हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक बंदोबस्त आवश्यक

हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक बंदोबस्त आवश्यक
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक बंदोबस्त आवश्यक

गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव ऊस, हळद, सोयाबीन अशा अनेक पिकांमध्ये दिसत आहे. ही अळी मातीमध्ये असल्याने तिचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतर उपाययोजना करेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. या अळीची जीवनसाखळी संपूर्ण वर्षभराची असून, प्रौढ भुंगेरा वगळता सर्व अवस्था मातीमध्ये पूर्ण होतात. या किडीच्या नियंत्रणासाठी भुंगेऱ्यांचे सामुदायिक पद्धतीने नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. मे महिन्यामध्ये ढगाळ वातावरणाबरोबरच अवकाळी पाऊसही अनेक ठिकाणी पडतो. या वळवाच्या पावसाच्या मध्ये हुमणी अळीचे भुंगेरे मातीतून बाहेर पडतात. बाभूळ, कडुनिंब, बोर इत्यादी झाडांवर उपजीविका करतात. तसेच त्यांचे मिलन होऊन लगतच्या शेतामध्ये अंडी देतात. हुमणी किडीची जीवनसाखळी संपूर्ण वर्षभराची असून, प्रौढ भुंगेरा वगळता सर्व अवस्था मातीमध्ये पूर्ण होतात. त्यामुळे हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी या अवस्थेतर नियंत्रणाचे उपाय सामुदायिकपणे राबवावे लागतात. शास्त्रीय नाव ः Holotrichia serrata -हुमणी ही कीड बहुभक्षी कीड आहे. प्रचलित नावे : हुमणी, उन्नी, उकरी, गांढर, खतातील अळी, मे-भुंगेरे अथवा जून-भुंगेरे, चाफर, भुंगेरे, कॉकचार्फस, मुळे खाणारी अळी या नावाने हुमणी ओळखली जाते. ओळख : या किडीचा प्रौढ भुंगा तपकिरी किंवा गडद विटकरी अथवा काळपट रंंगाचा असतो. त्याचे पंख जाड, टणक असून पाय तांबूस रंंगाचे असतात. भुंगेरे निशाचर असून उडताना घुऽऽ घुऽऽ असा आवाज करतात. अळी पांढरी असून तिचे डोके गडद तपकिरी रंंगाचे असते. तिला ३ पायाच्या जोड्या असतात. शेतात नांगरणी करताना किंवा शेण खताच्या खड्‍ड्यात दिसणारी इंग्रजी ‘सी’ आकाराची अळी म्हणजेच हुमणी होय. जीवनक्रम : पहिल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये प्रौढ भुंगे सुप्तावस्थेतून बाहेर निघतात. संध्याकाळच्या वेळी प्रौढ भुंग्याचे मिलन बाभूळ किंवा कडुनिंंबाच्या झाडावर होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी मादी जमिनीमध्ये ७-१० से.मी. खोलीवर अंडी घालते. एक मादी ५० ते ७० अंडी घालते. अंडी ९ ते २४ दिवसामध्ये उबतात व त्यातून अळी बाहेर पडते. अळी दोनदा कात टाकून ५ ते ९ महिन्यामध्ये पूर्ण वाढते. त्यानंतर ती जमिनीत कोषावस्थेमध्ये जाते. या कोषातून १४-२९ दिवसांनी प्रौढ भुंगे बाहेर पडतात. हे प्रौढ जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहून मे-जूनमधील पावसानंतर बाहेर निघतात. प्रौढ १.५ ते ३ महिन्यापर्यंत जगतात. हुमणी किडीची एक वर्षामध्ये एकच पिढी होते. खरीप हंंगामामध्ये या किडीचा मुख्यत्त्वे करून प्रादुर्भाव होतो. प्रसाराची कारणे :

  • जंगलतोड, बदलते हवामान, संकलित संरक्षण उपायांचा अभाव, शेणखताची काळजी न घेणे, शेतीची कमी मशागत. विशेषतः हलक्या जमिनीत व कमी पाण्याच्या प्रदेशात ही कीड जास्त प्रमाणात आढळते.
  • हुमणी भुंगेरे बाभूळ, कडूनिंब, बोर इत्यादी झाडावर उपजीविका करतात. त्यांचे खाद्य परिसरात दूरपर्यंत पसरलेले असल्यास त्यांचा प्रसार वेगाने होतो. कारण हे हुमणीचे भुंगेरे २.५ किलोमीटर अंतरापर्यंत खाद्य शोधण्यासाठी टप्प्याटप्प्याने जाऊ शकतात.
  • नुकसानीचा प्रकार : हुमणीची अळी अवस्था ही पिकांना नुकसान पोचविते. त्यामुळे झाड सुरुवातीला पिवळे आणि नंतर वाळून जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटली जातात. या अळीचा प्रादुर्भाव बहुतांश वेळा एका रेषेत असतो. आर्थिक नुकसानीची पातळी : एक अळी प्रति चौरस मीटर झाडांवर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास. प्रौढ भुंगे­ऱ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी. नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नायनाट करावा.
  • शेतीमध्ये पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
  • मे-जून महिन्यात पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येतात. बाभूळ, कडूनिंंब, इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावरचे भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीच्या साह्याने किंवा झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत. भुंगेरे गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
  • प्रादुर्भाव अधिक असलेल्या विभागामध्ये गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सामुदायिकपणे भुंगेरे गोळा करून नष्ट करण्याचा कार्यक्रम राबवावा.
  • भुंगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळयांचा वापर करावा. सापळ्यातील भुंगे गोळा करून मारावेत. एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रास पुरेसा होतो.
  • पक्षी, कुत्रे व डुकरे हे भुंगे­ऱ्यांना व अळ्यांना खातात.
  • या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेरेच्या नाश होऊन पुढील उत्पत्तीस आळा बसतो.
  • संजय बोकन (पीएच.डी. स्कॉलर), ९९२१७५२००० डॉ. बी. व्ही. भेदे (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२८ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com