Agricultural stories,Agrowon,Success story of Dr.Anirudha Dharmadhikari,Nasik | Agrowon

अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधान
ज्ञानेश उगले
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

नाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा पूर्ण दिवस रुग्ण तपासणी, सोनोग्राफी, अँजियोप्लास्टीमध्ये व्यस्त असला तरी मनातील एक कोपरा शेतीसाठी जपला आहे. हॉस्पिटल व्यस्ततेमध्येही डॉक्टरांचे फळबागेतील कामांकडे तेवढेच लक्ष असते. आठवड्याच्या धावपळीनंतर येणारा रविवार शेतासाठी राखीव असतो. शेती, फळबागा माझ्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर तो श्‍वास आहे, ध्यास आहे, असं डॉक्‍टर सांगतात.

नाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा पूर्ण दिवस रुग्ण तपासणी, सोनोग्राफी, अँजियोप्लास्टीमध्ये व्यस्त असला तरी मनातील एक कोपरा शेतीसाठी जपला आहे. हॉस्पिटल व्यस्ततेमध्येही डॉक्टरांचे फळबागेतील कामांकडे तेवढेच लक्ष असते. आठवड्याच्या धावपळीनंतर येणारा रविवार शेतासाठी राखीव असतो. शेती, फळबागा माझ्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर तो श्‍वास आहे, ध्यास आहे, असं डॉक्‍टर सांगतात.

नाशिक शहरात वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले डॉ. अनिरुद्ध विलास धर्माधिकारी यांना लहानपणापासूनच शेतीची ओढ होतीच. या ओढीतून २००३ मध्ये डॉक्टरांनी अंजनेरी परिसरातील डोंगराळ निसर्गरम्य शिवारात साडे तीन एकर जमीन घेतली. तिथून पुढे टप्प्याटप्प्याने त्यांनी शेती क्षेत्र आणि पिकांची लागवड वाढवत नेली. सातत्याने परिसरातील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांशी चर्चा करत पीक लागवडीचे नियोजन केले. मागील पंधरा वर्षांत लागवड केलेल्या फळबागांतून उत्पादन सुरू झाले आहे. गेल्या दीड दशकांत घेतलेल्या ध्यासाचं मूर्तिमंत स्वरूप शेत शिवारात दिसू लागले आहे. शेती माझ्यासाठी नुसती गुंतवणूक नाही, शेती आपलं मूळ आहे. आपली ओळख आहे, संस्कृती आहे. त्यातूनच मी शेतीमध्ये गुंतलो, असे डॉ.धर्माधिकारी सांगतात.  

ओझर ते इटलीचा प्रवास
डॉ. धर्माधिकारी यांचे निफाड तालुक्‍यातील ओझर हे मूळगाव. त्यांचे वडीलही डॉक्‍टर असल्याने त्यांनी तोच वारसा पुढे चालवला. डॉक्टरांनी १९९७ मध्ये कार्डियालॉजीमध्ये डीएम अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर २००० मध्ये इटलीमध्ये ‘फेलोशिप इन इंटरव्हेनशनल' पूर्ण केली. या काळात त्यांना इटलीमधील द्राक्षशेती जवळून अनुभवता आली. त्यानंतर आता त्यांनी स्वतःची द्राक्षबाग उभी केली. शेतीच्या प्रवासात पत्नी डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांचीही चांगली साथ लाभली आहे.

माळरानावर फुलवली फळबाग
त्र्यंबकेश्‍वर रस्त्यालगत असलेल्या अंजनेरी येथे डॉक्‍टर धर्माधिकारी यांची साडे चौदा एकर जमीन आहे. यातील दहा एकरात सघन पद्धतीने केसर, हापूसची टप्प्याटप्प्याने लागवड केलेली आहे. साडेचार एकरांत इंद्रायणी भाताची लागवड असते. शेती बांधावर सागाची लागवड केली आहे. साधारणपणे २०१० पासून आंबा बागेतून फळांचे उत्पादन सुरू झाले आहे. सेंद्रिय पद्धतीनेच फळबागेचे व्यवस्थापन ठेवले जाते.  कोशिंबे (ता. दिंडोरी) येथील पस्तीस एकरांच्या क्षेत्रापैकी सोळा एकरावर पेरु (सरदार), बारा एकरावर  डाळिंब (भगवा), दोन एकरावर ड्रॅगनफ्रूट (लाला, पांढरा) लागवड केली आहे. ही फळबागदेखील टप्प्याटप्प्याने केली आहे. त्यामुळे व्यवस्थापन सोपे जाते. उर्वरित क्षेत्रामध्ये हंगामानुसार भात, नाचणी आणि भोपळ्याचे उत्पादन घेतले जाते. वाडगाव (ता.नाशिक)  शिवारात चौतीस एकर क्षेत्रापैकी १६ एकरांवर द्राक्षे (थॉमसन, क्‍लोन टु ए, सुधाकर सीडलेस, सुपर सोनाका, फॅंटसी) चार एकरात बांबू, तीन एकर काजू, फणस लागवड आहे. उर्वरित क्षेत्रात हंगामी पिकांच्या लागवडीचे नियोजन असते.  काही ठिकाणी बांधावर नारळ, चिकू लागवड केलेली आहे. फळबागांमध्ये ठिबक सिंचन केलेले आहे.

शेतीचे केले काटेकोर नियोजन
शेती नियोजनाबाबत डॉ. धर्माधिकारी म्हणाले की,  मी रविवारी शेतीवर जात असलो तरी दररोज तेथील व्यवस्थापकांशी चर्चा असते. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी व्यवस्थापक आणि मजूर कार्यरत आहेत. मला पीक व्यवस्थापनासाठी राजाभाऊ शिंदे, राजाभाऊ थेटे या प्रयोगशील शेतकऱ्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. कोशिंबे येथील शेताची जबाबदारी रवी पवार आणि वाडगाव येथील जबाबदारी हरिभाऊ गायकर यांच्याकडे आहे. अंजनेरी येथे बहुतांश क्षेत्र हे आंबा लागवडीखाली असल्याने राखणादार ठेवले आहेत. व्यवस्थापकांना पीक नियोजनाची चांगली माहिती असल्याने दरवर्षी व्यवस्थापनात बदल होत असतात. शेती कामाच्या गरजेनुसार मजूर घेतले जातात. वेळोवेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला मला नेहमी उपयोगी ठरतो. मी रविवारी सकाळी आठ वाजता हॉस्पिटलला भेट देतो. त्यानंतर अंजनेरीच्या शेतावर दहा वाजता पोचतो. पीक वाढीची स्थिती, पाणी व्यवस्थापन, ठिबकचे नियोजन, पाचटाचे आच्छादन याची पाहणी करतो. दुपारी बारापर्यंत वाडगाव येथील शेतावर पोचतो. तेथे द्राक्ष बाग आहे. परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि व्यवस्थापकांशी चर्चा करत पुढील नियोजन ठरविले जाते. कोशिंबे येथील क्षेत्रावर संरक्षित पाण्यासाठी एक एकरात शेततळे केले आहे. या शेततळ्यात यंदा सप्टेंबरमध्ये रोहू, कटला या जातींचे मस्यबीज सोडले आहे. एप्रिल नंतर मासे काढणीस तयार होतील. सध्या द्राक्ष शेतीमध्ये काही प्रमाणात शिफारशीनुसार रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा लागतो. परंतू आंबा, पेरू, डाळिंब या फळबागांसाठी सेंद्रिय खते, कीडनाशकांचा वापर करत आहे. याचबरोबरीने जीवामृत, दशपर्णी अर्काचा वापर करतो. जमीन सुपिक ठेवण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. यंदा सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी अर्ज केला आहे.

थेट बांधावरून फळांची विक्री
डॉ.धर्माधिकारी यांची कोशिंबे येथे पेरू, अंजनेरी येथे आंबा आणि वाडगाव येथे द्राक्ष बाग आहे. या बागेतील फळांची थेट विक्री गुजरातमधील व्यापाऱ्यांना केली जाते. फळ उत्पादनातील दहा टक्के माल हा नाशिक, वणी येथील बाजार समितीत विकला जातो. रसायन अंशमुक्त फळांच्या उत्पादनामुळे चांगली मागणी आहे. सर्व फळबागांचा खर्च वजा जाता सरासरी २० टक्के नफा रहातो. हंगामी पिकांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकले जाते.  

आरोग्यदायी जीवनशैलीची चळवळ  
डॉ. धर्माधिकारी यांनी टप्प्याटप्प्याने सेंद्रियशेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. पेरु, आंबा, चिकू, नारळ, डाळिंब, ड्रॅगनफ्रुट या फळबागांचे सेंद्रिय पद्धतीनेच व्यवस्थापन ठेवले आहे. डॉक्टरांनी आरोग्यदायी जीवनशैली, सेंद्रिय आहाराची चळवळ सुरू केली आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून डॉक्टर  लोकांशी संवाद साधतात. आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करतात.

ॲग्रोवन हाच मार्गदर्शक
समजून उमजून शेती करण्यासाठी ॲग्रोवनचे वाचन आवश्‍यक असल्याचे डॉक्टर सांगतात. रोजची वैद्यकीय कामांची कितीही धावपळ असली तरी त्यांचे ‘ॲग्रोवन'चे वाचन कधीच चुकत नाही. ॲग्रोवनच्या माध्यमातून राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी ते जोडले गेले आहेत. स्वतःच्या शेतातील पिकांच्या संदर्भात ॲग्रोवनमध्ये आलेल्या उपयुक्त लेखांचा फोटो काढून डॉक्टर शेती व्यवस्थापकांना पाठवितात. त्यानुसार पीक व्यवस्थापनात सुधारणा केली जाते.

- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, ९८२३०३३६४६

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...