कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची साथ

अर्थकारणाला मिळाली बचत गटांची साथ
अर्थकारणाला मिळाली बचत गटांची साथ

शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक बचत केलीच, त्याचबरोबरीने पशुपालन, फळबागांसाठी ठिबक सिंचन, विहीर कूपनलिकांची खोदाई, द्राक्ष बाग उभारणीतील आर्थिक भारही उचलला.

कडवंची गावाच्या शेती आणि आर्थिक विकासात महिला बचत गटांनी मोलाचे योगदान दिले आहे. या गावात सव्वीस महिला बचत गट असून या गटांशी सुमारे २८८ महिला जोडलेल्या आहेत. आठवड्याला २० ते ३० रुपयांपर्यंतची बचत या महिला करतात. बचतीच्या माध्यमातून कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करायला हातभार लागला आहे. या बचत गटाच्या एकत्रीकरणातून गावात ग्रामगीता महिला ग्रामसंघ तयार झाला. ग्रामसंघाच्या माध्यमातून बचत गटांचे प्रश्न तालुका स्तर आणि प्रभाग संघाच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर मांडून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न होतो. बचतीच्या सवयीचा उपयोग महिलांना पूरक उद्योग वा आर्थिक अडचणीच्या काळात कर्ज म्हणून मिळण्यासाठी झाला.

    ग्रामसंघाच्या अध्यक्षा शकुंतला दत्तात्रय वाहूळ म्हणाल्या की, गटातील महिलांनी मिळालेल्या कर्जाचा वापर पशुपालन, शेळीपालन, द्राक्ष बाग उभारणी, किराणा दुकानासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी केला आहे. सुरवातीला २० रुपयांच्या बचतीत फारसे काही भागत नव्हते, परंतू पंचायत समितीकडून अर्थसाहाय्य मिळाल्यानंतर कुणी शेळी घेतली, बैल घेतले, गाय घेतली. कुणाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागला. मिळालेले पैसे कामी आले. एका महिलेला गटातील सर्व महिलांनी मिळून शेततळे खोदाई आणि आच्छादनासाठी प्लॅस्टिक कागद घेण्यासाठी मदत केली. सर्वांना विश्वासात घेऊन काम सुरू असल्याने ग्रामसंघाची वाटचाल चांगली सुरू आहे. बचतीच्या सवयीमुळे आम्ही व्यवहार शिकलो. बचत गटातील प्रत्येक महिलेचा शेती आणि ग्रामविकासात मोलाचा वाटा आहे.

द्राक्ष बाग उभारणीला मदत शिवशक्ती स्वयंसहायता महिला बचत गटातील सदस्या रेखा रवींद्र क्षीरसागर म्हणाल्या की, आमचा गट जून २०१४ मध्ये सुरू झाला. गटात ११ सदस्या आहेत. गटाच्या अध्यक्षा आशा गिरे आणि सचीव माया क्षीरसागर आहेत. माझ्याकडे आर्थिक नोंदीची जबाबदारी आहे. आत्तापर्यंत गटाने ६३,८०० रुपये बचत केली आहे. गटाने काही वर्षापूर्वी ८० हजाराचे कर्ज घेतले. या कर्जातून काही सदस्यांनी शेळ्या, म्हशी, गाईंची खरेदी केली. काही सदस्यांनी विहीर, कूपनलिका, ठिबक सिंचनासाठी ही रक्कम उपयोगात आणली. गटात दोन टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. बचत गटातून मिळालेल्या कर्जातून मी पिठाची गिरणी आणि गाय घेतली आहे. त्यामुळे पशुपालनाला चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे सावकारी कर्ज वाचले.      गटातील सदस्या कर्जाची वेळेवर परतफेड करतात. त्यामुळे सर्वांनाच फायदा होतो. बचत गटामुळे आर्थिक गणित कळाले. मिळालेला पैसा योग्य कारणासाठी खर्च होतो. बचत गटामुळे महिलांचे धाडसही वाढले. महिला आता ग्रामसभेत सहभाग घेऊन आपल्या अडचणी मांडतात, ग्रामविकासासाठी उपायही सुचवितात. आमच्या गटातील प्रत्येक सदस्याकडे द्राक्ष बाग आहे. त्यामुळे आम्ही बाग उभारणी, छाटणी, पाणी व्यवस्थापन, फवारणी, पॅकिंगबद्दल शिकून घेतले आहे.

पशुपालनाला मिळाली चालना मुक्ताई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव आसराबाई अंबिलवादे म्हणाल्‍या की,  खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून २००५ साली स्थापन झालेला आमचा पहिला बचत गट. गटाच्या अध्यक्षा सुशिला जारे आहेत. गट दहा सदस्यांचा असून आम्ही दरमहा १०० रुपयांची बचत करतो. शेती, ग्रामविकास कार्य आणि आरोग्य शिबिरामध्ये गटातील सदस्यांचा चांगला सहभाग असतो. गटाच्या बचतीतून आम्ही २ टक्के व्याज दराने सदस्यांना कर्ज वाटतो. या रकमेतून सदस्यांनी पूरक उद्योगाला सुरवात केली आहे. सध्या गटातील सदस्यांकडे १२ शेळ्या, १५ गाई, म्हशी झाल्या आहेत. जनावरांच्या मुळे बायोगॅसची उभारणी काही सदस्यांनी केली आहे. यामुळे गॅस सिलिंडरची चांगली बचत होते. बायोगॅसच्या स्लरीचा वापर शेतीमध्ये केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होत आहे. काही जणींनी बांगडी दुकान, पीठ गिरणी व्यवसाय सुरू केला आहे. गावामध्ये द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येत्या काळात गटातर्फे बेदाणा निर्मिती उद्योगाची उभारणी करणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com