नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'ची रुजवात

राणीकाजल लोकसंचलित साधन केंद्रातील महिला सदस्या.
राणीकाजल लोकसंचलित साधन केंद्रातील महिला सदस्या.

अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला, शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला प्रोत्साहन देणारा भगर प्रक्रिया उद्योग मोलगी (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) येथील राणिकाजल लोकसंचालित साधन केंद्राने सुरू केला. भगरीची स्वच्छता, प्रतवारी, प्रक्रिया आणि ब्रॅंडिंग करून किफायतशीर दरात विक्री करण्यात येते. या उद्योगामुळे भगर प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव हे तालुके सातपुड्याच्या कुशीत वसले आहेत. या तालुक्‍यांमध्ये खरिपात बाजरी, मका, ज्वारी, कापसासह भगरीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. भगर हे पीक दुय्यम असले तरी तीव्र उतार, हलक्‍या जमिनीत चांगल्या पद्धतीने येते. त्याला आदिवासी बोलीत कोदरा, बार्टी, भादी, वरी असेही म्हणतात. आदिवासी बांधवांच्या आहारात त्याला महत्त्व आहे. सण, उत्सवामध्ये भगरीचे पदार्थ केले जातात. अनेक शेतकरी आंतरपिकात भगरीला प्राधान्य देतात. हे पाच महिन्यांचे पीक आहे. साधारणपणे डिसेंबर, जानेवारीनंतर काढणीचा हंगाम असतो. मार्चपर्यंत आठवडी तसेच इतर बाजारात भगर विक्रीला येते. या पिकाची पारंपरिक पद्धतीने मळणी करून नंतर साठवणूक किंवा विक्री आदिवासी बांधव करतात. भगरीवर भातासारखी साळ असते. ती न काढताच आदिवासी बांधव, महिला शेतकरी १८ ते २० रुपये प्रतिकिलो दराने मोलगी बाजारासह अक्कलकुवा, नंदुरबारात भगरीची विक्री करतात.

प्रक्रिया उद्योगाला सुरवात भगर पिकाचे अर्थकारण व आदिवासी बांधवांमधील महत्त्व लक्षात घेता महिला आर्थिक विकास महामंडळाने बचत गटांमधील महिला शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यातून २०१६-१७ मध्ये मोलगी येथील राणिकाजल लोकसंचालित साधन केंद्राच्या रिता पाडवी, रमिला वसावे यांनी भगर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. १५ टक्के वित्तीय वाटा या केंद्राच्या उभारणीसंबंधी उचालायचा होता. तो वाटा रिता यांनी पती मनोहर यांच्या मदतीने उचलला. दोन लाख रुपये वित्तसाहाय्य नंदुरबार येथील महिला आर्थिक विकास महामंडळाने केले. तांत्रिक साहाय्य कोळदा (ता. नंदुरबार) येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती संचालित कृषी विज्ञान केंद्राने केले.

तमिळनाडूमध्ये भगरीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तेथे इडली, डोसा, उत्ताप्पा निर्मितीमध्ये भगरीचा वापर केला जातो. भगरीचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्राने तमिळनाडू कृषी विद्यापीठाशी संपर्क साधून भगर प्रक्रिया यंत्रणेची माहिती घेतली. कृषी विद्यापीठाच्या बरोबरीने धान फाउंडेशन या संस्थेने यंत्रणा आणि प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले.  कृषी विज्ञान केंद्राने तमिळनाडूमधून भगर प्रक्रियेची यंत्रणा आणली. यामध्ये हलर, सेपरेटर, मिलरचा समावेश आहे. सेपरेटर प्रतवारी करते. हलर काडी, कचरा, माती दूर करते आणि मिलरमध्ये भगरमधील तेलकटपणा, साळ दूर करण्याची अंतिम प्रक्रिया केली जाते.

असा आहे प्रक्रिया उद्योग

  •  मोलगी येथे पक्‍के बांधकाम असलेल्या जागेत प्रक्रिया उद्योग. दीड लाख रुपयांमध्ये यंत्रणेची खरेदी. दोन हजार रुपये प्रतिमहिना, असे भाडे जागेपोटी द्यावे लागते.
  •  रिता पाडवी, रमिला वसावे केंद्राच्या समन्वयक व व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.
  •  राणिकाजल लोकसंचालित साधन केंद्राशी अक्कलकुवा तालुक्‍यातील सुमारे १८७ महिला बचत गट जोडले आहे. सुमारे ५०० पेक्षा अधिक आदिवासी महिला, त्यांचे कुटुंबीय या उद्योगाशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे जोडले आहेत. सोबतच इतर शेतकरीदेखील पाच रुपये किलो दराने या केंद्रात भगरीवर प्रक्रिया करून घेतात.
  •  स्वच्छ केलेल्या भगरीची डिसेंबरमध्ये ६० ते ८० रुपये प्रति किलो आणि सध्या १०० ते १२० रुपये प्रति किलो या दरात नंदुरबार जिल्ह्यात विविध भागात ‘सातपुडा भगर' या ब्रॅंडनेम योग्य पॅकिंगमध्ये विक्री केली जाते.
  •  महिलांच्या संस्थेला विक्री केंद्र उपलब्ध व्हावे यासाठी नंदुरबार शहरात जागेची मागणी महिला व आर्थिक विकास महामंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मध्यंतरी केली असून, त्यासंदर्भात लवकरच कार्यवाहीचे आश्‍वासन प्रशासनाने दिले आहे.
  •  वर्षभरात ३३ क्विंटल भगरीची विक्री. नंदुरबार येथील कृषी महोत्सव, विविध संस्थांच्या प्रदर्शनात विक्रीचे स्टॉल. ज्या महिला सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत, त्यांना या विक्रीच्या उलाढालीतून पैसे मिळतात.
  •  पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित होणाऱ्या भगरीला शहरी बाजारपेठेतून चांगली मागणी.
  •  कृषी विज्ञान केंद्राने महिला बचत गटाला भगरीपासून १८ प्रकारचे प्रक्रिया पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे भगरीच्या बरोबरीने प्रक्रिया पदार्थांचीदेखील विक्री.
  •  धडगावमधील बचत गटातर्फे भगर प्रक्रिया केंद्राची सुरवात.
  • बियाण्याचे वाटप आदिवासी बांधवांना पेरणीसाठी भगरीचे नवे व दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी तमिळनाडूमधून सहा क्विंटल बियाणे महिला आर्थिक विकास महामंडळाने आणले. मागील हंगामात १०० क्विंटल बियाण्याचे मोफत वाटप राणिकाजल लोकसंचालित साधन केंद्राला केले होते. एकरी साडेचार किलो, या प्रमाणे हे वितरण करण्यात आले. आता येत्या हंगामासाठीदेखील हे बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. तसेच भाताप्रमाणे भगर रोपे निर्मितीसाठी दोन रोपवाटिका सातपुडा परिसरातील गावात उभारण्याचे नियोजन महिला आर्थिक विकास महामंडळाने केले आहे.

     - राजेंद्र दहातोंडे, ९६५७३२३३३४ कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, जि. नंदुरबार

     - संजय संगेकर, ८४०८००२३६५ जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार

      - रिता पाडवी, ९४०४०३५७०७ समन्वयक, राणिकाजल लोकसंचालित साधन केंद्र, मोलगी, जि. नंदुरबार

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com