आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकता

बायोगॅस स्लरीपासून खतनिर्मिती करताना महिला गटातील सदस्या.
बायोगॅस स्लरीपासून खतनिर्मिती करताना महिला गटातील सदस्या.

कोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी महिला वनौषधी संकलन व विक्रीची कामे करत होत्या.  बायफ संस्थेने आदिवासी महिलांना एकत्र करत ब्रह्मगिरी महिला संघ स्थापन केला. बाजारपेठेची गरज लक्षात घेत या गटाने सेंद्रिय खते बनविण्यासह आयुर्वेदिक उत्पादने, विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीस सुरवात केली. या उपक्रमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी कुटुंबे आहेत. या भागात महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने २००४ मध्ये बायफ संस्थेने केंद्र शासनाचा ‘जनउत्कर्ष’ कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये शेती, पाणी, शिक्षणावर भर देण्यात आला. पुढे महिला बचत गटांचे काम आदिवासी पाड्यांवर उभे राहिले. बायफने वाड्यांवर काम सुरू करून महिलांना गटात सहभागी करून घेतले. महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला. पुढे हा कार्यक्रम मुदत संपल्याने थांबला असला तरी आदिवासी महिला संघटित भावनेने एकत्र होत्या. त्यामुळे बायफ संस्थेने २००९ मध्ये या भागात पुन्हा बचत गटाचे काम हाती घेतले. आदिवासी महिलांना एकत्र करत ब्रह्मगिरी महिला संघ स्थापन केला.

सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ बायफ संस्थेने २००९ पासून सीएसआर फंडातून काम सुरू केले. कोणे गावातील १५ महिलांना बायोगॅस संच देण्यात आले. या तंत्रज्ञानाबद्दल माहितीचा अभाव असल्याने सुरवातीला विरोध होता. मात्र बायफने बायोगॅस वापराबद्दल महत्त्व पटवून दिले. स्वयंपाक आणि अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी इंधन उपलब्ध झाले. महिलांनी पारंपरिक जळाऊ चुलीचा वापर थांबविला. यातून महिलांचे श्रम वाचले, वृक्षतोड कमी होऊ लागली. धुरापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता झाली. आदिवासी पाड्यांवर नवतंत्रज्ञान रुजले. महिलांची सकारात्मक वृत्ती पाहून बायफने बायोप्रॉम खत उत्पादनाचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले. बायफचा हा पहिला पायलट प्रकल्प होता. बायफ संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी मीना गांगुर्डे, सीमा पाटोळे व आश्लेषा देव, मोनिका कापूरे या आदिवासी पाड्यांवरील महिलांच्या सातत्याने संपर्कात राहात असल्यामुळे महिला या प्रकल्पात सहभागी झाल्या. घरगुती बायोगॅसचा योग्यरीत्या केलेला वापर हीच  उद्योजकतेची पहिली पायरी ठरली. संस्थेने प्रत्येकी तीन महिलांचे पाच गट तयार केले. दर आठवड्याला त्यांच्या बैठका होऊ लागल्या. यातून कामकाजातील अडचणी, भांडवल, जमाखर्च व भविष्यातील नव्या योजना याबाबतीत सक्रिय चर्चेतून आत्मविश्वास वाढला.

 बायोगॅसमधून मिळणारी शेणस्लरी मिळते. संघातील महिला सदस्यांच्या बायोगॅस संचाची पाहणी, काही तांत्रिक अडचणीत दुरुस्ती आणि स्वच्छता याबाबत वेळोवेळी पाहणी केली जाते. बायोप्रॉम  बनविण्यासाठी कोणे गावात भाडेतत्त्वावर जागा घेतली असून, तेथे पत्र्याचे शेड बनविले आहे. पाणी, वीज यांसह सर्व अत्यावश्यक सुविधा आहेत.

  •   उत्पादन समिती ः दैनंदिन उत्पादन, त्यातील लागणारा कच्चा माल, विक्रीसाठी पुढील मागणी याबाबत सर्व नोंदी व माहिती.
  •   विक्री समिती ः तयार उत्पादन विकले जावे, यासाठी या समितीतील महिला मार्केटिंग करतात.
  •   हिशेब समिती ः दैनंदिन व्यवहार, स्टॉक रजिस्टर, चलन बनविणे, वसुली़ तसेच बँक संबंधित सर्व कामे या समितीकडे देण्यात आली आहेत.
  •   कृषी समिती ः भाजीपाल्याचे प्रात्यक्षिक प्लॉट किंवा ज्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली आहे, अशा ठिकाणी जाऊन उत्पादनांच्या वापराच्या पद्धती, पीक व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जाते.
  • सामाजिक प्रवाहात सहभाग  गावामध्ये बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन उभे राहिले. बायफच्या माधमातून विविध गावांमध्ये ५० गट सक्रिय आहेत. यातून महिलांचा सर्वांगीण विकास झाला. ज्या महिला घराबाहेर पडत नव्हत्या, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. संवादकौशल्य, संपर्क कौशल्य विकसित झाले. यातून अशिक्षित महिला एकत्र येऊ लागल्या. यातून आर्थिक साक्षरता रुजली.

    बायोगॅस स्लरीपासून खतनिर्मिती

  • बायोगॅसचा आदिवासी कुटुंबांना फायदा झाला. गॅस तयार झाल्यानंतर बायोगॅसमधून स्लरी बाहेर पडते. या स्लरीपासून संस्थेने महिलांना बायोप्रॉम खतनिर्मितीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले.
  •   बायोगॅस तयार झाल्यानंतर संयंत्रातून निघणाऱ्या शेण स्लरीचा चोथा जमा करून वाळविला जातो. त्याचा मातीशी संपर्क येऊ दिला जात नाही. बायफने दिलेल्या १५ बायोगॅस वापरकर्त्यांकडून वाळविलेल्या स्लरीचा चोथा ब्रह्मगिरी महिला संघ खरेदी करतो. वाळविलेल्या शेण स्लरीचा चोथा कंपनीमध्ये जाऊन दिला तर प्रतिकिलो ६ रुपये आणि कंपनीने जागेवर खरेदी केली तर ५ रुपये दर दिला जातो.
  •   महिला संघाने एक पासबुक दिले आहे. वाळविलेल्या शेणस्लरीचे वजन करून पासबुकात नोंद होते. विक्री व मिळालेले पैसे याच्या नोंदी लिखित स्वरूपात असल्याने कामकाज व व्यवहार पारदर्शक झाला आहे.
  •   वाळविलेल्या बायोगॅस स्लरीवर प्रक्रिया करून बायोप्रॉम बनविले जाते. वाळविलेल्या स्लरीमध्ये रॉक फॉस्फेट, बुस्टर व जीवाणूखत यांचे संतुलित मिश्रण केले जाते. हे मिश्रण यंत्रामध्ये टाकले जाते. यंत्रामधून बारीक मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात जीवाणूखत मिसळले जाते. यातील जिवाणू जिवंत राहाण्यासाठी २५ टक्के ओल ठेवली जाते.
  •   उत्पादनाच्या ५० किलो वजनाच्या गोण्या भरल्या जातात.
  •   खतनिर्मितीसाठी लागणारे रॉक फॉस्फेट हे राजस्थानवरून आणले जाते. जीवाणूखत, बुस्टर हे बायफ संस्थेकडून पुरविण्यात येते.
  •   दरवर्षी एक हजार गोण्यांचे उत्पादन केले जाते.
  • विक्रीचे नियोजन

  •   महिला संघाने तयार केलेल्या बायोप्रॉमची विक्री करण्याची पद्धत ठरवली आहे. बायोगॅसधारकाला प्रतिगोणी ५५० रुपये, बचत गटातील सदस्यांना ६५० रुपये, संबंधित गावातील सदस्यांना ७५० रुपयांप्रमाणे विक्री होते. परगावी विक्रीसाठी प्रतिगोणी ९५० रुपये हा दर ठेवलेला आहे.
  •   दरवर्षी एक हजारांहून अधिक गोण्यांची निर्मिती होते. गाव परिसरातील ५० गटांत ५४० महिलांचा समावेश आहे. त्यामुळे उत्पादनाची विक्री गटांतर्गत होते. या विक्रीतून उरलेले उत्पादन ज्या ठिकाणी बाएफचे प्रकल्प सुरू आहेत तेथील शेतकऱ्यांना पुरविले जाते.
  •   उत्पादनाच्या वाढत्या मागणीमुळे अधिक बायोगॅस संयंत्रे गावामध्ये वाढण्याची शक्यता आहे; तसेच बायोप्रॉम  उत्पादनासह महिलांचे आर्थिक उत्पन्न पुढील काळात वाढणार आहे.
  •   विक्रीव्यवस्था व बाजारपेठ विकसित करण्यासाठी ब्रह्मगिरी महिला संघ विविध प्रदर्शने, विक्री महोत्सव यांच्यामध्ये सहभागी होत असतो.
  • महिला झाल्या उपक्रमशील

  • ग्रामस्वच्छता, शिक्षण, आरोग्य यासंबंधी त्या जागृत झाल्या असून, गावात अनेक विकासाभिमुख कामे उभी केली आहेत.
  •   २०१८ पासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-उमेद आणि बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने विकासात्मक कार्यक्रम सुरू झाला.
  •   महिलांना व्यवसायाभिमुख बनविण्यासाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण, जैविक खतनिर्मिती, आयुर्वेदिक उत्पादन निर्मितीबाबत प्रशिक्षण दिले जाते.
  • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद-बायफ यांच्यातर्फे उत्पादक गट बनविण्यात आले आहेत. सध्या ब्रह्मगिरी महिला उत्पादक गट या नावाने कामकाज सुरू आहे. ब्रह्मगिरी महिला संघाचा ब्रह्मगिरी महिला उत्पादक गट हा विपणन व विक्रीचे नियोजन करतो.
  • - मीना गांगुर्डे, ७९७२००१३९० (कार्यक्रम अधिकारी, बायफ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com