नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'

नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'

अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाने जम्मू-काश्मीरच्या अशांत भागांत लहान मुलींना शिक्षण, आरोग्य आणि राहण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोळा वर्षांपूर्वी ‘बॉर्डरलेस वर्ड फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून निराधार मुली सन्मानाने उभ्या राहात आहेत. शिक्षणासोबत आरोग्य, ग्रामविकास उपक्रमांतून दुर्गम गावे जोडून घेण्याचे काम ते करत आहेत. या मुलींना कृषी क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचीही धडपड सुरू आहे.

आपण जम्मू-काश्मीरमध्ये काम करता. महाराष्ट्र ते जम्मू-काश्मीर हा प्रवास नेमका कसा झाला ?

श्री. कदम :  माझं गाव नगर जिल्ह्यातील कोसेगव्हाण. आई, वडील जिरायती पट्ट्यातले शेतकरी. शेती करताना संघर्ष ठरलेला. कुटूंब चालविण्यासाठी वडिलांनी पुण्यामध्ये खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. त्यामुळे माझे शिक्षण पुण्यामध्ये झाले. बारावीमध्ये हात मोडल्याने पखवाज वादन, कुस्ती बंद झाली. राज्यशास्त्र हा माझा आवडीचा विषय असल्याने राज्यघटना, विविध राज्यांतील संबंध यांचा अभ्यास होऊ लागला. यामध्ये काश्मीरमधील प्रश्नांची चर्चा होत असे. हा प्रश्न समजावून घेण्यासाठी मी समवयस्क अभ्यासगटासोबत १९९७ मध्ये पंधरा दिवसांचा जम्मू- काश्मीर अभ्यास दौरा केला. तिथे विविध भागांत फिरण्यास सुरवात केली. परंतु, संचारबंदीमुळे अभ्यास दौऱ्यात अडथळे आल्यामुळे बहुतांश जण परत पुण्याला गेले. परंतु मी मात्र अभ्यासाच्या ओढीने तीन महिने दुर्गम भागात फिरलो. तिथे स्थानिक लोकांच्या घरी राहिल्यामुळे खऱ्या अर्थाने समस्यांची ओळख झाली. या दरम्यान मी पुण्यातील एस. पी. कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली. जशी संधी मिळेल तसा काश्मीरमध्ये जात होतोच. ओळखी झाल्याने जेवण आणि राहण्याचा कधीच प्रश्नच आला नाही, इतके चांगले संबंध तयार झाले. त्यातूनच स्थानिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर काम करण्याचा निश्चय केला. काश्मिर विषयी बोलताना अधिक कदम.. (VIDEO)

काश्मीरमध्ये शैक्षणिक उपक्रमांना कशी सुरवात झाली?

श्री. कदम :  कारगील युद्धाच्या काळात विस्थापित झालेल्या लोकांच्या मुलांसाठी कारगील, द्रास, बटालीक विभागात स्वयंसेवी संस्था स्थानिक लोकांच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रम राबवत होत्या. त्यामध्ये मी सहभागी झालो. युद्ध संपल्यानंतर विस्थापित कुटुंबे गावी निघून गेली. या दरम्यान सीमेवर होणारा गोळीबार, आत्मघाती हल्ले मी बघितले. त्या वेळी मलादेखील निघून जावसं वाटलं. पण एक मन सांगत होते की, आपण इथल्या मुलांसाठी काही तरी केलं पाहिजे. काश्मीरमधील भावी पिढी संस्कारक्षम, उपक्रमशील होण्यासाठी शिक्षण, योग्य संस्कार हाच मार्ग होता आणि तो मी स्वीकारला. एक तरुण मुलगा चुकीच्या मार्गाकडे जाण्यापासून वाचवू शकलो, तर एका भारतीय सैनिकाचा जीव वाचवू शकतो हे पटलं होतं.

‘ बसेरा ए तबस्सुम' ची सुरवात कशी झाली ?

श्री. कदम : युनिसेफच्या प्रकल्पासाठी पद्मश्री बलराज पुरी यांच्या संस्थेसोबत सीमावर्ती भागातील कुपवाडा, बारामल्ला, बांडीपुरा परिसरात काम करण्याची संधी मिळाली. शस्त्रसंधी, अशांत परिस्थितीत मुलांच्यावर होणारा परिणाम असा अभ्यासाचा विषय होता. भाग अशांत असल्याने येथील अनाथ मुला-मुलींचे शिक्षण, रहाणे आणि सुरक्षा यासंदर्भात बऱ्याच समस्या दिसून आल्या. ही मुले कोणतीच सुरक्षा आणि शाश्वती नसल्याने पुन्हा चुकीच्या मार्गाकडे जात आहेत, हे लक्षात आले. काश्मीर प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. परंतु त्यात न पडता मुला-मुलींचे शिक्षण आणि गावामध्येच रोजगार संधी तयार करण्याचे ध्येय ठेवले. ज्यांना चुकीच्या मार्गाने जायचे नाही अशांसाठी काम करणे महत्त्वाचे होते. दुर्गम भागात ओळखी झाल्याने विविध विषयांवर चर्चा होत होत्या. स्थानिकांनी सांगितले की, तुम्ही काही तरी या मुलांसाठी करा. आम्ही आर्थिक मदत देतो, जागा देतो. काश्मिरी लोकांनी टाकलेला विश्वास लक्षात घेऊन मी २००२ मध्ये पुण्यामध्ये समविचारी मित्रांच्या सहकार्याने ‘बॉर्डरलेस वर्ड फाउंडेशन` या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी आम्ही ‘बसेरा ए तबस्सुम' (आनंद घर) सुरू केले. केवळ मुलींसाठीच हे घर सुरू करण्याचे कारण म्हणजे यांचे वडील हल्यात मृत्युमुखी पडलेत, कोणाला आई नाही, तर काहींचा कुटुंबाचा आधार संपला आहे. अशा अनाथ मुलींसाठी कोणतेच घर नव्हते. एक वेळ मुलांकडे लक्ष दिले जातेच परंतु मुलींचा प्रश्न गंभीर आहे. अशाच मुलींना आनंद घरामध्ये सामाऊन मानसिक आणि शैक्षणिक आधार देण्यास सुरवात केली. सन २००२ मध्ये पहिले ‘बसेरा ए तबस्सुम' कुपवाडा जिल्ह्यातील सलकूट गावात सुरू झाले. त्या वेळी चार मुली राहण्यासाठी आल्या. आज तेथे ४५ मुली राहतात, शिकतात. संस्थेने कुपवाडा, अनंतनाग, बिरवा-बडगाम, श्रीनगर येथे मुस्लिम मुलींसाठी आणि जम्मूमधील आनंद घर हे काश्मिरी पंडितांच्या मुलींसाठी सुरू केले. संस्थेच्या पाच आनंदघरांमध्ये सध्या २३० अनाथ मुलींच्या राहण्या-जेवण्याची, औषधोपचार आणि शिक्षणाची मोफत सोय केली आहे. परिसरातील शाळांमध्ये मुली शिकण्यासाठी जातात. आनंद घरामध्ये मुलींना शालेय अभ्यासाबरोबर संगणक शिक्षण, हिशेब नोंदी, लोकांशी कसे बोलायचे, समाजामध्ये कसे वागायचे याचेही शिक्षण देतो. जेणे करून या मुली पुन्हा समाजात जातील तेव्हा त्या प्रत्येक समस्येला धाडसाने तोंड देतील. आनंद घरामध्ये राहून शिकलेल्या ३३ मुली बारावीनंतर नर्सिंग, इंजिनिअरिंग, संगणकशास्त्र आदी विषयांत शिक्षण घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, बंगळुरू, कोल्हापूर, कन्याकुमारी शहरात गेल्या आहेत. पुढे या मुली चांगली आई, शिक्षिका आणि गुरू या भूमिका पार पाडतील. त्यातूनच काश्मीरमध्ये संस्कारक्षम पिढी तयार होईल. संस्थेत शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या बारा मुलींची आम्ही चांगल्या घरात लग्न करून दिली आहेत. काही मुली शिक्षिका, नर्स झाल्या आहेत. काही सरकारी कार्यालये, बॅंकांत कार्यरत आहेत. हंदवाडा भागातील एक मुलगी ग्रामपंचायतीत बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आली आहे. सध्या आम्ही जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांच्या २५० मुलींसाठी मोठे हॉस्टेल बांधतोय. याठिकाणी निवासाबरोबरीने शाळा तसेच विविध प्रशिक्षणांची सोय करण्यात येणार आहे. संस्थेच्या उपक्रमासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील लोकांनी मोठी आर्थिक आणि मानसिक ताकद दिली आहे. काही जण येथील कार्यात थेट सहभागी होतात. येत्या काळात लोकसहभागातून जम्मू- काश्मीर राज्यात पाच हॉस्टेल्स आम्हाला बांधायची आहेत.

काश्मीरमध्ये धक्कादायक अनुभवही आपल्याला आले असतीलच ?

श्री. कदम : गेल्या पंधरा वर्षांत जवळपास १९ वेळा माझे अपहरण झाले. परंतु या भागात करत असलेल्या शैक्षणिक कार्याची पुण्याई आणि स्थानिकांशी चांगले संबंध यामुळे मी सुखरूप बाहेर आलो. शेकडो वेळा शैक्षणिक कार्य थांबवण्यासाठी फतवे निघाले. परंतु स्थानिक लोक मला काश्मीर सोडू देत नाहीत. ते म्हणतात की, तुमचे शैक्षणिक कार्य आमची उद्याची आशा आहे. या स्थानिकांमुळेच मला बळ मिळते. दुर्गम खेडेगावातील सामान्य जनता माझ्या कार्याला मदत करते, हे दहशतवाद्यांनी बघितले असल्याने मला धोका नाही. आजतागायत ‘बसेरा ए तबस्सुम' वर कधीच दगडफेक झाली नाही. अनेक धक्कादायक अनुभवातून मृत्यूची भितीच संपली आहे. चांगले शिकवणे हे एक प्रकारचे अन्नधान्य आहे, ते कोणाला तरी पिकवावे लागणार. विचार, मनाची मशागत करावी लागणार. त्यासाठी कष्ट, मरण यातनाही सोसाव्या लागतात.

संस्थेतर्फे आरोग्य सेवा पुरविली जाते, त्याचा कसा फायदा होतो ?

श्री. कदम : जम्मू-काश्मीरमध्ये संस्थेच्या नऊ अद्ययावत ट्रामा केअर रुग्ण वाहिका आहेत. त्या सामान्य जनतेच्या बरोबरीने लष्करासाठी वापरल्या जातात. अनेक वेळा सैनिकांना रुग्णवाहिकांमधून जम्मूतून थेट दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले आहे. येत्या काळात लष्कराच्या सहकार्याने किमान ३० अद्यायवत रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहोत.

शेती, ग्रामविकासासाठी आपली संस्था काय प्रयत्न करते ?

श्री. कदम : जम्मू-काश्मीरमध्ये सफरचंद, अक्रोडच्या बागा, केशर लागवडही आहे. शेळी, मेंढीपालनही केले जाते. कृषी पर्यटनाला संधी आहे. ग्रामीण मुला-मुलींना शेतीतील नवे तंत्र, पूरक आणि प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. आनंद घरातील चार मुली कृषी शिक्षण घेताहेत. महाराष्ट्रात कृषी शिक्षण, ग्राम विकासात कार्य करणाऱ्या संस्था तसेच विद्यापिठांनी जर आम्हाला साथ दिली, तर येथील मुला-मुलींना प्रशिक्षणासाठी पाठविण्याची तयारी आहे. माझी आई (विमल), वडील (सदाशिव) आणि भाऊ (सुहास) हे जिरायती शेती करतात. दुष्काळातही ते टिकून आहेत. हिंमत हारलेले नाहीत. ही माझ्यासाठी प्रेरणा आहे. त्यामुळे अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागूनही मी पराभूत झालेलो नाही. माझे हे ध्यासपर्व चालूच रहाणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत....

 - अधिक कदम, ९१४९६५७८५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com