Agricultural stories,Agrowon,success story of Shobha Pakhle,BaheBorgaon,Dist.Sangli | Agrowon

शोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपण
शामराव गावडे
रविवार, 9 डिसेंबर 2018

महिलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात मन लावून काम केल्यास यशस्वी होता येते. भौतिक सुखामध्ये न अडकता शेतीमध्येही कष्ट करून स्वतःचा विकास साधता येतो.

- शोभा ज्ञानदेव पाखले

 

सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील शोभा ज्ञानदेव पाखले यांनी सात एकर शेतीची जबाबदारी सांभाळताना सेंद्रिय पद्धतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता सांभाळण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. महिला शेतकरी म्हणून आपल्या कामातून ठसा उमटवत त्यांनी शेती समृद्ध केली आहे.  

बहेबोरगाव (ता. वाळवा) येथे बोरगाव - वाळवा रस्त्यावर पाखले मळा परिसरात पाखले कुटुंबीयांची ७ एकर शेती आहे. शोभा पाखले यांचे पती व त्यांच्या चार भावांचे एकत्रित कुटुंब. पती काही वर्षे एअरफोर्समध्ये हवामान विभागात नोकरीला होते. शोभा या काही वर्षेच पतीच्या नोकरीनिमित्त बाहेर होत्या. इतर वेळी त्या गावी बहेबोरगावात असत. माहेरची शेतीची कोणतीही पार्श्र्वभूमी नसताना शोभाताईंचे शेतकरी कुटुंबात लग्न झाले. त्यांचे सासू-सासरे शेतीची जबाबदारी पाहायचे. त्यातूनच त्यांना शेतीकामाची गोडी लागली अणि गेल्या ४० वर्षांपासून त्या शेतीकामात व्यस्त आहेत.  सध्या पाखले यांची पाच एकर ऊस लागवड असून उर्वरित २ एकर क्षेत्रावर कलिंगड लागवडीचे नियोजन आहे.

सेंद्रिय पद्धतीने  पीक व्यवस्थापन
बहेबोरगाव हे तसे ऊसपट्ट्याचे क्षेत्र मानले जाते. शोभाताईंना योग, प्राणायाम, आध्यात्मिक वर्गाचे प्रशिक्षण घेताना सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळले. त्यातून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचे ठरविले. शिवाय रासायनिक खतांचा वाढत्या वापरामुळे शेती खर्चात वाढ होते आणि जमिनीचे आरोग्यही खालावत आहे, असे शोभाताईंना दिसून आले. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवायची असेल, तर सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे, हे त्यांनी निश्चित केले. घरातील सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. 
सेंद्रिय शेतीसंदर्भात कोणतीच माहिती नसल्यामुळे त्यांनी प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांनी २०१२ साली चेन्नई ,बंगळूरू या ठिकाणी पंचगव्य, तसेच नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेऊन सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. घरातील सदस्यांना सुरुवातीला सेंद्रिय शेती करणे शक्य होईल का, अशी शंका होती. परंतु, पती ज्ञानदेव यांनी पूर्ण सहकार्य केले. गोमूत्र, शेण उपलब्ध होण्यासाठी त्यांनी एक देशी गाय घेतली. जिवामृत, जैविक कीटकनाशके घरीच तयार करण्यास सुरवात केली. दर १५ ते २० दिवसाला ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे जीवमृताचा वापर केला जातो. ऊस शेतीत ८० टक्के सेंद्रिय व २० टक्के रासायनिक हे सूत्र वापरले आहे. तर, ३० गुंठे क्षेत्रावर पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकांचे उत्पादन घेतात. भविष्यात संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचा त्यांचा विचार आहे.

वाढली जमिनीची सुपिकता
सेंद्रिय शेतीला सुरुवात केल्यानंतर दोनच वर्षांत त्याचे चांगले फायदे दिसू लागले. उसाचे एकरी ६५ ते ७० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. जमिनीतील सेंद्रिय कर्बामध्ये वाढ झाली. गांडुळांची संख्या वाढली. जमीन भुसभुशीत झाली, असे शोभाताई सांगतात. उसामध्ये आंतरपिके म्हणून कडधान्ये घेतली जातात. ही कडधान्ये घरी खाण्यासाठी, तसेच जीवामृतामध्ये पीठ घालण्यासाठी वापरली जातात. मागील हंगामात १५ गुंठे क्षेत्रावरील रताळी पिकामध्ये केवळ जिवामृताचा उपयोग केला. त्यातून त्यांना पाच टन रताळ्याचे उत्पादन मिळाले. प्रतिटनासाठी तीस हजार रुपये दर मिळाला, असे शोभाताई सांगतात.

शेतीकामात तरबेज
पहाटे ४ वाजता उठून योग, प्राणायाम करून शोभाताईंचा दिवस सुरू होतो. कोणतेही काम वेळेवर पूर्ण होईल, याची त्या कटाक्षाने काळजी घेतात. जनावरांना चारा देणे, मजुरांबरोबर पडेल ते काम करणे, जीवामृत बनविणे, पहाटे उठून गायीचे गोमूत्र धरणे, पिकांना पाणी देणे, जैविक कीडनाशके बनवणे, ही कामे त्या स्वतः करतात. त्यामुळे शोभाताई शेतीकामात तरबेज झाल्या आहेत.
   शोभाताईंचा भविष्यात मधमाशीपालन, गूळनिर्मितीचा विचार आहे. त्यांनी दिल्ली, चेन्नई ,बंगळूरू या ठिकाणी नैसर्गिक शेतीचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्या नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षणही देतात. त्यांनी नैसर्गिक शेती करणाऱ्या ५० लोकांचा गटही तयार केला आहे. अलीकडेच चार महिने त्या मुलीकडे दुबईमध्ये राहून आल्या. त्याठिकाणची जमीन आणि शेतीची परिस्थिती पाहता अापल्याकडची शेती किती समृद्ध आहे, याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे अजून कष्ट करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.

 देशी बियाण्यांचे संवर्धन
शोभाताईंनी सासू - सासरे यांच्या काळापासून लागवडीखाली असलेल्या जुन्या देशी बियाणांचे संवर्धन केले आहे. उडीद, मूग, चवळी या पिकांबरोबरच अन्य कडधान्य बियाणांचे संवर्धन केले आहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांना बियाणे देखील  दिले जाते.

उच्चशिक्षित कुटुंब
शोभाताई स्वतः पदवीधर आहेत. पती बी. ए. एलएल. बी., मुलगा पदवीधर, एक मुलगी एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग करून दुबई येथे नोकरीला आहे. दुसरी मुलगी बीए बीएड करत आहे. एक पुतण्या प्राध्यापक आणि त्याची पत्नी न्यायाधीश, दुसरा पुतण्या वनाधिकारी त्याची पत्नी सहायक आयुक्त, अशा पदावर कार्यरत आहे. एकूणच पाखले कुटुंब उच्च शिक्षित आहे, त्यांचे पुतणे शेती,कुक्कुटपालन करतात. 

शेतीची वैशिष्ट्ये

  • जमिनीतील सेंद्रिय कर्बामध्ये वाढ.
  • जमिनीची खोल नांगरट केली जात नाही.
  • घरी लागणारा भाजीपाला स्वतः पिकवतात.
  • जैविक कीडनाशके बनविण्यासाठी लागणाऱ्या अर्जुन, गुळवेल, लिंबू, सीताफळ, आवळा, कडूनिंब तसेच उपयुक्त औषधी वनस्पती अाणि फळझाडांची बांधावर लागवड.  सेंद्रिय निविष्ठांची घरच्याघरी निर्मिती, त्यामुळे खर्चात बचत.  
  • पती ज्ञानदेव, मुलगा पवन, सून सीमा यांची शेतीकामात मदत. 

- शोभा पाखले, ८९९९४७१७५८

 

फोटो गॅलरी

इतर महिला
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
शेती, पूरक उद्योगातून महिला गट झाला...पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथील ऋचा...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
स्वच्छ पाणी प्या, आजारापासून दूर रहाखराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या...
आरोग्यवर्धक नारळपाणी आयुर्वेदात नारळपाण्याला खूप महत्त्व आहे. नारळात...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकलसीकरण हे लहान मुले, बाळांसाठी आणि आजारी...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
शेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...
स्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
रेश्माताईंनी तयार केला केकचा रुचिरा...भोसे(जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागात राहूनही...