'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌ शिक्षणाचा जागर

शेतकरी महिला बचत गटातील सदस्या
शेतकरी महिला बचत गटातील सदस्या

गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण विकासासाठी हिंगोली येथील उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. संस्था प्रामुख्याने नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, शेती विकास, महिला सक्षमीकरण, पत पुरवठा, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणासंबंधी कार्यरत आहे. दुर्गम ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक, सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचे संस्थेचे धोरण आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ पट्ट्याच्या संवर्धनावर विशेष भर दिला आहे. हा प्रकल्प राजीव गांधी तंत्रज्ञान व विज्ञान आयोग आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था यांच्या समन्वयातून सुरू आहे. कयाधू नदी कायम वाहती ठेवण्यासाठी संस्था प्रयत्नाशील आहे. गवताचे संवर्धन कयाधू नदी काठावर मारवेल, पवना, जोंधळी या पोषक गवताच्या जाती आहेत. हे गवत जनावरांसाठी उपयुक्त आहे. तसेच नदी काठावरील माती आणि कस टिकून ठेवण्यासाठीही पूरक आहे. गेल्या दोन वर्षांपासून उगम संस्था या प्रकल्पामध्ये कार्यरत आहे. यासाठी लोकांचे संगठन त्यांचे मनपरिवर्तन, जाणीव जागृती असे उपक्रम राबविण्यात येतात. पहिल्यांदा शेतकरी थडीचा वापर शेतीसाठी करायचे, त्यासाठी गवत नष्ट केले जायचे. पण आता हळूहळू मानसिकता बदलत आहे. त्यांना थडीचे महत्त्व पटले आहे. इतर पिके घेऊन जेवढे उत्पन मिळते, तेवढेच उत्पन्न गवताच्या संवर्धनातून मिळते. जनावरांसाठी सकस चारा आणि दुग्ध व्यवसायातून देखील किफायतशीर नफा मिळू शकतो हे शेतकऱ्यांना पटले आहे. नदी काठी गवताच्या संवर्धनामुळे नदीत वाहून जाणाऱ्या मातीचे प्रमाण कमी होत आहे. याचबरोबरीने नदीचा प्रवाह शाश्वत झाला. सामगा ते सोडेगाव अशा बारा गावांमध्ये संस्था कार्यरत आहे. संस्थेने सोयाबीनपासून मिळणारे उत्पन्न आणि गवतापासून मिळणारे उत्पन्न यांचा तुलनात्मक अभ्यास शेतकऱ्यांसमोर मांडला. बारा गावांतील ५६५ शेतकऱ्यांच्या मदतीने संस्थेने ३१७ हेक्टर कुरणक्षेत्र निर्माण केले. गावांची गरज ओळखून येथील शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप, विविध शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन असे उपक्रम राबविले जातात. सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन   गेल्या काही वर्षांत रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होत आहे. उगम संस्थेकडून जमिनीची पोत सुधारणा, सेंद्रिय खते आणि कीडनाशके तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. उगम संस्थेतर्फे हिंगोली जिल्हा परिषदेच्या परिसरात दर शुक्रवारी सेंद्रिय भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो. या बाजारपेठेत संस्थेचे मार्गदर्शन असणारे वीस शेतकरी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. हा उपक्रम आय.आय.आर.डी. संस्थेच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येतो. या उपक्रमास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पर्यावरण आधारित शिक्षण  पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राच्या मदतीने गेल्या पाच वर्षांपासून उगम संस्था पर्यावरण आधारित शिक्षण हा प्रकल्प वीस शाळांमध्ये राबवित आहे. उगम संस्थेने वीस गावांतील जिल्हा परिषद शाळांमधून पर्यावरण शिक्षणाच्या तासिका सुरू केल्या. फळझाडे, फुलझाडे, पारंपरिक बियाणे, पशु, पक्षी, प्राणी, परिसर स्वच्छता, आरोग्य याबाबत खेळ, प्रश्नमंजूषा या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाते. याचबरोबरीने वृक्ष संवर्धन, पाण्याचा योग्य वापर याबाबतही मार्गदर्शन केले जाते. मुले बीज संकलन, आहार पद्धती, अन्नातील जैवविविधतेचा अभ्यास करतात. शाळास्तरीय जैवविविधता कोपरा तयार करण्यात आला असून त्यामध्ये स्थानिक व दुर्मीळ बियाण्यांचे संकलन केले जाते. उगम संस्थेने एक पेटी तयार केली आहे. यामध्ये कॅमेरा, दुर्बीण, तापमापी, मापे, पुस्तके, रानभाज्या, पिके, कीटक अशा विविध घडीपत्रिका मुलांच्या अभ्यासासाठी ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांना पाणी तपासणे, रोप तयार करणे, चौरस पद्धतीने गवत मोजमाप करणे, पक्षी ओळखणे असे विविध उपक्रम शिवार फेरी, चर्चा व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकविण्यात येतात.    

  पाच गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये हॅबिटॅक, मुंबई आणि हिरो मोटो क्रॉर्प यांच्या सहयोगाने उगम संस्थेने सुधारित शौचालये बांधून दिली. आज शाळेतील शौचालये पाहून विद्यार्थी पालकांकडे घरी असे शौचालय असावे अशी मागणी करतात. यातूनच आमदरी गावकऱ्यांनी १५९ नवी वैयक्तिक शौचालये बांधली. या उपक्रमामुळे गाव हागणदारी मुक्त होण्यास निश्चित मदत झाली.

महिला बचत गटांची उभारणी

  •  सावित्रीबाई फुले म्युचल बेनिफिट ट्रस्टच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी उपक्रम. पूर्णतः महिलांनी चालविलेला मायक्रो फायनान्स. महिलांकडे सर्व उपक्रमाचे नियोजन.
  •  साडेचार हजार महिलांनी आर्थिक डोलारा उभा केला असून वार्षिक पाच कोटींची उलाढाल.
  •  साडे चारशे महिला बचतगटांचा समावेश. यामध्ये व्हिलेज डेव्हलपमेंट असोसिएशन आहे. क्लस्टर असोसिएशनमध्ये १५ ते २० गावांचा समावेश. एकूण पाच जिल्ह्यांत उपक्रम. कर्जफेडीचे प्रमाण चांगले.
  •  एचडीएफसी बॅंकेच्या माध्यमातून वाशीम जिल्ह्यातील आठ गावांमध्ये महिला सक्षमीकरण, शाळांची दुरुस्ती, स्वच्छ पाणीपुरवठा, सौर दिव्यांचे वाटप.
  • कयाधू नदीचे पुनरुज्जीवन हिंगोली जिल्ह्यात एकेकाळी बारामाही वाहणारी कयाधू नदी आता फक्त पावसाळ्यात वाहताना दिसते. वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, मानवाच्या हव्यासापोटी नैसर्गिक साधन सामग्रीचे होणारे अतिशोषण यांमुळे नदीच्या वाहतेपणावर परिणाम झाला. हे लक्षात घेऊन जनजागृतीसाठी उगम संस्थेने नदीकाठच्या गावातून शंभर किलोमीटर अंतराची पायी दिंडी काढली. तसेच विविध गावांतील लहान मोठ्या ओढ्यांचे सर्वेक्षण केले. संस्थेने १३१ गावांमधील सध्याचा जलसाठा, भविष्यकालीन जलसाठा, पाणलोट क्षेत्र विकासाचे झालेले रचनात्मक कार्य आणि भविष्यात रचनात्मक करावयाच्या कामांचा आराखडा तयार केला आहे.

    दुष्काळ निर्मूलन कार्यक्रम

  •  मुंबईमधील इडलगिव्ह फाउंडेशनतर्फे दुष्काळावर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम.
  •   आदिवासी पट्‌ट्यातील आमदरी आणि तेलंगवाडी गावांमध्ये माथा ते पायथा या पद्धतीने कामे करण्यात आली. यामुळे जल, मृद संधारणासाठी चांगला फायदा.
  •   गेल्या दोन वर्षांच्या काळात आमदरी गावात संस्थेने नाला खोलीकरण, सीएनबी, सीसीटी अशी कामे केल्याने पाण्याची चांगली उपलब्धता.
  •   आमदरी गावामध्ये एकेकाळी ८० टक्के कुटुंबे स्थलांतरित होत होती, ही संख्या दहा टक्‍क्यांवर. आमदरी हे गाव करटूले व सीताफळ उत्पादनासाठी प्रसिद्ध झाले आहे. 
  • - विकास कांबळे, ७७२२०४८२३० (लेखक हिंगोली येथील उगम ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com