हे पिवळसर तपकिरी रंगाचे असून, स्पंजाप्रमाणे असते. लांब तंतू आणि खेळती हवा त्याचे वैशिष्ट्य असते.
  • बॉगमध्ये अधिक खोलीवरील मॉस हे गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे (त्याच्या कुजण्याच्या प्रमाणानुसार) असते. तंतू लहान, पोत मऊ आणि खेळत्या हवेचे प्रमाण तुलनेने कमी असते.
  • साधारणतः एक मुख्य काडीवर दोन ते तीन फुटलेल्या फांद्या असतात. या फांद्यावर दोन ते चार लोंबत्या फांद्या असतात. त्यावर पाने असून, त्यात हिरव्या जिवंत हरितद्रव्य पेशी (क्लोरोफायलस सेल) आणि पाणी धरून ठेवणाऱ्या मोठ्या मृत पेशी (हयालिन सेल)असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण झालेल्या स्थितीमध्येही दीर्घकाळ मॉस तग धरून राहते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com